स्वतःमध्ये व समाजामध्ये, वैयक्तिक आणि जमातीय संबंधांमध्ये, मूलगामी बदल होणे आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात आले आहेच.हा बदल आपण कसा काय घडवून आणणार आहात ? जर बदल म्हणजे मनाने काळजीपूर्वक विचारपूर्वक काढलेल्या, आराखड्याबरहुकुम बनणे होणे असेल, तर अजूनहि अापण मनाच्या क्षेत्रात वावरत आहोत .त्यामुळे मन जे काही ठरविते ते ध्येय बनते .मग त्या कल्पनेसाठी त्या ध्येयासाठी आपण स्वतःचा व आणखी कितीही जणांचा बळी देण्याला सिद्ध होतो.जर तुम्ही त्याला चिकटून असाल तर ओघानेच अापण मानव हे फक्त मनोनिर्मित आहोत.स्वाभाविकच शिस्त, यम नियम,जबरदस्ती, क्रूरता, एक सत्ताधीशता, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस्, दहशतवाद,इत्यादि सर्व अपरिहार्य आहे.आपण जेव्हा मनाची पूजा करतो तेव्हा हे सर्व त्यातच अंतर्भूत आहे.तसे ते नसते काय ?
                          
जर हे सर्व मला उमजेल ,जर मी शिस्तीतील फोलपणा पाहीन, जर वेगवेगळ्या प्रकारचे त्याग म्हणजे केवळ मी व माझे याचे दृढीकरण आहे, हे माझ्या लक्षात येईल ,तर मग मी काय करावे ?      
                    
या समस्येचा पूर्णपणे विचार करण्यासाठी जाणीव म्हणजे  काय हे प्रथम पाहिले पाहिजे.तुम्ही स्वतःशीच जाणीव म्हणजे काय याचा केव्हां विचार केला आहे कि नाही ते  मला माहीत नाही.परंतु तुम्हाला बहुधा जाणीवेबद्दल निरनिराळे आचार्य प्राचार्य काय म्हणतात ते निश्चित माहित असेल.तुम्ही लगेच त्यांची अवतरणे द्यायला सुरुवात कराल.तुमच्या स्वतःच्या अनुभवातून अभ्यासातून  जाणीव म्हणजे काय?जाणिवेत काय काय अंतर्भूत आहे?याची समज तुम्हाला आली आहे कि नाही ते मला माहीत नाही.जाणीव म्हणजे आपल्या दैनंदिन क्रियेत जीवनात प्रगट होणारी जाणीव एवढेच नव्हे, तर त्याहूनही खोल त्याहूनहि गुप्त त्याहूनही संपन्न व समजण्यास कठीण अशी जाणीव होय.
                        
जर आपल्याला स्वतःमध्ये व जगामध्ये मूलगामी बदल कसा घडवून आणावा याची चर्चा करावयाची असेल, या समस्येची उकल करायची असेल, त्या बदलांमधून कांही एक समज कांही एक दृश्य उत्साह ताकद विश्वास खात्री आशा निर्माण करायची असेल,कि ज्यामुळे आपल्या हालचालींना योग्य प्रेरणा मिळेल, व हे सर्व समजावे असे आपल्याला वाटत असेल, तर त्या जाणिवेला संपूर्ण समजून घेणे आवश्यक नाही काय ?           

मनाच्या उधळ थरातील जाणीव आपल्याला माहीत आहे .विचार म्हणजेच जाणीव,जाणीव म्हणजेच विचार प्रक्रिया.विचार हा शब्दीकरणाचा,संस्काराचा, स्मरणाचा,नामकरणाचा, संग्रहाचा, व संग्रहित केलेल्या काही अनुभवांचा ,परिपाक आहे.यामुळे आपण एकमेकांशी संबंध प्रस्थापित करू शकतो .याच पातळीवर निरनिराळ्या समजुती, शिस्त, अनुकरण, वगैरे असतात .या सर्वांशी आपली ओळख आहे .जेव्हा आपण याहूनही खोल जातो तेव्हा  आपल्याला अनेक हेतू, आनुवंशिक ठशांचा संग्रह, वैयक्तिक व सामाजिक आकांक्षा, पूर्वग्रह, आढळून येतात .हे सर्व दर्शन, स्पर्श, व वासना, यांचे परिणाम असतात.सुप्त व प्रगट अशी ही जाणीव 'मी" या कल्पनेभोवती गुंडाळलेली असते.         
                     
जेव्हां आपण बदल कसा घडवून आणायचा याची चवकशी व चर्चा करतो तेव्हां फक्त उथळ बदल आपणाला अभिप्रेत असतो.तो फक्त या गुंडाळ्यातील फरक असतो .निश्चय, निर्णय, शिस्त, बंदी, यामधून आपण फक्त वरवरचा बदल करू शकतो .त्यासाठी आपली तीव्र इच्छा असते .प्रत्यक्षात सुप्त जाणिवेच्या खोलवर असलेल्या अनेक मानसिक थरांची मदत घेऊन आपण ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत असतो .यासाठी स्वत:च्या खोलीचा थांग लावणे आवश्यक आहे असे मला वाटते.प्रत्यक्षात उथळ थर व तथाकथित खोल थर यांच्यामध्ये कधीही न संपणारा झगडा विरोध सदैव सुरू असतो .सर्व  मानसशास्त्रज्ञ ज्यांनी ज्यांनी स्वज्ञानाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला ते सर्व याच्याशी सहमत आहेत.          
                  
हा अंतर्विरोध कधीतरी बदल घडवून आणू शकेल काय?स्वत:मध्ये मूलगामी बदल कसा घडवून आणावा हा आपल्या जीवनातील अत्यंत मूलगामी,महत्त्वाचा, व ज्वलंत प्रश्न आहे .उथळ थरातील फरक मूलगामी बदल घडवून अाणू शकेल काय?स्वत:च्या जाणिवेचे वेगवेगळे थर समजून घेणे,या "मी"चे पूर्ण संशोधन करणे, भूतकाळाचा संस्कारदृष्ट्या शोध घेणे, जन्मापासून आतापर्यंतचे सर्व वैयक्तिक अनुभव समजून घेणे, वडील आई पूर्वज यांचे आनुवंशिक  संस्कार तपासणे, आपल्या जातीच्या व समाजाच्या धारणेचा परिणाम अजमावणे,हे सर्व ,या सर्वांची फोड, विश्लेषण, मूलगामी बदल घडवून आणू शकेल काय?            
                     
मला असे वाटते व तुम्हालाही असे वाटले पाहिजे कि स्वतःच्या जीवनात मूलगामी बदल आवश्यक आहे .हा बदल म्हणजे एक प्रतिक्रिया नव्हे.हा भोवतालच्या  परिस्थितीचा दाब व ताण याचा परिणाम नव्हे. असा बदल एखाद्या मध्ये कसा काय घडवून आणावा?माझी जाणीव म्हणजे मानवी अनुभवाची एकत्रित बेरीज , अधिक वर्तमानाशी असलेला विशिष्ट संबंध होय .हा संबंध कधी तरी बदल घडवून आणू शकेल काय ?माझी जाणीव ,माझा अभ्यास, माझ्या क्रिया, माझे विचार व भावना, याबद्दलची जागृतता धि:काराविना फक्त पाहण्यासाठी,मनाचे स्थिरीकरण,हा सर्व बदल घडवून आणू शकेल काय ?श्रद्धा, आराखडा काढलेल्या कल्पनेशी ते ध्येय समजून समरसता, यातून बदल घडून येऊ  शकेल काय ?हे सर्व मी जे कांही आहे व मी जे कांही असले पाहिजे त्यातील झगडा दर्शवित नाही काय़ ?
                   
विरोध कधीतरी मूलभूत बदल घडवून आणू शकेल काय?माझ्याशी व समाजाशी मी सदैव युद्ध पुकारलेले नाही काय ?बदल आवश्यक आहे हे तर मी पाहतो. हा बदल स्वतःची संपूर्ण जाणीवप्रक्रिया तपासून ,झगडून, शिस्तपालन करून, वेगवेगळ्या प्रकारचे त्याग करून, मी घडवून आणू शकेन काय ? ही प्रक्रिया कधीही मूलगामी बदल घडवून आणणार नाही असे मला वाटते .याबद्दल प्रत्येकाची संपूर्ण खात्री पाहिज़े .आणि जर ही प्रक्रिया मूलगामी बदल, खोल अंतर्क्रांती, घडवून आणणार नाही तर कोणती गोष्ट क्रांती घडवील.            
                       
तुम्ही खरी क्रांती कशी काय घडवून आणणार आहात?ज्या शक्तीमुळे  सामर्थ्यामुळे मूलगामी क्रांती घडविली जाते, ती शक्ती तुम्ही कशी काय प्राप्त करून घेणार आहात ? ती शक्ती कशी काय प्रगट होणार आहे ?तुम्ही शिस्त पालन केलेले आहे .तुम्ही ध्येयांचा पाठपुरावा केलेला आहे .उदाहरणार्थ तुम्ही परमेश्वर आहात ,आणि जर तुम्हाला तुम्ही सर्वसत्ताधीश परमेश्वर असल्याचा अनुभव  आला, जर आपण आत्मानुभव घेऊ शकलो, तर तो अनुभव, तो समज, मूलगामी बदल घडवून आणील अशा प्रकारच्या कितीतरी आशादायक तत्त्वप्रणालींचा  तुम्ही पाठलाग केलेला आहे .तुम्ही हे सर्व केलेले नाही काय ?असा आत्मानुभव खरा बदल घडवून अाणील काय ?कृपा करून आपण काय करीत आहोत तिकडे लक्ष द्या .
                     
प्रथम अापण असा आराखडा काढतो कि एका अंतिम सत्याचे आपण अंश आहोत .नंतर या आराखड्याभोवती आपण वेगवेगळ्या प्रणाली अाशा श्रद्धा तत्त्वे व समजुती यांची रचना करतो .मग त्याप्रमाणे आपण जीवन व्यतीत करण्याचा  प्रयत्न करतो. त्या साचाप्रमाणे विचार करून व कर्म करून, मूलगामी बदल घडवून आणण्याची आपण आशा करतो. याने मूलगामी बदल घडून येईल काय ?              
                     
तुम्ही असे समजता  कितीतरी धार्मिक लोक तसे मानतात कि तुमच्यामध्ये खोलवर सत्याचा अंश आहे .जर आपण सद्गुण मशागत केली वेगवेगळ्या प्रकारचे यमनियम त्याग शिस्त  इत्यादिकांचे पालन केले तर तुम्हाला त्या सत्याचा स्पर्श होईल .नंतर मग आवश्यक तो बदल घडून यईल .ही समजूत हाही विचाराचाच एक भाग नाही काय?असा विचार हा एका विशिष्ट प्रकारे आकारित असलेल्या मनाचा उद्गार नाही काय ?जे मन विशिष्ट वातावरणात वाढले आहे, ज्या मनाला विशिष्ट प्रकारे विचार करावयाला शिकविले गेले आहे, अशा मनाचे हे विचार नाहीत काय?अशाप्रकारे मूर्ती प्रतिबिंब कल्पना प्रणाली श्रद्धा आशा निर्माण करून ,मग या आपल्या निर्मितीकडे, तुम्ही मूलगामी बदल घडवून आणण्याच्या आशेने बघता.            
                 
प्रत्येकाने अत्यंत असामान्य गूढ अशा या "मी"च्या, या "मनाच्या",सर्व हालचाली बघितल्या पाहिजेत.कल्पना, श्रद्धा, समजुती, प्रतिबिंबे,आराखडे, याबद्दल प्रत्येकाने जागृत असले पाहिजे .नंतर हे सर्व दूर केले पाहिजे.या सर्व फसवणुकी आहेत .त्या नाहीत काय?इतरांना कदाचित सत्याचा अनुभव आला असेल, परंतु जर तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाही, तर त्याबद्दल कल्पना करण्यात,त्याबद्दल आराखडे काढण्यात, आपल्यात सत्याचा अंश आहे, आपण परमेश्वर आहोत, अशी कल्पना करण्यात, आपण अमर आहोत असे समजण्यात, काय अर्थ आहे ? हे सर्व विचारांच्या क्षेत्रातील नाही काय ?जे काही विचाराच्या मनाच्या क्षेत्रातील असते ते आकारित असते. ते स्मरण असते .ते कालातील असते.आणि म्हणूनच ते सत्य नसते .जर एखाद्याला हे खरोखरच समजेल, कि कल्पनेने नव्हे, आशावादीपणाने नव्हे, मूर्खपणाने नव्हे ,परंतु शहाणपणातून मनाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक आशावादी शोध ,प्रत्येक तांत्रिक धडपड, समजूत, कल्पना, आशा, ही सर्व स्वफसवणूक आहे ,हे समजेल ,तर मग कुठली ताकद कुठची सृजनशील शक्ती बदल घडवून आणते. ?           
                     
कदाचित या मुद्दयावर येण्यासाठी आपण जागृत मन वापरले असेल ,आपण तर्कदृष्ट्या एखाद्या विधानाचा पाठपुरावा केला असेल, अापण त्याला विरोध तरी केला असेल किंवा ते मान्य तरी केले असेल, आपण स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे पाहिले असेल,असे आपण केले आहे काय?  यांच्यापेक्षा खोलवर जाण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी,शांत,जागृत, शोधतत्पर,मनाची आवश्यकता नाही काय?आपल्याला कुठल्याही कल्पनेचा पाठपुरावा करावयाचा नाही.कल्पनेचा पाठपुरावा म्हटले म्हणजे काय म्हटले जात आहे याबद्दल त्या पाठीमागून विचार करणारा आला व ताबडतोब द्वैत आले.जर तुम्हाला या विषयात, मूलगामी बदलात, खोलवर जाण्याची इच्छा असेल ,तर क्रियाशील मन स्तब्ध असणे आवश्यक ऩाही काय ?विचार करणारा व विचार,द्रष्टा व दृश्य यांचा गोंधळ, अनुभवणारा व अनुभवावयाचे,या दोन प्रक्रिया व यातील प्रचंड अडचणी जेव्हा मन स्तब्ध असेल तेव्हाच समजू शकेल.
                     
मानासिक सृजनशील क्रांती जेव्हा "मी"लुप्त होतो, जेव्हा विचार करणारा व विचार एकच होतो,जेव्हा द्वैत मावळते, जेव्हा विचार करणारा विचारांचे नियमन करीत नसतो, त्याच वेळेला होते.मी असे सुचवितो कि हा अनुभव सृजनशील शक्तीची सुटका करतो .ही सृजनशील शक्ती मूलगामी क्रांती घडवून अाणते .येथे मानसिक "मी"चे विघटन होते .           
                  
शक्तीचे मार्ग आपल्याला माहीत आहेत. शिस्त व ताबा यातून शक्ती निर्माण होते. राजकीय शक्ती संपादनातून आपण मूलगामी बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करतो .अशी शक्ती आपला अंधार आणखीच वाढवते . दुष्टता विघटन व "मी"चे दृढीकरण आणखीनच होते.  निरनिराळ्या प्रकारचे वैयक्तिक व सामाजिक प्राप्तीचे मार्ग आपल्याला माहीतच आहेत.परंतु प्रेमाचे मार्ग आपल्याला माहीत नाहीत.आपण त्या मार्गाचे कधी अनुसरण केलेले नाही.किंबहुना प्रेम म्हणजे  काय हेच आपल्यला माहित नाही.जोपर्यंत विचार करणारा ,हे "मी"चे केंद्र अस्तित्वात आहे, तोपर्यंत प्रेम अशक्य आहे. हे सर्व समजल्यावर मग एखाद्याने काय करावे ?              
                   
मूलगामी बदल घडवून आणला जाईल, सृजनशील मानसिक सुटका होईल, असा एकच मार्ग आहे.तो मार्ग म्हणजे अखंड जागृतता, अखंड सावधानता, प्रतिक्षणी सुप्त व प्रगट  हेतूंबद्दल जागृतता होय .ज्या वेळेला शिस्त, श्रद्धा, कल्पना, "मी"चे दृढीकरण करतात ,त्यामुळेच त्या निष्फळ आहेत हे आपल्याला समजते, ज्या वेळेला आपण प्रतिक्षणी प्रतिदिनी जागृत असतो ,ज्या वेळेला यातील क्षणाक्षणांचे सत्य अनुभवीत असतो , त्यावेळेला आपण जिथे विचार करणारा, स्वतःला सतत विचारांपासून ,दृश्यापासून, अनुभवण्याच्या वस्तूपासून, वेगळा राखीत असतो,अशा मध्यवर्ती बिंदूपाशी येऊन  पोचत नाही काय ?जोपर्यंत विचार करणारा विचारांपासून वेगळा आहे ,जोपर्यंत विचार करणाऱा त्यावर ताबा मिळवण्याचा त्याला आकार देण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला योग्य वळण देण्याचा योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे, तोपर्यंत मूलगामी बदल घडून येणे अशक्य आहे .जोपर्यंत "मी" हा द्रष्टा, अनुभवणारा, अनुभव संग्रह करणाऱा, स्वतःला अनुभवातून दृढ करणारा म्हणून अस्तित्वात आहे, तोपर्यंत मूलगामी बदल, सृजनशील सुटका अशक्य आहे .जेव्हां विचार करणारा हा विचार होतो त्याच वेळेला सृजनशील सुटका होते.विचार करणारा व विचार यातील ही फट प्रयत्नाने सांधता येणार नाही.जेव्हा मन कुठच्याही तऱ्हेचा आराखडा व शब्दीकरण करीत नसते ,जेव्हा विचार हा फक्त मीचे दृढीकरण करतो हे समजते,जेव्हा विचार करणारा हा विचारापासून वेगळा आहे तोपर्यंत मर्यादा आहे हे समजते, अपरिहार्यपणे द्वैतातून निर्माण होणारा विरोध लक्षात घेते, जेव्हा ते हे सर्व खरोखरच समजते तेव्हा ते आपोआपच जागृत बनते.आपोआपच अखंड पहारा अखंड साक्षित्व सुरू होते . अनुभवापासून अनुभव घेणारा कसा सतत वेगळा पडत असतो, तो अनुभवातूनच स्वतःला कसा दृढ करीत असतो ,अशाप्रकारे तो शक्तीचा कसा शोध घेत असतो, हे सर्व मन पाहाते लक्षात घेते अनुभवते .त्या जागृततेतच मन जर खोलवर अवगाहन करील, कुठच्याही वासने शिवाय कसलाही शोध घेण्याच्या इच्छेशिवाय,तळ गाठण्याच्या हेतूशिवाय, बुडी मारील तर अापोआप विचार करणारा व विचार एक आहे अशी स्थिती अस्तित्वात येईल .त्या स्थितीत प्रयत्न गैरहजर असतो. कुठच्याही प्रकारचे बनणे नसते . बदलाची वासना नसते तिथे "मी" नसतो .तिथे फक्त जो मनोनिर्मित नाही म्हणूनच मूलगामी आहे असा बदल अस्तित्वात असतो .  
                       
जेव्हा मन खरोखरच रिकामे असते कोरे असते तिथेच सृजनशीलता प्रगट होण्याचा संभव असतो .आपल्यापैकी बरेच जणांजवळ असलेल्या वरवरच्या उथळ रिकामेपणा बद्दल पोकळपणा बद्दल मी बोलत नाहीं .आपल्यापैकी बरेचजण रिकामे असतात .हा रिकामेपणा फरफटीतून वासनेतून प्रगट होत असतो.आपल्याला करमणूक हवी असते.आपल्याला खुशामत हवी असते .मग अापण पुस्तके वाचन रेडिओ प्रवचने व्याख्याने आचार्य याकडे वळतो .अशा प्रकारे मन सतत स्वतःचा पोकळपणा भरून काढीत असते. वरील प्रकारच्या  विचारशून्यतापूर्ण पोकळपणा बद्दल मी बोलत नाही.असामान्य विचारपरिपूर्णतेतून मन जेव्हा आभास निर्माण करण्याचे स्वतःचे सामर्थ्य पहाते व अशा प्रकारे त्याच्या पलीकडे जाते व रिकामे बनते त्या रिकामेपणा बद्दल मी बोलत आहे .              
                  
जोपर्यंत विचार करणारा अनुभव संग्रह करण्यासाठी वाट पाहात आहे, लक्ष देत आहे, "मी"चे दृढीकरण करण्यासाठी निरीक्षण करीत आहे,तोपर्यंत सृजनशील रिकामेपण अस्तित्वात येणार नाही.सर्व प्रतिके,सर्व संवेदनासहित सर्व शब्द,यापासून मन कधीतरी मुक्त होऊ शकेल काय ?जिथे अनुभवणारा अनुभव संग्रह करीत नसेल, अशा स्थितीत मन असणे शक्य आहे काय़ ?मनाला संपूर्णपणे सर्व प्रणाली ठसे अनुभव आचार्य हे दूर करणे व अशाप्रकारे रिकामे होणे शक्य आहे काय? या प्रश्नाचे तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही.स्वाभाविक आहे कारण या प्रश्नाचे उत्तर देणे तुम्हाला शक्य नाही .तुम्हाला माहीत नाही.तुम्ही कधी प्रयत्न केला नाही. तुम्ही कधी त्या दृष्टीने विचार केला नाही.
                   
मी असे सुचवितो की तुम्ही फक्त एेका. प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असू द्या.बीजारोपण होउं द्या.जर तुम्ही खरोखरच ऐकले असेल, जर तुम्ही त्याला विरोध केला नसेल, तर त्याला निश्चित फळे येतील .              

नवेच फक्त बदल घडवून आणू शकते.जुने नाही जर तुम्ही जुनाच साचा वापरीत असाल तर कुठचाही बदल हा जुन्याचेच सातत्य असतो. त्याच्यात नवीन काही नसते. जेव्हा मन स्वतःच नवीन बनते,  तेव्हा सृजनशीलता अस्तित्वात येते .मन स्वतःचे नूतनीकरण जेव्हां ते स्वतःच्या उथळ व खोल ,सुप्त व प्रगट,  हालचाली पहाण्याला समर्थ असते,तेव्हाच करू शकते .मन स्वतः घातलेला पसारा पहाते, स्वतःच्या हालचाली लक्षात घेते,स्वतःच्या इच्छा वासना मागण्या कल्पना शोध आचार्यनिर्मिती भीती याबद्दल जागृत होते .शिस्त यम नियम यातून निर्माण होणारा विरोध पाहते .ज्या आशेतून श्रद्धा व कल्पना यांचा आराखडा केला जातो, ती अाशा श्रद्धा व कल्पना  पहाते.जेव्हा मन या सर्वांना आरपार बघू शकते, जेव्हा ते या सर्व प्रक्रियेबद्दल जागृत असते, तेव्हा ते हा सर्व पसारा झुगारून देते.अशाप्रकारे मन नवीन बनून, सृजनशील रिकामे बनू शकेल काय ?तुम्ही जरूर हे शोधून काढाल .तुम्ही पूर्व मतांशिवाय फ़क़्त प्रयोग केला पाहिजे .ती सृजनशील स्थिती अनुभवण्याच्या वासनेशिवाय फक्त प्रयोग केला पाहिजे . जर तुम्हाला ती सृजनशील स्थिती अनुभवण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती जरूर अनुभवाल.पण ज्याचा तुम्ही अनुभव घेता ती स्थिती सृजनशील रिकामेपणा नसेल .तो फक्त तुमच्या वासनेचा आराखडा असेल .जर नवीन अनुभवण्याची तुमची वासना असेल, तर तुम्ही फक्त आभासात मशगूल होत आहात, परंतु जर तुम्ही खरोखरच निरीक्षण सुरू कराल ,स्वतःच्या हालचालींबद्दल प्रतिक्षणी प्रतिदिनी जागृत असाल, स्वतःची संपूर्ण प्रक्रिया आरशात प्रतिबिंब पाहावे त्याप्रमाणे पाहात असाल, तर तुम्ही जसजसे खोल जाल तसतसे तुम्ही या सृजनशील खोल रिकामेपणात जाल.जिथे फक्त नवीन संभवते तिथे जाऊन पोचाल.   
                      
सत्य परमेश्वर किंवा तुम्ही काय म्हणाल ते नावाला महत्त्व नाही हे अनुभवण्याची चीज नाही .अनुभव म्हटला कि अनुभवणारा आला .ही सर्व काल प्रक्रिया आहे .तुमचे संस्कार आले .तुमचे भूत आले.जोपर्यंत अनुभवणारा आहे तोपर्यंत सत्य गुप्त असते.या विघटन करणाऱ्या, फोड करणार्‍या, विश्लेषण करणाऱ्या,  स्पष्टीकरण करणार्‍या, ओळखणार्‍या, अनुभवणार्‍या या सर्वांपासून मन मुक्त असते, स्वतंत्र असते, तेव्हाच सत्य असते.तेव्हाच तुम्हाला उत्तर सापडेल .तुमच्या मागणीशिवाय निमंत्रणाशिवाय बदल घडून येतो असे तुम्हाला आढळून येईल .सृजनशील रिकामेपणा ही मशागत करून प्राप्त करून घेण्याची वस्तू नाही.ती असतेच. ती आहेच. ती गुप्तपणे प्रगट होते.ती बोलावण्याशिवाय येते. ती अकस्मात येते . ती एकदम येते . फक्त त्याच आणि त्याच स्थितीत क्रांतीची नाविन्याची नूतनीकरणाची ताजेपणाची शक्यता आहे.

समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel