आपण काय बरे शोधित असतो ?आपली सर्व धडपड कशासाठी चाललेली असते ?या अस्थिर जगात अापण कुठल्या ना कुठल्या प्रकारची शांतता आनंद आश्रय शोधीत असतो .हा शांततेचा व आनंदाचा शोध फार महत्त्वाचा आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ? पण खरोखरच आपण काय शोधण्याचा, काय मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो बरे?या अत्यंत अस्थिर,  झगडे, भांडणे, दुःखे ,युद्धे, यांनी भरलेल्या जगात, आपण शांतता, स्थैर्य  व आनंद, मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो .मला असे वाटते कि आपण सर्व यांच्याच शोधात असतो . पुढारी, धर्म, तत्ववेत्ते ,निरनिराळे गुरू, यांच्या शिकवणुकीने ,त्यांच्या आश्रयाने, त्यांच्या वरदहस्ताने ,आपल्याला वरील सर्व गोष्टी मिळतील असे समजून आपण त्यानी सांगितलेल्या मार्गांचा  अवलंब करीत असतो .

आता नीट विचार करा कि आपण आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत, कि असे बक्षीस मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत, कि ज्याच्यापासून आपल्याला आनंद मिळेल असे वाटते ?आपण बक्षीस मिळवण्याच्या धडपडीत आहोत असे मला वाटते .बक्षीस व आनंद यांत फरक आहे .तुम्ही बक्षीस खचित मिळवू शकाल .बक्षिसापासून आनंद मिळेल का?आनंद हा कशापासून तरी मिळवावयाचा असतो का?आनंद हा स्वयंभू नसतो का?तन मन खर्च करून ,अत्यंत निष्ठापूर्वक कामाला लागण्यापूर्वी, आपण निश्चित कशाच्या शोधात आहोत ,बक्षिसाच्या कि आनंदाच्या, याचा काळजीपूर्वक विचार करायला नको का ?आपल्याला बक्षीस पाहिजे असते. आपल्या तपासाच्या शेवटी आपल्याला पूर्णत्वाचा अनुभव या स्वरूपात बक्षीस हवे असते.

आपल्याला शांतता हवी असेल तर ती आपण सहज मिळवू .निष्ठेने व अंधपणाने कुठली तरी कल्पना ,कोणता तरी गुरू ,कोणता तरी पंथ ,यांचा आश्रय घेतला  म्हणजे झाले .पण यामुळे खरोखरच प्रश्न सुटतो का ?अशी शांतता कायमस्वरूपी  टिकेल का ?एखाद्या कल्पनेत आपल्याला कोंडून घेणे म्हणजे द्वैतापासून सुटका नव्हे.तेव्हा अंतर्बाह्य आपल्याला कशाची तहान लागली आहे ,त्याचा तपास करणे महत्त्वाचे नाही काय ?आपल्याला कशाची तहान लागली आहे, हे जर स्पष्टपणे माहीत असेल ,तर मग आपल्याला जात, धर्म, पंथ ,गुरू, महान तत्ववेत्ते ,जाडी जाडी पुस्तके, धर्मग्रंथ , यातील कोणाचीच कास धरण्याची गरज नाही .यातील कोणाचाच आश्रय घेण्याची आवश्यकता नाही .खरी अडचण अशी आहे की आपल्याला नक्की काय हवे आहे ते आपल्याला स्पष्टपणे माहीत नसते .ती स्पष्टता कोपऱ्यावरील चर्चमधील धर्मगुरू काय म्हणतो ते जाणून घेऊन, किंवा एखादा अध्यात्मिक गुरू किंवा एखादे धार्मिक पुस्तक  काय म्हणते ते जाणून घेऊन, व ते  मिळवण्याचा प्रयत्न करण्यापासून येईल का ? द्वैतापासून दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी आपण अनेक पुस्तके वाचतो ,व्याख्यानाला जातो ,क्वचित धर्म बदलतो ,पंथ बदलतो, गुरू बदलतो ,यांतील काहीच केले नाही,तर आपण असे म्हणतो की अमुक एक पुस्तक ,गुरू,पंथ ,माझे समाधान करतो .मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यात आहे .त्यात ती नसली तरी ती मला त्यापासून मिळेल, असा नितांत विश्वास आहे .अश्या प्रकारे आपण स्वतःला कश्यात तरी बंद करून रहात असतो .

या सर्व गोंधळातून , प्रयत्नातून ,आपण काहीतरी नित्य ,सत्य ,मग तुम्ही त्याला देव परमेश्वर किंवा आणखी काहीही म्हणा ,नावाला महत्त्व नाही ,पण ते निश्चितपणे  मिळेल असे म्हणता.ते मिळवण्याचा प्रयत्न करीत असता.आपण उगीच नावाला महत्त्व देण्याचे कारण नाही. त्याला काय म्हणायचे ते आपण तज्ज्ञांकडे सोपवूया.काहीतरी नित्य, जे आपल्याला काहीतरी आधार देईल ,आश्रय देईल ,जोम देईल ,चिरंतन आनंद देईल, नेहमी आपल्या बरोबर असेल ,ज्याला आपण कोणत्याही प्रसंगात चिकटून राहू शकू ,असे मिळविण्याचा प्रयत्न करीत नसतो काय ?आपण अंतर्यामी संशयी असतो .आपल्याला कसली खात्री नसते .आपला कुणावर विश्वास नसतो .याचे कारण आपण स्वतःला ओळखत नसतो .आपल्याला पुस्तके व महान तत्ववेत्ते काय म्हणतात ते माहित असते . परंतु प्रत्यक्षात स्वतःची ओळख मात्र नसते .

नित्य अवीट आनंद ,हेच आपले साध्य नसते काय ?जे कधीही नाश पावणार नाही, जे नेहमी आपल्याला तोषवील ,अश्या वस्तूच्या शोधात अापण नसतो काय ?आपण उगीच शब्दांच्या जंजाळात अडकलो नाही तर नित्य अवीट अविनाशी आनंद, आपल्याला नको असतो काय ?

ठीक आहे आपल्याला सुख हवे असते .सुख हा शब्द फारच स्थूल आहे, तरीही तो आपण तसाच वापरूया .ज्ञान कि जे आपल्याला सुख देईल ,असा अनुभव कि जो आपल्याला नेहमी सुखी व आनंदी ठेवील ,असे एक बक्षीस की ते कधीही आटणार किंवा सुकणार नाही.अश्याच्या शोधात अापण नसतो काय? .आपण आत्तापर्यंत अनेक अनुभव घेऊन थकून गेलो आहोत .आपला असा अनुभव आहे की या सर्व गोष्टींपासून मिळणारा आनंद क्षणिक आहे .आणि म्हणून आपण सत्य देव परमेश्वर अनंत जे काही म्हणाल ते त्याच्या तपासाला लागलोआहोत .आपल्याला अशी आशा आहे की यापासून तरी आपल्याला चिरंतन सुख आनंद प्राप्त होईल .हमालापासून तत्त्व वेत्त्यापर्यंत प्रत्येकाची हालचाल धडपड सुखासाठी चाललेली आहे .परंतु खरोखरच एखादे कधीही न सुकणारे अविनाशी नित्य असे सुख अस्तित्वात आहे का ?

ठीक आहे तुम्हाला नित्य आनंद हवा ,आणि तो तुम्हाला सत्यप्राप्ती पासून मिळेल ,असा तुम्हाला विश्वास आहे.इतर गोष्टींपासून तो मिळत नाही असा तुमचा अनुभव आहे .पण यासाठी तुम्ही स्वतःला जाणून घेणे आवश्यक नाही काय ? ज्याला सुख होते, ज्याला दुःख होते ,ज्याला चिरंतन  आनंद  कोणत्याही ज्ञात गोष्टीपासून मिळत नाही असा अनुभव आहे, ज्याला सत्य भेटीपासून तो मिळेल असा विश्वास आहे, असा शोध घेणारा ,धडपडणारा, सुखाची प्राप्ती हवी असणारा, असा जो "मी" त्या "मी" ला समजून घेणे आवश्यक नाही का ?कारण अशी शक्यता आहे की नित्य सुरक्षितता व नित्य आनंद म्हणून कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नसेल .सत्य कांही वेगळेच असेल आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्ञानेंद्रियांनी व कर्मेद्रियांनी जे काही अनुभवता कल्पना करता त्याहून सत्य सर्वस्वी वेगळे आहे  .यासाठी प्रथम सत्य ,कांहीतरी नित्य, मिळवण्याच्या पाठिमागे लागण्यापूर्वी ,हा जो मिळविणारा आहे, त्याच्या मागे लागणे, त्याचा अंतर्बाह्य  छडा लावणे, त्याला जाणून घेणे ,आवश्यक नाही का ?खरोखरच तपास करणारा व तपास करावयाची वस्तू भिन्न आहेत का ?विचार व विचार करणारा हे काय दोन आहेत ?या दोन वस्तू नसून त्या एकच आहेत फार तर असे म्हणता येईल की एका वस्तूच्या त्या दोन बाजू आहेत .तेव्हा सत्याचा शोध घेण्यापूर्वी प्रथम शोध घेणाऱ्याचा शोध घेणे आवश्यक आहे .

आता खरोखरच प्रामाणिकपणे विचारण्याची वेळ आली आहे कि नित्य अविट अविनाशी आनंद , तृप्तता ,समाधान ,मग त्याला तुम्ही काहीही नाव द्या ,ही  कुणीतरी देण्याची व कुणीतरी घेण्याची गोष्ट आहे काय ?जेव्हा आपण स्वतःला संपूर्णपणे ओळखतो ,त्या वेळी आपोआप प्रगट होणारे सत्य ,अखंड व अविरत शोधातून ,धडपडीतून, पुस्तके वाचून ,एखाद्या पंथांचा आश्रय घेऊन, कोणाची तरी कास धरून ,प्राप्त होईल का ?लक्ष द्या ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत मी स्वतःला ओळखत नाही, तो पर्यंत माझी सर्व धडपड व हालचाल व्यर्थ आहे .मी धडपड व झगडे यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीन ,खोट्या आशेत स्वतःला गुंतवून घेईन, कोंडून घेईन ,पूजा करीन ,व कोणाची तरी कास धरून ,मला मुक्ती मिळेल अशी आशा करीन.अशा गोड कल्पनेमध्ये मी मशगूल होऊन राहीन. आपण बरोबर हेच करीत असतो .आपल्याला नाना वासना असतात .त्या वासनातृप्तीसाठी आपली धडपड सुरू असते .परंतु या वासना म्हणजे काय? त्या कशा उत्पन्न होतात?विशिष्ट वासनाच का निर्माण होतात? त्यापासून सुख व तृप्ती मिळेल असे आपल्याला का वाटते? त्या सुखाचे व तृप्तीचे स्वरूप काय आहे ?जो हे सर्व करतो त्याचे स्वरूप काय आहे?वासना व वासना करणारा वेगळा आहे का? याचा आपण कधी विचार करतो का ?जोपर्यंत मी अंधारात आहे, जोपर्यंत मी स्वतःला ओळखत नाही ,जोपर्यंत मी मला कानाकोपऱ्यासह जाणून घेतले नाही, तोपर्यंत सर्व हालचाल अर्थशून्य आहे .किंबहुना विचार, वासना, हेतू, क्रिया, यांना कांहीही पाया नाही  .

परंतु दुर्दैवाने आपल्याला नेमकी हीच गोष्ट नको असते. आपल्याला खूप जाणण्याची इच्छा असते.  परंतु कशालाही सुरुवात करण्याचपूर्वी, कांही जाणून घेण्यापूर्वी ,किंवा काहींचा धि:कार व नाश करण्यापूर्वी, किंवा कांही बदलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, स्वतःला जाणून घेणे अत्यावश्यक आहे .पण आपण याच्या बरोबर उलट करीत असतो.  सत्याचा शोध घेताना, ही पुस्तके वाच, ती पुस्तके वाच, हा गुरु कर , तो गुरू कर,  हा पंथ बघ,तो पंथ बघ, पूजा कर, प्रार्थना कर, सात्त्विक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न कर,  हा काय म्हणतो ते पाहा ,तो काय म्हणतो ते पाहा, हे सोडून दे ,ते सोडून दे, मनाला शिस्त लाव ,स्वतःला एकांतवासात कोंडून घे ,असा सारखा चावटपणा चाललेला असतो .हे सगळे अर्थशून्य आहे. व्यर्थ आहे .मूर्खपणाचे आहे. शक्यता आहे कि तुम्ही ज्याना अनुसरत असाल ते तुम्हाला "स्वतःचाच अभ्यास कर "असे कदाचित् सांगत असतील.आपण जे आहोत ,जसे आहोत ,तसेच जग आहे .आपण जर अधाशी, पोकळ, दीन, मत्सरी ,असू; तर ज्या समाजात आपण राहतो ,तो समाजही तसाच आहे .

छमला असे वाटते कि, या सत्यशोधनाच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ,हा जो सत्यशोधक आहे, त्याला  अंतर्बाह्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे .या प्रवाशाचा, या शोधकाचा, नीट अंतर्बाह्य संपूर्ण सर्वांगीण शोध घेणे ,नितांत आवश्यक आहे .किंबहुना या शोधा शिवाय त्या प्रवासाला काहीच अर्थ नाही .प्रवासी कोण? सुख व दुःख म्हणजे काय ?ते का होते ?हेच जर आपल्याला माहित नसेल ,तर मग त्या प्रवासाला कांही अर्थ आहे काय  ? प्रामाणिक मनुष्य स्वतःच्या तपासाला लागतो.त्याशिवाय हालचालींना, विचाराना ,वासनांना, क्रियांना, आग्रहाला,कांही पाया नाही .स्वत:ला समजून घेण्यासाठी ,पंथ गुरू धर्म चर्च कुराण गुरुद्वारा मंदिर पुस्तके कशाचीच गरज नाही .मी व सृष्टी यांत कांहीच फरक नाही .चराचराशी असलेले माझे संबंध म्हणजेच मी .माझे चराचराशी असलेले संबंध म्हणजेच सृष्टी .

स्वतःला जाणल्याशिवाय, आपण असाच विचार का करतो ?याच वासना आपल्या जवळ का आहेत? आपले पूर्वग्रह ,पूर्वसंस्कार, संस्कार समुच्चय ,काय आहे ?विशिष्ट श्रद्धा आपण कां बाऴगतो?अमुकच धर्म पंथ तत्वज्ञान आपल्याला योग्य कां वाटते ?आपले शेजारी ,आपले जातीबांधव, आपले देशबांधव, आपली भाषा, आपला देश, आपले जग, याबद्दल आपल्या विशिष्ट तर्‍हेच्याच भावना व प्रतिक्रिया कां आहेत?हे सर्व जाणून घेतल्याशिवाय ,खरोखरच आपण एखाद्या गोष्टीबद्दल प्रामाणिकपणे विचार कसा करू शकतो, हे मला कळत नाही .आपला सर्व शोध ,निष्फळ आहे .पोकळ आहे. व्यर्थ आहे .अर्थशून्य आहे.
              
ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत सत्य आहे .मग तुम्ही कुठल्याही देशातील, कुठच्याही धर्माचे,  कोणत्याही कालखंडातले असा, जीवनाचे ध्येय काय ?युद्धे भांडणे झगडे वादविवाद कां होतात ? विरुध्द विचारप्रवाह अस्तित्वात कां येतात ?हे जाणून घेण्यापूर्वी स्वतःचा तपास करणे जरूर आहे .चटकन् ही गोष्ट फार सोपी वाटते .परंतु हीच गोष्ट अत्यंत कठीण आहे .स्व-शोध घेणे, विचाराचा विचार करणे, त्याचा पाठलाग करणे, त्याच्या उत्पत्ती पूर्वीपासून ते उत्पत्ती नंतर त्याच्या निरनिराळ्या अवस्थेत त्याचा छडा लावणे,यासाठी प्रचंड सावधानता व जागृतता पाहिजे .

आपण जो जो वासना, भावना कल्पना ,विचार ,क्रिया , प्रतिक्रिया, याबद्दल जास्त जास्त सावध व जागृत होत जातो ;तो तो आपली सावधानता व जागृतता वाढत जाते .केवळ स्वतःबद्दलची नव्हे, तर चराचराबद्दलचीही सावधानता व जागरुकता वाढत जाते .चराचराशी असलेल्या संबंधांमधून आपल्याला स्वतःचा बोध होत असतो .स्वतःला जाणणे म्हणजे या सर्व संबंधांचा छडा लावणे होय .अडचण अशी आहे की आपण उतावीळ असतो .आपल्याला झटकन एखादी वस्तू हवी असते. दिरंगाई आपल्याला सहन होत नाही .प्रामाणिक पणे जागरूकतेने सावधानतेने निरीक्षण व विश्लेषण करण्यासाठी आपल्याला वेळ नसतो. आपण तयार नसतो .त्याशिवाय अन्न मिळवण्यासाठी, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, दिवसातील कितीतरी वेळ आपण गुंतून पडतो.त्याशिवाय कित्येकांनी उगीचच निरनिराळे पंथ, मंडळे, संस्था, यांच्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेतलेल्या असतात .या सर्वामुळे आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही . प्रत्येक प्रतिक्रियेची जबाबदारी आपली असते .आणि आपण जबाबदार म्हणून नेहमी दुसऱ्याला धरीत असतो .धर्म पंथ गुरू व पुस्तके यांचा आश्रय मला पूर्णपणे निष्फळ व निरर्थक वाटतो .तुम्ही सर्व जग फिराल पण शेवटी तुम्हाला स्वत:पाशीच आले पाहिजे .

तुम्ही स्वतःला जसजसे जास्त जास्त जाणाल ,तसतसे तुम्हाला तुमचे अंतरंग ,जास्त जास्त प्रगट  होत जाईल .जास्त जास्त  स्पष्ट होत जाईल .स्वज्ञानाला अंत नाही. ती तळ नसलेली विहीर आहे .शेवट नसलेली नदी आहे .तुम्हाला अमुक एक असे मिळाले असे आढळून येणार नाही .तुम्ही एका विशिष्ट अनुमानावर येऊन ठेपणार नाही .तुम्ही स्वतःचा जसा जसा जास्त जास्त अभ्यास कराल  तसतसे आपोआप शांत व्हाल .आणि जेव्हा मन स्व-ज्ञानातून स्थिर ,शांत ,स्तब्ध ,निस्तरंग ,होते कुठच्या तरी शिस्तीने नव्हे तर आपोआपच निस्तरंग होते, त्या वेळी त्या निस्तरंग ,स्तब्ध ,शांत स्थितीमध्ये, ते सत्य आपोआपच प्रगट होते .तिथे ईश्वराचा रहिवास व वरदहस्त असतो. तिथेच खरी सृजनशीलता असते .

मला असे वाटते कि या अनुभवाशिवाय, वादविवाद पुस्तके विचार व्याख्याने  प्रचार व प्रसार हे सर्व पोरखेळ आहेत .माकडचेष्टा आहेत .जर एकदा स्वज्ञानातून, त्या सृजनशील आनंदाचा , जो अानंद मनातीत आहे ,त्याचा अनुभव येईल, तरच त्याच्या हालचालींना खरा अर्थ  प्राप्त होईल .त्याचे सर्व विश्वाशी असलेले संबंधच बदलतील .आणि त्याबरोबरच आपण ज्या जगात राहतो त्या बरोबरचे संबंधही संपूर्णपणे बदलून जातील .ज्या जगात आपण राहतो ते जगही बदलेल .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel