नेहमी आपल्यापुढे एक प्रश्न उभा राहतो .व्यक्ती प्रथम की समाज प्रथम. व्यक्तीसाठी समाज आहे की समाजासाठी व्यक्ती आहे.मी व तुम्ही समाजाच्या एका विशिष्ट ध्येयपूर्तीचे साधन आहोत कि समाज तुमच्या व माझ्यासाठी आहे .व्यक्तीसाठी समाज व सरकार आहे कि समाजासाठी  व सरकारसाठी  व्यक्ती आहे . याचा निकाल तुम्ही कसा काय लावणार आहात ?हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, असे तुम्हाला वाटत नाही काय ?जर व्यक्ती हे  केवळ साधन असेल ,तर समाज हा व्यक्तीपेक्षा फार महत्त्वाचा आहे .व्यक्तीला त्याचे म्हणून काही स्वतंत्र ध्येय आहे का ?जर समाज व्यक्तीपेक्षा मोठा असेल, जर त्याला त्याचे काही स्वतंत्र ध्येय असेल,  तर व्यक्ती गौण ठरते .समाज म्हणजे शेवटी काही लोकांचा समाजधुरीण म्हणून स्थापन झालेला गट होय .म्हणजे शेवटी काही व्यक्ती व त्यांच्या व्यक्तिगत धारणा होय .  अश्या परिस्थितीत व्यक्तिमत्व म्हणून असलेल्या सर्व व्यक्तिगत गोष्टींचा त्याग करणे आवश्यक ठरेल  . शिक्षण क्रम बदलावा लागेल .व्यक्तींचे  समाज (विशिष्ट व्यक्तींचा गट ) काहीही करू शकेल .परंतु जर समाज हा   व्यक्तींसाठी असेल, तर समाजाचे हे प्रथम कर्तव्य आहे, कि व्यक्ती ही व्यक्ती म्हणून राहिली पाहिजे . त्याला कोणत्याही साच्यात बसवण्याचा प्रयत्न होता कामा नये .त्याच्या संपूर्ण विकासाला वाव व संधी मिळाली पाहिजे . तुम्ही याचा निर्णय कसा काय लावणार आहात ?याची कशी काय चर्चा करणार आहात?हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत .कुठच्याही प्रकारच्या डाव्या किंवा उजव्या मत- प्रणालीवर हा अवलंबून नाही .कल्पना या नेहमी गोंधळ, द्वेष व विरोध निर्माण करतात .तुम्ही जर फक्त मतांवर, पुस्तकांवर, मोठे लोक काय म्हणतात, यावर अवलंबून राहणार असाल, तर मग ते तथाकथित मोठे लोक कुणीही असोत, मार्क्स बुद्ध ख्रिस्त शंकराचार्य भगवान कृष्ण वा एखादा भांडवलदार लेखक, ती शेवटी केवळ मतेच आहेत. सत्य नव्हे. वस्तुस्थिती केव्हाही नाकारता येणार नाही .त्यावरील मते नाकरता येतील .आपण जर वस्तुस्थिती जाणून घेतली तर आपण कोणाच्याही मतांच्या आधाराशिवाय स्वतंत्र पणे विचार करू शकू .


                    निरनिराळी मते कशी निर्माण होतात.कुठलीही मते ही केवळ त्या व्यक्तीच्या विशिष्ट धारणेतून निर्माण झालेली असतात .तेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून राहणार ?जर आपण केवळ मताने बांधले जाऊ तर आपल्याला खरे ज्ञान होणार नाही . आता याबद्दलचे सत्य कसे काय  ओळखायचे?आपण मग कसे वागावे ?वस्तुस्थितीचे आकलन होण्यासाठी तुम्ही या सर्व प्रचारापासून दूर राहिले पाहिजे .तरच तुम्ही स्वतंत्रपणे वस्तुस्थितीकडे पाहू शकाल . तुम्ही कोणाही पुढाऱ्यावर किंवा मार्गदर्शकांवर अवलंबून राहता कामा नये .तुम्ही बरोबर याच्या उलट करीत असता.तुम्हाला कोणाचा ना कोणाचा आधार लागतो .तुम्हाला कुणावर तरी अवलंबून राहायला आवडते .तुम्हाला अवतरणे द्यायला आवडते. .तुम्ही एखादा नेता पुढारी मार्गदर्शक किंवा गुरू निवडता . त्याशिवाय तुम्हाला सुरक्षितता व आधार वाटत नाही .अमुक अमुक पुस्तकात (भगवद्गीता बायबल कुराण ग्रंथसाहेब किंवा आणखी काही )काय दिलेले आहे ते सांगितल्याशिवाय तुम्हाला बरे वाटत नाही .याचे कारण तुम्ही अंतर्यामी फार गोंधळलेले आहात .त्याच्यावर (विशिष्ठ ग्रंथ गुरु पुढारी इत्यादी )विश्वास ठेवून, त्याने सांगितल्याप्रमाणे वागून, आपण निश्चिंत होऊ, आपले सर्व प्रश्न सुटतील ,असे आपल्याला वाटते .असा आपला ठाम विश्वास असतो .पुढारीही तितकेच गोंधळलेले असतात .    ज्याला कुठलाही प्रश्न समजून घ्यायचा आहे ,जो खरा जिज्ञासू आहे ,त्याने नुसता प्रश्न समजून घेऊन भागणार नाही ,तर त्या प्रश्नाचा पाठलाग करणे आवश्यक आहे .कुठचाही प्रश्न हा गतिशून्य नसतो .तो गतिमान असतो .तो प्रत्येक क्षणी  नवीन असतो .प्रश्न भाकरीचा असो वा तत्वाचा असो.कोणताही आघात हा नवा  असतो.त्याचे स्वरूप समजण्यासाठी अत्यंत निर्मळ व तरल मनाची आवश्यकता असते .मला असे वाटते की आंतरिक ,मूलगामी व सर्वागीण क्रांतीची गरज, बर्‍याच जणांना पटलेली आहे .बाह्य स्थिती बदलण्याचा तोच एक उपाय आहे .हा एकच विचार माझ्या व इतर तळमळीच्या लोकांच्या मनात आहे .


                    आज आपला समाज पुरुष किडलेल्या व मोडकळीला आलेल्या स्थितीत दिसत आहे .त्याच्यात आपल्याला कितीतरी दोष दिसत आहेत .याच्यात सर्वांगीण बदल कसा घडून आणावयाचा हा प्रश्न आहे .व्यक्तिगत आंतरिक क्रांतीशिवाय ,बाह्य स्थिती बदलणार नाही हे सत्य आहे .वस्तुत: समाज हा नेहमीच  गतिशून्य असल्यामुळे ,आंतरिक क्रांती विना घडवून आणलेला  कुठचाही बदल , हा तितकाच गतिशून्य असतो .व्यक्तिगत आंतरिक नेित्य क्रांतीशिवाय सर्व व्यर्थ आहे .त्याशिवाय सर्व क्रिया यंत्रवत बनतात.ती केवळ नक्कल  ठरते.


                   सभोवार असलेली दुःखे क्लेश गोंधळ यांच्याशी तुमचा कोणता संबंध आहे ? ती काय आपोआप निर्माण झालेली आहेत ?तुम्ही व मी ती निर्माण केलेली आहेत .ती कम्युनिस्ट फॅसिस्ट भांडवलशाही वा इतर कोणत्या शाहीने निर्माण केलेली नाहीत(या शाही आपण निर्माण केलेल्या आहेत ) .ती तुम्ही व मी एकमेकांशी असलेल्या संबंधातून निर्माण केलेली आहेत .


                     तुम्ही आत जसे आहात तसेच बाहेर वागता.तुमचे विचार ,तुमच्या भावना ,तुमच्या कल्पना, तुमच्या श्रद्धा, व प्रत्येक क्षणी तुमचे असलेले विचार, याप्रमाणे तुमची बाह्य  वर्तणूक असते .आणि तेच जग होय .आपण आत जसे असतो तसे बाहेर वागतो .आणि तेच जग . तेव्हा जर आपण स्वयंकेंद्रित, कोत्या मनाचे ,राष्ट्रीय जातीय पक्षीय विचारसरणीचे, गोंधळलेले, दुटप्पी ,दु:खी व अस्वस्थ असू, तर आपली बाह्य  वर्तणूकही त्याप्रमाणेच होते.आणि त्यामुळे सर्व जगच दुःख व गोंधळात सापडते. तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला जग दिसते .तुमचा व जगाचा असे दोन वेगवेगळे प्रश्न नाहीत .तो एकच प्रश्न आहे .आणि सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे .ही फार सोपी गोष्ट आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?आपल्या बाह्य आचरणामध्ये ही गोष्ट आपण विसरल्यासारखे दिसतो .आपल्याला कुठल्या तरी मतप्रणालीने ,कुठल्यातरी वैचारिक क्रांतीने ,कि जी पुन्हा- कुठल्या तरी पंथांवर तत्वावर अवलंबून आहे, क्रांती घडवून आणायची असते .ती घडेल असा आपला विश्वास असतो .या सर्वाला ,आपण जबाबदार आहोत, ही गोष्ट आपण साफ विसरून गेलेले असतो . 
                     याला आपण जबाबदार आहोत, हा सर्व गोंधळ अापण आपल्या परस्पर संबंधातून निर्माण केलेला आहे, ही गोष्ट आपण सोइस्करपणे विसरून गेलेले असतो .हे संबंध म्हणजे आपल्या वैचारिक गोंधळाचे प्रतिबिंब आहे .तेव्हा आपण प्रथम स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या रोजच्या अन्न वस्त्र मिळवण्याच्या धडपडीच्या व आपले विचार आपल्या श्रद्धा आपल्या कल्पना यांच्या संबंधांतून निर्माण होणाऱ्या प्रगटीकरणाकडे,  अापण लक्ष दिले पाहिजे.अन्न वस्त्र मिळविण्यासाठी होणारी धडपड व आपल्या श्रद्धा, आपल्या कल्पना ,यांच्याशी आपले असलेले संबंध, एवढेच दैनंदीन  अस्तित्व नाही काय?अन्न वस्त्र मिळवणे, नोकरी करणे, पैसे मिळविणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे, शेजार्‍यांचा परामर्ष  घेणे ,आणि काही विशिष्ट श्रद्धा व कल्पना बाळगणे, याशिवाय आपण काय करीत असतो ? 


                  आता  प्रत्येक जण जर आपला व्यवसाय पाहील, तर  त्याला असे आढळून येईल, कि तो द्वेष व मत्सर यावर उभा आहे .हे शब्द जरा कठोर वाटतील ,परंतु प्रत्येकाने नीट अंतरंगात विचार करावा .तो केवळ पोटाचा प्रश्न नाही. त्यात सत्ता-लालसा(आर्थिक सामाजिक राजकीय व्यावसायिक वगैरे ) आहे  .समाजाची धारणाच अशी आहे की त्यात द्वेष लालसा मत्सर हे भरून राहिलेले आहेत .कारकुनाला मनातून साहेब बनावयाचे असते .मजुराला सुपरवायझर मालक व्हावे असे वाटते. तो केवळ भाकरीचा प्रश्न नसतो .प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये आणखी वर ,आणखी वर ,जायचे असते .प्रत्येक जण  केवळ भाकरीचा प्रश्न सोडवीत नसतो .त्याला सत्ता हवी असते त्याला मान हवा असतो .ही सत्ता राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची असू शकेल .या सत्ता- लालसे मुळे जगात भयंकर उत्पात निर्माण होतात .कारकून जेव्हा मॅनेजर बनण्याची इच्छा करतो तेव्हा सत्तेच्या राजकारणातील तो एक घटक बनतो .अशाप्रकारे अंशत:का होईना युद्धाची जबाबदारी सरळ त्याच्यावर येऊन पडते . 


                 अापण प्रेमाबद्दल नेहमी फार बोलत असतो .पण सूक्ष्म जागृत निरीक्षणानंतर काय आढळून येते ?आपले संबंध प्रेमावर आधारित आहेत काय ? जर ते प्रेमावर आधारित असते तर सगळीकडे आपल्याला सुसूत्रता व शांतता आढळून आली असती.आपण सर्व सुखी असतो . आपल्या या संबंधांमधून बऱ्याच वेळा कु-इच्छा ,आदराद्वारे प्रगट होत असतात.आपण दोघेही जर विचार भावना यांनी समान असू, तर तिथे आदर ,मान ,अस्तित्वात असण्याचे काही कारण नाही .मित्र मित्राला आई मुलाला जशी भेटते तसे अापण भेटू .तिथे कु-इच्छा संभवत नाही .आपण दोन व्यक्ती म्हणून भेटू . अनुनायी व प्रेषित म्हणून नव्हे.  चढेल नवरा व गुलाम बायको किंवा चढेल बायको व शेळपट नवरा म्हणून नव्हे. वरिष्ठ व कनिष्ठ म्हणून नव्हे .कु-इच्छेतून मत्सर, मत्सरातून सत्ता-लालसा, वर्चस्व-लालसा ,व त्यातून क्रोध निर्माण होतो .त्यातून विरोधाचा ज्वर होतो .नंतर कदाचित यापासून दूर पळण्याचा आपण प्रयत्न करतो .यामुळे गोंधळात आणखीच भर पडते . आपल्या दैनंदिन अस्तित्वाचा एक भाग, अश्या ज्या या कल्पना, त्यांचा आपण विचार करू .श्रद्धा व कल्पना यांमुळे आपले मन विकृत स्वरूप धारण करीत नाही काय़ ? 


                     मूर्खपणाची व्याख्या काय ?हाताने व मनाने निर्माण केलेल्या जड व सूक्ष्म वस्तूंना व कल्पनांना ,अवास्तव महत्व देणे म्हणजे मूर्ख पणा नाही काय ?आपले बहुतेक विचार हे स्वसंरक्षणाच्या मूलभूत प्रवृत्तीतून निर्माण झालेले नसतात काय ?निष्कारण आपण,आपल्या बऱ्याच कल्पनाना व श्रद्धाना ,मूलत: अस्तित्वात नसलेले महत्त्व,देत नसतो काय?जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या विशिष्ट प्रणालीवर विश्वास ठेवतो, मग ती आर्थिक धार्मिक सामाजिक राजकीय कुठल्याही प्रकारची असो ;देव, धर्म ,राष्ट्रीयत्व, किंवा आणखी कुठली कल्पना, श्रद्धा, याना महत्त्व देतो, त्यावर प्रगाढ विश्वास ठेवतो ,तेव्हा एक व्यक्ती दुसर्‍या  व्यक्तींपासून अलग केली जात नाही काय? आपण मूर्खपणाने वागत नसतो काय ?यामुळे व्यक्ती दूर केल्या जात नाहीत काय ?आपण कुठल्या ना कुठल्या कल्पना व श्रद्धा यांना अवास्तव महत्त्व देत नसतो काय ?यावरून हे स्पष्ट होईल ,कि ज्या प्रकारे आपण विचार करीत असतो व वागत असतो ,त्यामुळे सुसूत्रता प्रस्थापित होईल ,शांतता निर्माण होईल ,कि गोंधळ झगडे वादविवाद व विषाद निर्माण होईल ?आनंद निर्माण होईल की दुःखे निर्माण होतील ? 


              व्यक्तींमध्ये आंतरिक क्रांती कशी घडून येईल हा मुख्य प्रश्न आहे .स्थिर समाजामध्ये सदैव आंतरिक क्रांती घडून येत असलेला मनुष्य कसा निर्माण होईल हा मुख्य प्रश्न आहे .आपल्याला तत्काळ समाज परिवर्तन हवे असते .सर्व जगात यासाठीच प्रयत्न चालले आहेत .सामाजिक क्रांती ही व्यक्तीबाह्य आहे ती कितीही मूलगामी व दूरगामी म्हटली तरी ती मूलतः गतिशून्य आहे .जोपर्यंत अंतर्गत क्रांती  होत नाही तोपर्यंत बाह्य क्रांतीला शून्य महत्व आहे .झपाट्याने विघटन होत असलेला ,गतिशून्य व यंत्रवत हालचाल करणारा, असा नव्हे तर सदैव जागृत ,असा समाज निर्माण करावयाचा असेल, तर अंतर्गत क्रांती अत्यावश्यक आहे .मानसिक क्रांतीशिवाय बाह्य क्रांतीला महत्त्व नाही .दूरवरचा विचार करून ,कितीही विचारपूर्वक व दूरगामी परिणाम करणारे कायदे केलेले असोत ,समाज हा नेहमी विघटनाच्या अवस्थेत असतो .बाह्य क्रांती उपयोगी नाही .आंतरिक क्रांती झाली पाहिजे. मला असे वाटते की हा मुद्दा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे .वरवर विचार करून सोडून देण्यासारखा हा मुद्दा नाही .बाह्य क्रांती पूर्ण होते त्यानंतर ती गतिशून्य बनते .


                आंतरिक क्रांतीशिवाय झालेली बाह्य क्रांती  ही व्यक्तीला पचवून टाकते .मुद्दा समजण्यासाठी फॅसिस्ट साम्यवादी किंवा भांडवलवादी क्रांती लक्षात घ्या .त्यात व्यक्तीची स्थिती काय झाली ते इतिहासात पहा. त्यामुळे व्यक्ती गतिशून्य व यांत्रिक बनते .ही गोष्ट जर खरोखरच समजेल व उमजेल तर ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.समाज हा नेहमी गतिशून्य असतो व तो व्यक्तीला पचवून टाकतो ही वस्तुस्थिती आहे .कुठच्याही समाजाकडे पाहिले असता ही गोष्ट लक्षात येईल .विचारवंताला रोजच्या जीवनात पदोपदी जाणवणारी ही गोष्ट आहे .समाज कोसळतो आहे. त्याची पुनर्रचना करण्यासाठी ,लोकोत्तर पुरुषांची गरज आहे ,हे सांगण्यासाठी महान इतिहासचार्यांची गरज नाही . या सगळ्या इमारतीचा पायाच चुकीचा आहे .जोपर्यंत पाया बदलत नाही, तोपर्यंत कितीही वेळा इमारत बांधली, कितीही विचार करून बांधली, तरी ती हळूहळू कोसळण्याच्या मार्गावरच असणार .तुम्ही व मी शिल्पकार बनले पाहिजे .जर आपण धंदेवाईक, राजकीय किंवा धार्मिक ,शिल्पकारांवर अवलंबून राहू, तर बरोबर पूर्वीच्या स्थितीतच राहू . 


                तुम्ही व मी यातील संबंध म्हणजेच समाज .आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब ,म्हणजे आपले संबंध, म्हणजेच  समाज होय .हा समाज, हे संबंध ,किडके व कोसळत असलेले, आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत . जोपर्यंत आपण सृजनशील बनणार नाहीं,  तोपर्यंत आंतरिक स्थिती बदलणार नाही .जोपर्यंत आंतरिक स्थिती बदलणार नाही, तोपर्यंत बाह्य संबंध व समाज बदलणार नाही.अांतरिक क्रांती घडवून आणण्यासाठी केवळ नक्कल, अनुकरण ,उपयोगी पडणार नाही .सृजनशील जाणीव, समजामधून निर्माण झाली पाहिजे .


                     यासाठी हे झालेच पाहिजे ,असेच झाले पाहिजे, अशा तऱ्हेची विचारसरणी उपयोगी पडणार नाही .अशी परिस्थिती का आहे?अश्या दृष्टीने विचार केला पाहिजे .अश्या तर्‍हेच्या सकारात्मक विचारातूनच, खरी समज प्राप्त होते .नवीन समाजरचना करण्यासाठी व्यक्ती सृजनशील, जाणीवयुक्त ,बनली पाहिजे असे म्हणून ,जर आपण सृजनशील विचार म्हणजे काय हे पहायला जाऊ, तर बरोबर खोडय़ात अडकू .एका प्रणालीच्या ठिकाणी दुसरी प्रणाली अस्तित्वात येईल .अश्या तऱ्हेचा विचार म्हणजे केवळ नक्कल असेल .ती दुसरी इमारत असेल, परंतु पाया पूर्वीचाच असेल .काय कोसळत आहे ते पहाण्याअगोदर ,ते कां कोसळत आहे ,ते पाहिले पाहिजे . समाज  कोसळत आहे ,याचे प्रमुख कारण म्हणजे तुम्ही वस्तुत: सृजनशील असूनही  सृजनशीलता विसरलेले आहात .आपण खरे स्वतंत्र असूनही ,धारणेने बद्ध झालेले आहोत .
                 अापण केवळ नकलाकार विदुषक बनले आहोत. आपण पोपटपंची करीत असतो .सदैव आपण कसली ना कसली नक्कल करीत असतो .एखादी तांत्रिकता ,अन्य कला, शास्त्र ,इ.शिकताना शिकविताना व  आचरणात आणताना  थोडी बहुत नक्कल अपरिहार्य आहे .त्याचप्रमाणे संवाद करताना नक्कल अपरिहार्य आहे .परंतु ज्यावेळी आपण वैचारिक नक्कल करतो ,त्यावेळी अापण सृजनशीलते पासून वंचित होतो .आपले शिक्षण, आपली समाज व्यवस्था ,आपले धार्मिक जीवन ,ही कसली ना कसली नक्कल आहे.मी कुठल्या ना कुठल्या साच्यात बसतो.तसे साच्यात बसण्याला मला आवडते .मी एक यंत्र बनलो आहे .मी माझ्या धारणे प्रमाणे मग ती हिंदू बौद्ध ख्रिश्चन शीख मुसलमान कम्युनिस्ट भांडवलदार भारतीय अमेरिकन वा इंग्लिश कोणतीही असो ,त्याप्रमाणे वागतो .आपल्या प्रतिक्रिया या धारणेवर अवलंबून असतात .मग ती पाश्चिमात्य असेल ,किंवा पौर्वात्य असेल ,धार्मिक असेल, किंवा जडवादी असेल ,त्याने काही फरक पडत नाही .समाज विघटनाचे प्रमुख कारण म्हणजे आपण नकल्ये बनलो आहोत .


                   दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे  नेते मंडळी .नेते म्हणजे मूर्तिमंत नक्कल होय.हे नेते धार्मिक आर्थिक राजकीय सामाजिक इत्यादी कुठल्याही क्षेत्रातील असतील . 


                 तेव्हा समाज विघटनाचे कारण समजण्यासाठी ,तुम्ही व मी सृजनशील बनू शकू का? त्याचा तपास करणे योग्य ठरणार  नाही काय?आपल्याला हे स्पष्टपणे कळून चुकले आहे कि नक्कल म्हणजे विरोध व विघटन . जेव्हा जेव्हा अापण श्रेष्ठत्व मानतो, श्रेष्ठ ज्ञानी पुरुष म्हणून कोणाला ना कोणाला मानतो, जेव्हा जेव्हा आपण सर्व कांही त्याला समजते ,तो सांगेल ते प्रमाण ,असे म्हणतो तेव्हां तेव्हां नक्कल अनुनायित्व व  विरोध  येतो .कोणालाही मोठा किंवा शहाणा समजण्याचे कारण नाही .कोणीतरी मोठा व शहाणा आहे ,त्याला सर्व काही कळते, असे आपल्याला कां वाटते, ते समजून घेतलं पाहिजे.तरच आपण सृजनशील होण्याची शक्यता आहे .जेव्हा आपण स्वतंत्र विचार करीत आहोत असे म्हणतो तेव्हाही आपण कोणाची ना कोणाची नक्कल करीत असतो .जेव्हा आपण कुणाचीही नक्कल करीत नसतो ,असे फार थोडे क्षण असतात.त्या वेळी आपल्याला एक प्रकारचा ताजेपणा, नाविन्य, सृजनशीलता, आनंद व विशिष्ट अनुभूती ,वाटत नाही काय? 
              सारांश---श्रेष्ठतापूजा हेच समाज विघटनाचे मूळ कारण आहे असे आपल्याला आढळून आले असेल--- . 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel