आपण स्वतःची नेहमी फसवणूक कशी करून घेत असतो याची चर्चा करणे व ते तुमच्या लक्षात आणून देणे मला आवडेल .खोट्या फसव्या आभासात मन मशगूल होऊन राहते .ते स्वतःवर असे चकवे मुद्दाम लादून घेते.एवढेच नव्हे तर दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्नही करते.स्वतःची नेहमी चाललेली फसवणूक लक्षात येणे अत्यंत जरुरीचे आहे.खरोखरच या बाबतीत आपण गंभीर असले पाहिजे . ही स्व-फसवणूक समजण्यासाठी केवळ शब्दांकडे लक्ष देऊन चालणार नाही.शब्द तर महत्त्वाचे आहेतच .परंतु त्याहूनही खोल सुप्त मूलगामी अशा अनेक घटनांची आपल्याला पाहणी करावयाची आहे .शब्द व प्रतिशब्द यांनी नेहमी आपण आपले समाधान करून घेत असतो .अापण जागतिक शहाणे असतो.जगाबद्दल आपल्याला बरीच माहिती असते.परंतु ही सर्व माहिती वरवरची असते.उथळ असते.आपण खोल जाऊ शकत नाही.जे सखोल असे आपल्याला वाटते तेही फार उथळ असते.स्वतःची तर आपल्याला मुळीच माहिती नसते .यामुळे कांही तरी होईल व गाडे सुरळीत चालेल एवढीच आपल्याला आशा असते .एवढीच आशा आपण करू शकतो .
                      
युद्धे कां होतात याचे स्पष्टीकरण युद्धे थांबवू शकत नाहीत.अगणित  इतिहासकार भाष्यकार धर्मगुरू धर्मशास्त्रज्ञ यांनी युद्धाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे व सविस्तर सखोल चर्चाही केली आहे .परंतू एकही छोटे किंवा मोठे विनाशकारी युद्ध त्यांना थांबविता आलेले नाही.एकाहून एक संहारक लहान मोठी युद्धे चालूच आहेत.जे खरोखर प्रामाणिक आहेत, ज्यांना खरी तळमळ आहे, त्यांनी केवळ शब्दांच्या अर्थाकडे न पहाता, खोलात जाऊन चवकशी करणे आवश्यक आहे . आंतरिक मूलगामी क्रांती घडून आली पाहिजे .ही आणि हीच औषध योजना मानवाची मानवजातीची सुटका करू शकेल .              
                  
त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्व-फसवणुकीची चर्चा करीत असू,  त्या वेळी उधळ स्पष्टीकरण व पोपटपंची यापासून सावध राहिले पाहिजे .माझी अशी सूचना आहे कि वक्ता काय म्हणतो तिकडेच फक्त लक्ष देऊन चालणार नाही, तर त्याबरोबरच  जीवनात पदोपदी भेटणाऱ्या समस्येची आपण पाठपुरवणी केली पाहिजे . म्हणजेच आपण कर्म करीत असताना, विचार करीत असताना,जागृत राहिलो पाहिजे.सतत जागृत पहारा केला पाहिजे.त्याचप्रमाणे आपण लोकांवर परिणाम कसा करतो .अापण विचाराला व कर्माला सुरुवात कशी करतो व कां करतो,विशिष्ट प्रकारेच कां करतो, इकडे सतत लक्ष दिले पाहिजे .                           स्व-फसवणुकीचे कारण काय बरे आहे ?मूलभूत अशी कोणती गोष्ट स्व-फसवणूक अस्तित्वात आणते .आपण पदोपदी स्वतःची फसवणूक कां बरे करून घेत असतो ?आपण स्वतःची फसवणूक करून घेत असतो ही गोष्ट आतापर्यंत किती जणांच्या लक्षात आली आहे ?आपण स्व-फसवणुकीबाबत जागृत आहोत काय ?स्व-फसवणूक म्हणजे काय ? ती कां उत्पन्न होते? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी आपण स्वतःची फसवणूक करून घेत आहोत याबद्दल आपण जागृत असायला नको काय ?आपण स्वतःला फसवत आहोत हे आपल्याला माहीत आहे काय?य़ा फसवणूकीचा अर्थ काय ?ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जो जो फसवणूक जास्त तो तो या फसवणुकीची शक्ती जास्त असा हा प्रकार आहे .त्यामुळे तरलता, तत्परता, उत्साह, एक विशिष्ट प्रकारची शक्ती व सामर्थ्य निर्माण होते व त्या सामर्थ्याच्या जोरावर आपण ती फसवणूक दुसऱ्यावर लादण्याला उद्युक्त होतो .अशा प्रकारे आपण स्वतःवर अनेक प्रकारच्या फसवणुकी लादून घेत असतो. एवढेच नव्हे तर लोकांवरही त्या आग्रहाने लादीत असतो . स्व-फसवणूक ही अशाप्रकारे प्रतिक्षणी वाढत जाणारी एक प्रक्रिया आहे .आपण या प्रक्रियेबाबत जागृत आहोत काय?आपली अशी कल्पना आहे कि आपण अत्यंत स्वच्छप्रकारे, अत्यंत योग्यप्रकारे, हेतूपूर्वक, काळजीपूर्वक, विचार करण्याला समर्थ आहोत .परंतु विचारप्रक्रिया हीच एक मोठी स्व-फसवणूक आहे हे आपल्याला माहीत आहे काय?               

कसला तरी शोध, समर्थनाचा प्रयत्न, धि:कार, सुरक्षितता-शोध, स्व-संरक्षण-शोध, उत्कृष्ट विचार संग्रह,भरपूर विचारीपणा, श्रेष्ठ स्थान प्राप्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान,सत्ता,याशिवाय  दुसरा कुठला  विचार आपल्या मनात असू शकतो काय? राजकीय धार्मिक सामाजिक आर्थिक  दृष्ट्या कांहीतरी बनण्याची वासना हीच मुळी स्व-फसवणुकीचे कारण नाही काय ?ज्याक्षणी मला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टींशिवाय आणि जीवनावश्यक व मूलभूत गरजांशिवाय आणखी कांही असावे असे वाटते,त्याच क्षणी मी अशी कांही स्थिती निर्माण करतो आणि तिचा मी लगेच स्वीकार करतो. 
                 
उदाहरणार्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांना मरणोत्तर काय होते हे जाणण्याची जिज्ञासा आहे .जो जो आपण वृद्ध होत जातो तो तो आपली उत्सुकता वाढतच जाते.आपल्याला यातील सत्य शोधून काढायचे आहे .आपण ते कसे काय शोधून काढणार ?निरनिराळी स्पष्टीकरणे वाचून किंवा ऐकून यातील सत्य आपल्याला कधीच शोधून काढता येणार नाही.            
                
तुम्ही कसा काय याचा शोध घेणार आहात ? प्रथम मरणोत्तर स्थिती व तुम्ही यांच्या मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही हाकलून लावली पाहिजे.प्रत्येक अाशा, प्रत्येक सातत्याशा,  पलीकडे काय आहे याचा शोध घेण्याची वासना, तुम्ही हाकलून लावली पाहीजे .कारण मन सतत सुरक्षिततेचा शोध घेत असते.त्याला सातत्याची प्रबळ वासना आहे .मग हे फल ज्याने प्राप्त होईल अशा प्रकारच्या साधनांचा ते तपास सुरू करते. जे मन सतत असावे अशा कल्पनेने युक्त आहे,ते मन जरी मरणोत्तर अस्तित्व आहे कि नाही याचा शोध घेत असले, तरी समजण्यासाठी ते असमर्थ असते.ते असमर्थ नसते काय?पुनर्जन्म, मरणोत्तर अस्तित्व आहे कि नाही,ते महत्त्वाचे नाही  परंतु मन स्वफसवणुकीतून आधार, समर्थन, कसे शोधीत असते ते महत्त्वाचे आहे .वस्तुस्थिती काहीही असेल परंतु ती आपल्याला सतत अनुकूल आहे असा ग्रह मन सतत करून घेत असते.हीच स्व-फसवणूक .समस्येला तोंड कसे दिले जाते ते महत्त्वाचे आहे .कुठल्या आशेने कुठच्या वासनेने कुठल्या हेतूने  ते दिले जाते हे महत्त्वाचे आहे?             
                   
शोध घेणारा नेहमीच ही फसवणूक स्वतःवर लादून घेत असतो.त्याच्यावर ती दुसरा कुणीही लादू शकणार नाही .या फसवणुकीचे कारण तो स्वतःच आहे .आपण स्वतःच फसवणूक निर्माण करतो व मग त्याचे गुलाम होऊन बसतो. स्व-फसवणुकीचे मुख्य कारण म्हणजे या जीवनात व मरणोत्तर जीवनात कांहीतरी बनण्याची इच्छा होय .या जगात कांहीतरी मिळविण्याची बनण्याची होण्याची इच्छा काय करते ते तुम्हाला माहित आहे . त्यामुळे फक्त गोंधळ माजविला जातो .प्रत्येक जण दुसऱ्याबरोबर चढाओढ करीत असतो .प्रत्येकजण दुसऱ्यांचा नाश करीत असतो .हे सर्व शांतीच्या नावाखाली चाललेले असते .आपण एकमेकांबरोबर खेळत असलेला हा खेळ, आपल्या सर्वांच्या माहितीचा आहे .हा एक फसवणुकीचा असामान्य मामला आहे .त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या जगात एक स्थान हवे असते. सुरक्षितता हवी असते .              

ज्याक्षणी कांहीतरी बनावे,कांहीतरी व्हावे, कांहीतरी असावे ,कांहीतरी मिळवावे,अशी इच्छा निर्माण होते ,त्या क्षणी फसवणुकीला सुरुवात होते .या वासनेपासून मुक्त होणे ही फार बिकट गोष्ट आहे .ही खरी जीवन समस्या आहे .या जगात जगणे परंतु कांहीही नसणे हे शक्य आहे काय ?हे शक्य होईल तरच आपली स्व-फसवणुकीपासून सुटका होईल.कारण तेव्हाच मन फल प्राप्तीची इच्छा करीत नसेल .समाधानकारक उत्तराच्या शोधात नसेल .ते कोणत्याही प्रकारचे समर्थन हुडकीत नसेल .ते सुरक्षितता शोधीत नसेल .मन जेव्हा हे फसवणुकीचे गूढतम मार्ग पहाते, क्षणोक्षणी होत असलेल्या अनेक फसवणुकी पहाते,फसवणूक होण्याची  शक्यता असलेली परिस्थिती पाहते, जेव्हां ते कुठल्याही प्रकारची सुरक्षितता व समर्थन झुगारून देते, तेव्हांच ते कांहीही नसण्याला समर्थ बनते. हे शक्य आहे काय?              
                     
जो पर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फसवणूक आहे, तोपर्यंत प्रेम असणे शक्य नाहीं. जोपर्यंत मन आभास निर्माण करण्याला व स्वतःला त्यात गुरफटवून घ्यायला समर्थ आहे, तोपर्यंत हा आभास  संपूर्ण समज अशक्य करून सोडतो .आपली प्रमुख अडचण ही आहे .सहकार्य कसे करावे ते आपल्याला माहिती नाही.दोघानी मिळून कल्पनेने निर्माण केलेले ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो.एवढेच सहकार्य आपल्याला माहीत आहे.विचाराने निर्माण केलेले समान ध्येय आपल्यामध्ये नसेल, किंवा कोणतेही ध्येय आपल्यांमध्ये नसेल, तरीही आपण एकमेकांसाठी कार्य करू ,तेव्हांच खरे सहकार्य आहे असे आपल्याला म्हणता येईल .जेव्हां तुम्ही व मी कांहीतरी बनण्याची व असण्याची इच्छा करीत नसू तेव्हांच खरे सहकार्य शक्य आहे.हे समजणे अगत्याचे आहे. जेव्हां तुम्ही व मी कांहीतरी बनण्याची इच्छा करतो तेव्हां श्रद्धा व इतर सर्व कांही आवश्यक बनते .स्वतःच आराखडा काढलेले सुंदर नंदनवन, तथाकथित सुंदर नकाशा, आवश्यक बनतो.पण जर तुम्ही व मी स्व-फसवणुकीशिवाय, श्रद्धा व ज्ञान यांच्या अडथळ्याशिवाय,  सुरक्षित असावे या वासनेशिवाय,ज्याचे नाव माहीत नाही, त्याची निर्मिती करीत असू तरच खरे सहकार्य आहे असे म्हणता येईल.             
                       
तुम्हाला व मला कोणताहि एकच हेतू नसताना, एकत्र असणे, सहकार्य करणे, शक्य आहे काय?फळाची आशा केल्याशिवाय तुम्हाला व मला एकत्रित काम करणे शक्य आहे काय ?तेच खरे सहकार्य नव्हे काय?जर तुम्ही व मी विचार करून मेहनत घेऊन एखादा आराखडा काढला आणि नंतर त्या ध्येयाच्या दिशेने एकत्र काम करीत राहिलो तर कुठची प्रक्रिया निर्माण होते?आपले विचार आपली बुद्धी जरूर एकत्रित असतात परंतु भावनात्मक दृष्ट्या आपले सर्व अस्तित्वच त्याला विरोध करीत असते ,त्यामुळे फसवणूक अस्तित्वात येते.त्यामुळे तुमच्यात व माझ्यात झगडा विरोध निर्माण होतो.दैनंदिन जीवनात नेहमी आढळणारी ही गोष्ट आहे .
                  
तुम्ही व मी बौद्धिक दृष्ट्या एखादे काम एकत्रित करण्याचे ठरवितो पण सुप्तपणे आपण एकमेकांशी युद्ध पुकारलेले असते .मला माझे समाधान होईल असे उत्तर हवे असते. मला माझे नाव काढले जावे असे वाटत असते. मला तुमच्यापेक्षा श्रेष्ठत्व मिळाले पाहिजे असा माझा आग्रह असतो.आणि तरीही मी तुमच्या बरोबर काम करीत आहे असे म्हटले जाते.अशाप्रकारे त्या विशिष्ट ध्येयाचे निर्माते असे आपण,  बाह्यवर्ती जरी मिळून मिसळून काम करीत असलो, तरी अंतर्यामी एकमेकांना विरोध करीत असतो.              

तुम्हाला व मला कांहीही महत्व नाही,अशा जगात आपण एके ठिकाणी राहणे, काम करणे, सहकार्य करणे ,शक्य आहे काय?हे शोधणे महत्त्वाचे नाही काय ?वरवर नव्हे पण मूलगामीरित्या आपल्याला सहकार्य करणे खरोखरच शक्य आहे काय?आपल्या अनेक महान समस्यांपैकी ही एक आहे .कदाचित ही सर्वात महत्त्वाची आहे .एखाद्या वस्तूत मी स्वतःला पाहतो, तुम्हीही त्या वस्तूत स्वतःला पाहता, आपण दोघेही त्या वस्तूंच्या तपासात आहोत,आपल्या दोघांनाही ती हवी आहे, परंतु हा विचारच फार वरवरचा आहे .कारण या ओळखण्यातूनच पाहण्यातूनच आपण विभाजन आणतो.ही नेहमी घडणारी वस्तुस्थिती आहे .
                  
मी हिंदू आहे तुम्ही अन्य धर्मीय आहात आपण दोघेही विश्वबंधुत्व शिकवतो,आपणा दोघानाहि विश्वबंधुत्व पाहिजे, तरीही आपण एकमेकांचा गळा दाबण्याला उद्युक्त असतो.असे कां?ही आपली एक विचित्र समस्या नाही काय ?खोलवर सुप्तपणे तुम्हाला तुमच्या श्रद्धा आहेत .मला माझ्या श्रद्धा आहेत . आपण नुसत्या विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारतो. आपण आपल्या श्रद्धा समस्या मुळीच सोडलेल्या नाहीत.फक्त तात्विक दृष्ट्या बुद्धीने आपण असे असे असले पाहिजे असे ठरवलेले आहे .परंतु अंतर्यामी खोलवरआपण एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहोत .                

आपल्याला चेतना व सामर्थ्य देणारे हे सर्व अडथळे म्हणजेच या सर्व स्व-फसवणुकी विरघळल्याशिवाय खरे सहकार्य अशक्य आहे .जात, धर्म,प्रदेश पंथ,राष्ट्र, कल्पना, इ.यांच्याशी समरस होऊन आपल्याला सहकार्य कधीही करता येणार नाही .             
                  
श्रद्धा कधी सहकार्य निर्माण करीत नाही.उलट ती विभाजन करते .एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षांविरुद्ध कसा उभा ठाकलेला असतो ते आपण पाहतो .आर्थिक समस्या सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवर निरनिराळ्या जणांची श्रद्धा असते.अशाप्रकारे या सर्वांनी एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारलेले असते.समस्या सोडवण्यासाठी व उपासमार दूर करण्यासाठी ते उद्युक्त झालेले नसतात, तर कुठल्या पद्धतीने समस्या सोडविली जाईल यांच्याशी त्यांचा खरा संबंध असतो .यामुळे झगडा अपरिहार्य ठरतो .कारण दोघेही समस्येशी नसून कल्पनेशी संबंधित असतात .
                
त्याचप्रमाणे धार्मिक लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले असताना एकच देव आहे.एकच जीवन आहे. वगैरे बडबड करीत असतात. हे सर्व कांही तुम्हाला माहीत आहेच.अंतर्यामी त्यांच्या श्रद्धा, त्यांचे ज्ञान, त्यांची मते, त्यांचे निर्णय, त्याच्या समजूती, त्यांचे अनुभव, हे त्यांचा नाश करीत असतात .त्यांना परस्परांपासून दूर राखीत असतात .              
                     
मानवी संबंधरूपतेत अनुभव हा एक विभाजन करणारा आहे .अनुभव हा एक फसवणुकीचा उत्तम व गहन प्रकार आहे.जर मला एखादा अनुभव आला असेल, तर त्याला मी  चिकटतो.मी छाती वर काढून म्हणतो कि माझा तसा अनुभव आहे .परंतु मी अनुभव म्हणजे काय हे कधीच पाहात नाही .अनुभव प्रक्रिया समजून घेत नाही .मला अनुभव आला आहे ना, बस ते पुरेसे आहे अशी माझी समजूत करून घेतो.त्या अनुभवाला मी चिकटतो.अशाप्रकारे त्या अनुभवातून मी स्व-फसवणूक माझ्यावर लादतो.              

आपल्यापैकी प्रत्येक जण विशिष्ट श्रद्धा,आनंद प्राप्त करून घेण्याचा विशिष्ट मार्ग, आनंदाचा विशिष्ट प्रकार, आर्थिक सुधारणा, इत्यादीना सतत चिकटलेला असतो .त्यांच्याशी तो इतका समरस झालेला असतो, त्यांच्या मनावर इतकी कांही मोहिनी घातलेली असते, कि समस्या पूर्ण बघण्याला, समस्येमध्ये डुबी मारण्याला, तो असमर्थ असतो.त्यामुळे अापण आपल्या श्रद्धा  ज्ञान अनुभव यांच्यासकट अलग राहणे पसंत करतो .श्रद्धा ज्ञान व अनुभव हे वरवर नव्हे खरोखरच खोलवर विरघळल्या शिवाय जगात शांती नांदणे अशक्य आहे.यासाठी जे खरोखरच गंभीर असतील, ज्यांना खरोखरच तळमळ व कळकळ असेल, त्यांनी होणे बनणे बळाने मिळविणे, या वासनांना  केवळ वरपांगी नव्हे तर खोलवर समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे .             
                      
सत्य ही मिळविता येण्यासारखी वस्तू नाही .ज्यांना प्रेम धरून ठेवण्याची इच्छा आहे, ज्यांना प्रेममय होण्याची इच्छा आहे, त्यांना प्रेम काय आहे हे कधीच कळणार नाही.जेव्हां मन शोध घेत नाही, तपास करीत नाही, तलाश करीत नाही, मिळावे व्हावे बनावे अशी वासना धरीत नाही,जेव्हां मन पूर्णपणे निस्तरंग असते,जेव्हां ते कुठच्याही दिशेने कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नसते, जेव्हां ते कोणत्याही श्रद्धा  बाळगीत नसते, त्यावर अवलंबून रहात नसते, त्याच्यापासून जिवंतपणा उत्साह मिळवित नसते, अशाप्रकारे स्व-फसवणूक करून घेत नसते, तेव्हांच आणि तेव्हांच सत्य प्रेम अशा गोष्टी कळत असतात .जेव्हां मन संपूर्ण वासना प्रक्रिया समजून घेते तेव्हांच ते स्तब्ध होते.तेव्हांच असावे की नसावे या हालचालीत ते नसते. तेव्हां आणि तेव्हांच जिथे कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते,अशी स्थिती प्राप्त होण्याची शक्यता आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel