“माझी काठी द्या.”

“माझ्याहि हातांना तिची संवय होऊं दे.”

“ती काठी नुसती हातांत धरायची नसते.”

“मग तिनं काय करायचं ?”

“ती दुष्टांच्या डोक्यांत घालायची असते.”

“कुठं आहेत दुष्ट ?”

“सारं जगच दुष्ट आहे.”

“मी सुध्दां ? तुम्ही सुध्दां ?”

“जो जगाला छळतो, तो दुष्ट.”

“त्या दुष्टाला देव शिक्षा करील”

“देव ? कुठं आहे देव ?”

“काय, देव नाहीं ?”

“तुम्ही पाहिला आहे ?”

“पाहिला नसला तरी तो आहे.”

“सारा भोळसटपणा. देवबीव सारं झूट आहे. देव कांही करीत नाहीं. सारं बरंवाईट मनुष्यच करतो. देवाची ब्याद कशाला उगीच मध्ये ?”

“देवाला नाव नका ठेवू. तुम्ही तरी नका ठेवू.”

“कां ?”

“मला वाईट वाटेल, रडूं येईल. “

“गरिबांबद्दल तुम्हांला कधीं रडूं येतं का ?”

“तशी अद्याप मी रडलें नाहीं.”

“गरिबांसाठीं ज्याला रड येत नाहीं, तोच देवासाठीं रडतो.”

“मला तुमच्यासाठीं रडूं येईल.”

“माझ्यासाठी ?”

“हो.”

“कां बरं ?”

“कीं इतका चांगला मल्ल देवाला मानीत नाही म्हणून.”

“निरोगी मनुष्याला औषध नको निरोगी मनाला देव नको. देव म्हणजे दुबळयाची काठी.”

“काठी हातीं असणं म्हणजे का दुबळेपणा ?”

“नाहीं तर काय ?”

“मग हा सोटा तुम्ही हातांत घेतां, तो दुबळेपणामुळं, भ्याडपणामुळंच का ? भित्रे आहांत एकूण तुम्ही ? पहिलवान आणि भित्रे ?”

“तुम्ही बसा ना.”

“मी का फार मोठी बाई आहे ? मला “तुम्ही” असं कां म्हणतां ?”

“आणि मीहि का फार मोठा आहे ? सोळासतरा वर्षांचा मी ! “

“चौदपंधरा वर्षांची मी.”

“एवढयाशा वयांत तूं बोलतेस फटाकडी ! “

“आजी म्हणते कीं मी बॅरिस्टराला हटवीन. “

“मग माझी काय कथा ?”

“तुम्ही इकडे कुठं आलेत आज ?”

“मला कां “तुम्ही” म्हटलंस ?”

“आपोआप तोंडांतून “तू” आलं तर त्यात मौज असते. तुमच्या तोंडून “तू” आलं. माझ्या तोंडून नाहीं अस येत. मला तुमच्याविषयीं आदर वाटतो.”

“आणि मला तुझ्याविषयीं काय वाटतं !”

“ते मी कशी सांगू ?”

“तुझं नांव काय ?”

“संध्या ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel