आपण स्वार्थी असू नये, आपण स्वयं-केंद्रित असू नये, अशी शिकवण आपल्याला नेहमीच दिली जाते.स्वयं-केंद्रित क्रियेला विरोध करण्यासाठी दिली जाणारी आमिषे व आश्वासने आपल्याला माहीत आहेतच.नरकाची भीती, नाना प्रकारच्या धमक्या, धि:काऱ, यांनी मनुष्याला स्वयं-केंद्रित क्रियेपासून  रोखण्यासाठी, प्रत्येक धर्माने प्रयत्न केलेला आहे .स्वयंकेंद्रित क्रियेपासून रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे नंतर राजकीय संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.तिथेही पुन्हा मनधरणी धमक्या शिक्षा व आमिषे आहेतच .तिथेही काल्पनिक नंदनवन उभे करण्याचे मनसुबे आहेतच .निरनिराळ्या कारणांसाठी अगदी लहान प्रमाणापासून,प्रचंड प्रमाणापर्यंत निरनिराळ्या कारणांसाठी  असंख्य कायदे यासाठी केलेली आहेत.परंतु सर्वांची स्वयंकेंद्रित क्रिया चालूच आहे .आपल्याला फक्त एवढी एकाच प्रकारची क्रिया माहिती आहे असे दिसते .जर आपण याचा विचार केला तर अापण त्यात, म्हणजे कायद्यामध्ये वगैरे सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.या  स्वयंकेंद्रित क्रियेची दिशा बदलण्याचाही प्रयत्न केला जातो.परंतु खोलवर बदल कधीच होत नाहीत.
                  
फक्त एका स्वयंकेंद्रित क्रियेच्या ठिकाणी दुसरी स्वयंकेंद्रित क्रिया येते.स्वयंकेंद्रित क्रियाच संपुष्टात येत नाहीत.सर्व विचारवंत या वस्तुस्थितीबद्दल ,क्रियेबद्दल, जागृत आहेत.त्यांना हेही माहीत आहे की "मी" पासून "अहम्"पासून उद्भवणारी, ही स्वयंकेंद्रित क्रिया जेव्हा संपुष्टात येईल, तेव्हाच आनंद अस्तित्वात येईल.बरेच जण ही स्वयंकेंद्रित क्रिया असावयाचीच असेही मानतात .ती अपरिहार्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे .ती ताब्यात ठेवता येईल, तिला हवी तशी दिशा देता येईल,तिचा आकार बदलता येईल,परंतु ती नष्ट करता येणार नाही, असे त्यांचे मानणे आहे .जे याहून गंभीर आहेत,ज्यांना याबद्दल जास्त कळकळ आहे ,त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या स्वयं-केंद्रित प्रक्रियेबद्दल अखंड जागृत राहून, त्याच्या पलीकडे जाता येईल कि नाही, त्याचा शोध घेतला पाहिजे.            
               
ही स्वयं-केंद्रित क्रिया समजून घेण्यासाठी आपण तिच्याकडे पाहिले पाहिजे.तिची तपासणी केली पाहिजे. या क्रिये बद्दल संपूर्ण सदैव जागृत असले पाहिजे.जर आपण त्याबद्दल जागृत असू तर ती कधीतरी  विरघळण्याची  शक्यता आहे .जागृतता असण्यासाठी एक विशिष्ट समज ,सुधारणा, धि:कार किंवा भाष्य केल्याशिवाय, स्वयं-केंद्रित  क्रिया जशी आहे तशी पाहण्याची, व तिला तोंड देण्याची, समर्थता आवश्यक आहे.आपण काय करीत आहोत,सर्व क्रिया या "मी" पासून कशा उद्भवतात, याबद्दल आपण सदैव जागृत असले पाहिजे.सावध असले पाहिजे .आपली पहिली अडचण ही आहे ,कि ज्या क्षणी आपण या स्वयंकेंद्रित क्रियेबद्दल जागृत होतो, त्याच क्षणी ती अापण ताब्यात ठेवावी, तिच्यात सुधारणा घडवून आणावी, तिचा धि:कार करावा, तिला योग्य आकार द्यावा, अशा अनेक इच्छा व हेतू निर्माण होतात.त्यामुळे तिच्याकडे ती जशा स्थितीत आहे तशी पाहणे अशक्य होऊन बसते.
                   
जेव्हां आपण सरळ सरळ बघतो, त्यावेळी आपण काय करावे हे जाणण्यासाठी, फारच थोडे जण समर्थ आहेत .             
                   
स्वयं-केंद्रित क्रिया नाशप्रद आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.त्या उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत हा आपला अनुभव आहे .देश, जात,धर्म,पंथ,एखादी विशिष्ट जमात, एखादी विशिष्ट वासना,यापैकी एका किंवा अनेकांशी समरसता,चालू जीवनात किंवा मरणोत्तर जीवनात एखाद्या फलप्राप्तीची इच्छा,एखाद्या कल्पनेचे उदात्तीकरण,एखाद्याचे अनुकरण,थोडक्यात कांही ना कांही बनणे,या सर्व क्रिया स्वयंकेंद्रित मनुष्याच्या आहेत हेही आपल्याला माहीत आहे .निसर्ग,लोक ,व कल्पना, यांच्याशी असलेली आपली संबंधरूपता,त्याचे स्वयं-केंद्रितता हे फल आहे, हेही आपल्याला माहीत आहे .हे सर्व लक्षात आल्यावर एखाद्याने काय करावे ?एक शिस्त म्हणून नव्हे,स्वतःवर ताबा ठेवून नव्हे, योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न म्हणून नव्हे,तर काहीही न करता, केवळ समजुतीतून ही स्वयंकेंद्रित क्रिया आपोआप नष्ट झाली पाहिजे .               

ही स्वयंकेंद्रित क्रिया गोंधळ व खटय़ाळपणा करते याबद्दल आपल्यापैकी बरेचजण जागृत आहेत. परंतु आपण कांही वेळा व कांही दिशांनीच जागृत असतो.आपण स्वयंकेंद्रित क्रिया लोकांच्यात पाहतो परंतु स्वतःबद्दल मात्र अनभिज्ञ  असतो.स्वतःबद्दल जागृत असलो तरी तिला ताब्यात ठेवण्याची,तिला वळण देण्याची,तिला नष्ट करण्याची, तिच्या पलीकडे जाण्याची, आपण इच्छा करतो.तसा प्रयत्नही आपण करतो. परंतु हा प्रयत्न हीच एक स्वयंकेंद्रित क्रिया आहे हे आपल्या लक्षात येत नाही.
                   
ही स्वयंकेंद्रित क्रिया हाताळण्यासाठी प्रथम ती अस्तित्वात कां येते व कशी येते हे आपल्याला माहीत असायला नको काय ?प्रथम कांही समजण्यासाठी आपण त्याकडे डोळे उघडे ठेवून बघण्याला समर्थ असलो पाहिजे .नंतर जागृत व सुप्त पातळ्यांवरील तिच्या निराळ्या हालचाली आपल्या लक्षात आल्या पाहिजेत .सुप्त हेतू व वासनांच्या स्वयंकेंद्रित हालचाली आपल्या लक्षात आल्या पाहिजेत.               
                   
जेव्हां मी विरोध करीत असतो,जेव्हां माझ्या पदरात निष्फळता पडते,जेव्हां मी एखाद्या विशिष्ट इप्सित हेतूच्या साध्यासाठी प्रयत्न करीत असतो,तेव्हां मला या"मी"च्या हालचालींची जाणीव होत नाही काय़ ? जेव्हां एखादे सुख संपुष्टात येते,मला ते आणखी हवे असते,आणि नंतर सुखप्राप्तीसाठी मी वस्तुस्थितीला विरोध करतो,विशिष्ट ध्येय प्राप्तीच्या इच्छेने मनाला वळण देतो,आकार देतो, त्यावेळी मी या"मी" च्या हालचालींबद्दल जागृत असतो काय ?जेव्हां मी मुद्दाम हेतूपुरस्सर सद्गुण मशागत करीत असतो तेव्हां या "मी" च्या हालचालींबद्दल मी जागृत असतो काय ?जो सद्गुण मशागत करतो तो निश्चित दुर्गुणी आहे .सद्गुण कमावता येत नाहीत आणि यातच त्याचे सौंदर्य आहे.               
                     
ही स्वयं-केंद्रित क्रिया  कालोत्पन्न नाही काय ? जोपर्यंत सुप्त वा जागृत कुठच्याही दिशेने हे केंद्र आहे तोपर्यंत काल प्रक्रिया चालू आहे .मी भूत व वर्तमान यांच्या संदर्भात भविष्याबद्दल जागृत आहे.या"मी"ची स्वयं-केंद्रित क्रिया ही काल-प्रक्रिया आहे .या केंद्राच्या क्रियेतील सातत्य हे स्मरणामुळे राखले जाते.या "मी"ला क्षणोक्षणी स्मरणा मुळे जीवन दिले जाते.जर तुम्ही स्वतःवर अखंड जागृत पहारा कराल आणि या क्रिया केंद्राबद्दल जागृत असाल तर तुम्हाला असे आढळून येईल कि ही एक कालप्रक्रिया आहे .स्मरण, संस्कार, संग्रह,अनुभव,याशिवाय यांच्यात कांही नाही.स्वयंक्रिया म्हणजे ओळखणे, म्हणजेच मनाची क्रिया, हेही तुमच्या लक्षात येईल.                     
मन या सर्वांपासून मुक्त होऊ शकेल काय?क्वचित् कांही तुरळक प्रसंगी हे शक्य होईल.जेव्हां आपोआप एखादी हेतू विरहित क्रिया घडते तेव्हां हे होत असते,परंतु मनाला सदैव या स्वयं-केंद्रित क्रियेपासून मुक्त असणे शक्य आहे काय?प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे असा हा प्रश्न आहे.कारण या विचारण्यातच तुम्हाला उत्तर सापडेल.जर आपण या स्वयं-केंद्रित क्रियेच्या संपूर्ण सर्वांगीण हालचालींबद्दल जागृत असाल,त्या मागील प्रक्रियेबद्दल जागृत असाल, तिच्या जाणिवेच्या सर्व पातळ्यांवरील हालचालींशी आपली ओळख असेल, तर मग ही स्वयंकेंद्रित क्रिया व प्रक्रिया संपुष्टात येणे शक्य आहे काय? हा प्रश्न स्वतःला विचारल्यशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही.
                
काल कल्पनेशिवाय विचार करणे शक्य आहे काय?मी काय होतो? मी काय आहे? मी काय असावे?मी काय होणार आहे?यशिवाय विचार करणे शक्य आहे काय?अशा विचारातूनच सर्व स्वयं-केंद्रित-क्रिया सुरू होते.इथेच काहीतरी बनण्याच्या निर्णयाला सुरुवात होते. निवड बगल टाळाटाळ व त्याग यांना इथेच सुरुवात होते.या सर्व काल-प्रक्रिया आहेत.या कालप्रक्रियेत भयानक दुःख गोंधळ खट्याळपणा वस्तुस्थितीचे विदारण व नासविणे आहे.हेही सर्व आपल्याला माहित आहे .                  
कालप्रक्रिया क्रांतिकारक कधीच असू शकत नाही.कालप्रक्रियेतून क्रांती होत नाही.कालप्रक्रियेतून खरा बदल कधीच घडून येत नाही.उत्क्रांतीतून कधीच क्रांती होत नाही.उत्क्रांती ही कालप्रक्रिया आहे.फक्त तिथे सातत्य असते व अंत कधीच नसतो .तिथे फक्त तुलना व ओळख असते.जेव्हां कालप्रक्रिया, स्वयंकेंद्रित क्रिया,संपूर्ण थांबते तेव्हांच खरी क्रांती होते.तिथेच खरे नवे प्रगट होते .                
                 
या"मी"च्या हालचालींबद्दल या "मी"च्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जागृत झाल्यावर मग मनाने काय करावे ?फक्त नूतनीकरणातून, फक्त खर्‍या क्रांतीतूनच, फक्त खर्‍या बदलांतूनच,नवीन अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.उत्क्रांतीमधून नव्हे, "मी"च्या बनण्यामधून नव्हे, तर "मी" संपूर्ण लयाला जाऊनच काहीतरी नवीन अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.कालप्रक्रिया कधीही नवीन अस्तित्वात आणू शकणार नाहीं.सृजनशीलतेकडे नेणारा काल हा मार्गच नव्हे.            
                    
तुमच्यापैकी कोणाला सृजनशीलतेचा एखादा तरी क्षण प्राप्त झाला आहे कि नाही ते मला माहित नाही.एखादी कल्पना वा दृश्य प्रत्यक्षात आणण्याबद्दल मी बोलत नाही.असा एखादा क्षण कि जिथे ओळखणे नसते याबद्दल मी बोलत आहे.त्या क्षणी त्या असामान्य अवर्णनीय अकल्पनीय स्थितीत हा "मी" ओळखणारे व म्हणूनच सतत लुडबुड करणारे केंद्र नसते. जर आपण जागृत असू तर आपल्याला असे आढळून येईल कि त्यास्थितीत, हा ओळखणारा, हा अनुभवणारा, हा भाषांतर्‍या, अस्तित्वात नसतो .विचार-प्रक्रिया ही काल-प्रक्रिया आहे.त्या सृजनशील स्थितीमध्ये, त्या जिथे सतत नवीन निर्माण होत असते अशा स्थितीमध्ये, त्या कालरहित स्थितीमध्ये,त्या अखंड ताजेपणामध्ये,या "मी"ची कुठलीही हालचाल अस्तित्वात नसते .                

तर मग आपला प्रश्न असा आहे कि मनाला क्षणभर नव्हे, कांही तुरळक क्षणी नव्हे,सतत अखंड अनंत काल परंतु मी हे शब्द वापरीत नाही, कारण त्यामुळे काल दर्शविला जातो, कालभानाशिवाय या स्थितींमध्ये असणे शक्य आहे काय ?प्रत्येकाने करावा असा हा शोध आहे.हाच मार्ग प्रेमाकडे जातो .बाकी सर्व मार्ग हे "मी" चे आहेत.जिथे "मी" ची क्रिया चालू आहे तिथे प्रेम नसते.प्रेम कालातीत आहे, प्रेम कालरहित आहे, प्रेम करता येत नाही .प्रेमाबद्दल विचार करता येत नाही .जर तुम्ही प्रेम करीत असाल तर "मी"ने जाणिवेतून केलेली ती हालचाल आहे.             
                     
प्रेम कालातीत आहे. तुम्ही त्याच्याकडे कुठल्याही प्रयत्नातून येऊ शकत नाही. कुठचेही शिस्तपालन यमनियम तुम्हाला तिकडे नेत नाहीत कारण या सर्व कालप्रक्रिया आहेत.मन फक्त कालप्रक्रिया जाणीत असल्यामुळे ते प्रेम ओळखू शकत नाही.अंतिम नवी अशी एकच वस्तू आहे.ती म्हणजे प्रेम. आपण केवळ मनाचीच मशागत केलेली असल्यामुळे प्रेम म्हणजे काय ते आपल्याला माहीत नाही.आपण प्रेमाबद्दल फार बोलतो.आपण म्हणतो कि आम्ही लोकांवर प्रेम करतो.आम्ही पत्नी पती मुलेबाळे शेजारीपाजारी यांवर प्रेम करतो.आम्ही निसर्गावर प्रेम करतो.परंतु ज्या क्षणी आपण या प्रेमाबद्दल जागृत होतो त्याच क्षणी स्वयंकेंद्रित क्रिया अस्तित्वात येते, व अशाप्रकारे ते प्रेम असण्याचे थांबते.                

ही मनाची संपूर्ण प्रक्रिया संबंधरूपतेतून जाणून घ्यायची आहे.निसर्ग लोक व स्वतः काढलेले आराखडे या सर्वांशी असलेल्या संबंधरूपतेतून ही प्रक्रिया जाणून घ्यायची आहे. संबंधरूपतेशिवाय जीवन नाही.आपण जरी कितीही संबंध टाळण्याचे प्रयत्न केले ,कितीही एकांतवासात राहण्याचा प्रयत्न केला ,तरी आपण या संबंध रूपतेशिवाय असूच शकत नाही. संबंधरूपता जरी क्लेशदायक असली तरी आपण तिच्यापासून दूर पळू शकत नाही.वेगळेपणा ही पळवाट होऊ शकत नाही.एकांतवास पत्करून गिरीकुहरात राहून फकीर बनून आपण संबंधमयतेपासून सुटू शकत नाहीं.या सर्व गोष्टी "मी" जोरात कार्यरत असल्याच्या निदर्शक आहेत.हे सर्व चित्र पहाल,जाणीव युक्तता म्हणजेच कालप्रक्रिया, याबद्दल सदैव, अखंड, प्रतिक्षणी, संपूर्ण निवड रहित,हेतूविना, फलप्राप्तीच्या वासनेशिवाय, जागृत राहाल तर तुम्हाला असे आढळून येईल कि ही काल प्रक्रिया, वासनाफल म्हणून नव्हे, तर आपोआपच संपुष्टात येते. जेव्हा ही काल प्रक्रिया नष्ट होते तेव्हाच प्रेमाचा उदय होतो.तेथे नित्य नवे असते.                
                  
सत्य आपल्याला शोधावे लागत नाही.सत्य हे शोधून मिळत नाही.सत्य ही शोधण्याची वस्तूच नव्हे .शोधून मिळते ते सत्य नव्हे.सत्य तुम्हाला शोधीत येते.वास्तविक सत्य हे कुठे दूर नाही.मन व त्याच्या क्रिया यांच्या क्षणाक्षणाच्या सुप्त व प्रगट हालचालीं बद्दलचे सत्य हेच महत्त्वाचे आहे.या क्षणाक्षणाच्या सत्याबद्दल जर आपण जागृत असू ,या कालप्रक्रियेबद्दल जर आपण जागृत असू, तर ही जागृतता, प्रेम, शुद्ध बुद्धी, शक्ती, केवल जाणीव, अस्तित्वात आणते.जोपर्यंत मन जाणीव युक्तता, स्व-क्रियांसाठी वापरीत आहे, तोपर्यंत काल, त्याच्या अनुषंगाने असलेल्या सर्व विरोध, दुःखांसहित, व हेतुयुक्त फसवणुकीसह, कार्यरत असतो .जेव्हां मन ही सर्व प्रक्रिया समजते तेव्हांच प्रेम प्रगट होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel