जगाचे प्रश्न एवढे गुंतागुंतीचे व  प्रचंड आहेत ,कि ते समजण्यासाठी व सोडविण्यासाठी ,अत्यंत साधी व सरळ पद्धत वापरली पाहिजे,तरच ते सुटतील.  साधेपणा सरळपणा हा बाह्य परिस्थिती, पूर्वग्रह ,मानसिक कल, यावर अवलंबून नाही.मी पूर्वीच सांगितले आहे कि, हे प्रश्न सोडविण्यासाठी , सभा, बैठकी, नव्या नेत्यांची भरती, यांचा काहीही उपयोग नाही .जो प्रश्न निर्माण करतो, जो घोळ घालतो, तोच ते सोडवू शकेल .प्रश्न आपण निर्माण केले आहेत, घोळ आपण घातला आहे, तेव्हां तो आपणच, तुम्ही व मी सोडवू शकू .आपण सोयिस्करपणे समजतो कि हा घोळ जगाने घातला आहे .आपल्याला त्याच्याशी काय करायचे आहे ?जगाने वाटला तर हा प्रश्न सोडवावा .ही विचारसरणी चुकीची आहे .

तुम्ही व  मी याहून जगाला निराळे अस्तित्व नाही .आपले एकमेकांशी असलेले व आपण एकमेकांशी प्रस्थापित करू इच्छितो ,ते संबंध म्हणजेच जग होय . तुम्ही व मी प्रश्न आहोत, जग नव्हे .जग केवळ आपले प्रतिबिंब आहे .जग समजून घ्यायचे  असेल तर स्वत:ला  जाणण्याशिवाय  दुसरा मार्ग नाही .जग आपल्यापासून निराळे नाही .जग म्हणजे आपणच होय .आपले प्रश्न म्हणजेच जगाचे प्रश्न ,वस्तूत:  हे पुन: पुन: सांगण्याची  गरज नाहीं .परंतु आपली विचारसरणीच अशी आहे की आपला जगाशी काहीही संबंध नाही .जगाचे प्रश्न आंतरराष्ट्रीय संस्थांनी व जागतिक नेत्यांनी सोडवायचे आहेत .जुने नेते जर असमर्थ ठरतील ,तर नव्या नेत्यांची गरज आहे . त्यांची भरती केली पाहिजे .जुन्या आंतरराष्ट्रीय संस्था प्रश्न सोडवू शकत नसतील ,तर नव्या आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केल्या पाहिजेत .अशी आपली विचारसरणी आहे .ही फार मंद विचारसरणी आहे .जगाचे व   आपले प्रश्न निरनिराळे नाहीत.जगात क्रांती घडवून आणायची असेल, तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे .त्याशिवाय दुसरा उपाय नाही .सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कळकळ व तळमळ पाहिजे .स्वतःला जाणण्याची तळमळ पाहिजे.आपल्याला जगाशी काय करावयाचे आहे? क्रांती घडवून आणणारे ती घडवून आणतील, असे म्हणून स्वस्थ बसता येणार नाही .डावे नाहीतर उजवे प्रयत्न करतील, उत्क्रांती होईल, ही विचारसरणी चूक आहे .हे समजणे गरजेचे आहे ,कि घोळआपण घातला आहे ,आणि तो आपल्यालाच सोडवला पाहिजे .चूक सुधारणे ही आपली, तुमची व माझी, जबाबदारी आहे .

शक्यता आहे कि आपले वर्तुळ फार लहान असेल.पण जर आपण बदललो, तर आपल्या दैनंदिन व्यवहारात, त्याचा परिणाम दिसू लागेल .आपल्या दैनंदिन अस्तित्वात, जर आपण एक वेगळा दृष्टिकोन प्रस्थापित केला, तर त्याचा परिणाम ,सर्व जगावर कदाचित  दिसू लागेल .मी पूर्वीच म्हटले आहे कि ,आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .स्वतःला संपूर्णपणे जाणायचे कसे ते शोधणार आहोत .स्व-ज्ञानासाठी ,त्याग व एकांतवास ,यांची गरज नाही .जगापासून विलगता ही कल्पना चूक आहे .जगापासून विलगतेमध्ये "मी"ला अस्तित्व नाही .मी म्हणजेच जगाशी असलेले संबंध .असणे म्हणजेच संबंधरूपता.संबंधाविना अस्तित्व संभवत नाही .योग्य संबंधांचा अभाव, झगडे व दुःख निर्माण करतो .आपण जर स्वतः बदललो,  स्वतः म्हणजेच स्वतःचे छोटेसे जग ,तर त्या छोट्याशा जगातील बदलाचा परिणाम , दूरवर पसरत जाणाऱ्या लाटेप्रमाणे ,सर्व जगावर होईल .हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मी म्हणजे  संबंध रूपता, हे मी पुन: पुनः  सांगत आहे .ही संबंध रूपता म्हणजे जग .स्वतःमध्ये जर आपण मूलगामी क्रांती, परिवर्तन ,घडवून आणले तर त्याचा सर्व जगावर, हळूहळू निश्चित परिणाम होईल .जगात मूलगामी बदल होण्याला सुरुवात होईल .ही क्रांती मूल्यांची आहे .इंद्रियगत मूल्यांच्या ठिकाणी ,इंद्रियातीत मूल्यांची प्रतिष्ठापना करणारी, अशी ही क्रांती आहे .सत्य मूल्यें शोधण्यासाठी ,त्यांची प्रस्थापना करण्यासाठी, स्व-ज्ञान आवश्यक  आहे.हीच खरी शहाणपणाची सुरुवात आहे .हीच मूलगामी क्रांतीची सुरवात आहे . यासाठी स्व-ज्ञान तळमळ पाहिजे .इथेच खरी अडचण आहे .

आपल्यापैकी बरेचजण असमाधानी आहेत .आपल्याला जलद बदल पाहिजे आहे .या असमाधानाने, इच्छित इप्सित साध्य करून घेण्याच्या धडपडीचे रूप घेतले आहे .आपण इच्छा पूर्तीसाठी प्रयत्न तरी करतो, किंवा थकून भागून ,असलेल्या  परिस्थितीला शरण जातो .या असमाधान वृत्तीतून ,आपली अस्मिता जागृत होण्याऐवजी , जीविताचा हेतू काय ?अस्तित्वाचा हेतू काय ?असे प्रश्न उभे रहाण्याऐवजी, अापण मद्दड ,गतिशून्य ,शरणागत वृत्तीचे, मंद व गतानुगतिक बनतो .स्व शोध ही ज्याची त्याची जबाबदारी आहे .स्व-ज्ञान ही कुणी देण्याची व घेण्याची वस्तू नाही.हे पुस्तकातून शिकता यायचे नाही.गुरूही तुम्हाला विशेष काही देऊ शकणार नाही  .हा शोध ज्याचा त्याने घेतला पाहिजे .स्व शोध घेण्याची इच्छा व तळमळ पाहिजे .जोपर्यंत स्व-शोध तळमळ, उथळ आहे  ,दुबळी आहे, अस्तित्वातच नाही ,केवळ मान्यते पलीकडे किंवा पुसट इच्छे पलीकडे मजल जात नाही, तोपर्यंत स्व-ज्ञान होणार नाही .स्व-ज्ञानाच्या स्व-शोधाच्या पुसट इच्छेला ,शून्य महत्त्व आहे . जग क्रांतीसाठी स्व-क्रांती झाली पाहिजे ."मी" हे मानवी अस्तित्वाचे फळ व तो त्याचा एक भाग आहे.  स्व- क्रांतीसाठी स्व-ज्ञान आवश्यक आहे .स्व-ज्ञानासाठी स्व-शोध पाहिजे .त्यासाठी तळमळ पाहिजे .स्व-ज्ञानाशिवाय विचाराला योग्य बैठकच नाही . तो खरा विचारच नाही .स्व-ज्ञान म्हणजे "मी "ला तो जसा आहे तसे जाणून घेणे होय.तो जे इच्छितो ते जाणून घेणे नव्हे.इच्छा ही एक कल्पना आहे. ते एक फसवे ध्येय आहे .आणि म्हणूनच ते खोटे आहे .आपण जे होऊ इच्छितो ,त्याची प्राप्ती किंवा त्यासाठी धडपड, म्हणजे खरी क्रांती नव्हे.

स्व-ज्ञानासाठी अत्यंत जागृतता पाहिजे .कारण जे आहे ते(स्वत:-- मी) स्थिर नसून अत्यंत गतिमान आहे .त्यात क्षणाक्षणाला बदल होत आहे .त्याचा पाठलाग करायचा, त्याचे साक्षित्व करायचे, तर मन, कुठलेही ध्येय, श्रद्धा, तत्त्व वा साचेबंद क्रिया, यांनी जखडलेले असता कामा नये .एखाद्याचा पाठलाग, जर तुम्ही शृंखलाबद्ध असाल तर करता येणार नाही .जागृतता व सावधानता यांची नितांत गरज आहे .श्रद्धा, कल्पना, ध्येय, यापासून मन स्वतंत्र पाहिजे .श्रद्धा व ध्येये, अभिनिवेश निर्माण करतात .त्यामुळे आपण स्व-ज्ञानापासून वंचित होतो .खर्‍या ज्ञानापासून दुरावले जातो .आपली दृष्टी दूषित व विकृत होते .तुम्हाला तुम्ही जसे आहात ,तसे जाणून घ्यायचे असेल ,तर तुम्हाला जे नाही त्यावर श्रद्धा ठेवून ,किंवा कल्पनेने, ते तुम्हाला जाणता येणार नाही .मी जर अधाशी  दंगेखोर व मत्सरी असेन, तर  शांतता निरीच्छता प्रेम या ध्येयांचा ,काहीच उपयोग नाहीं .मी अधाशी दंगेखोर व मत्सरी आहे हे जाण्यासाठी, असामान्य सावधानता व तरलता, यांची आवश्यकता आहे, असे तुम्हाला वाटत नाही काय ?यासाठी प्रामाणिकपणा व  विचारांची स्पष्टता पाहिजे .परंतु श्रद्धा व ध्येय म्हणजे परिस्थितीपासून पलायन आहे .ती एक पळवाट आहे .त्यामुळे आपण स्व-ज्ञान स्व- क्रांती व स्व-शोध यापासून दूर जातो .

आपण जसे आहोत तसे ओळखणे ,मग आपण कसेही असू , कुरूप किंवा सु-स्वरूप ,दुष्ट किंवा खोडकर, त्याला विकृत स्वरूप दिल्याशिवाय ,ओळखणे ही सद्गुणांची सुरुवात आहे .सद्गुण जरूर पाहिजेत कारण सद्गुणामुळेच स्वतंत्रता प्राप्त होते. त्यामुळेच आपण शोध घेऊ शकतो .सद्गुणामध्येच आपण खरे जगू शकतो .सद्गुणांची जोपासना आदरभाव आणते.सद्गुणांची जोपासना  स्वातंत्र्य, खरी जाणीव, जागृती, आणू शकत नाही .सद्गुणांची जोपासना म्हणजे सद्गुणी बनण्याचा प्रयत्न होय.सद्गुणी असणे व सद्गुणी बनणे यात फार फरक आहे .स्व-ज्ञानातून सद्गुण आपोआप प्राप्त होतात .सद्गुणी होण्याचा प्रयत्न करणे ,म्हणजे चालढकल आहे .जे आहे त्यावर, जे होऊ इच्छितो ,त्याचे पांघरूण घालणे आहे .सद्गुण मिळविण्याच्या धडपडीमुळे ,आपला स्वतःशी सरळ  संबंध तुटतो .परंतु दुर्दैव हे आहे की एखाद्या ध्येयाची जोपासना करणे व जे आहे त्याच्याकडे बघण्याचे टाळणे हे सात्विक समजले जाते.नीट लक्षपूर्वक पाहाल, तर ही सात्विकता नाही, हे तुमच्या लक्षात येईल .ही केवळ समोरासमोर "मी"ला पाहण्याची टाळाटाळ करणे आहे .जे नाही ते बघणे ,म्हणजे सद्गुण नव्हे, तर जे जसे आहे तसे ओळखणे, व अश्या तऱ्हेने मी नष्ट करून मुक्त होणे  ,म्हणजे सद्गुण होय .

विघटन होत असलेल्या समाजात ,सद्गुणांची  जरुरी आहे .क्रांतीसाठी स्व-ज्ञान पाहिजे .त्यासाठी स्व-शोध स्वातंत्र्य पाहिजे .त्यासाठी सद्गुण पाहिजेत .नैतिक अधिष्ठानाविना स्वतंत्रता येणार नाही .स्वतंत्रते शिवाय सत्य कळणार नाही  . सत्य स्व-ज्ञानातून प्राप्त होईल.मनुष्याने स्वतःला घाबरता कामा नये . भीतीपासून तो स्वतंत्र पाहिजे. स्व-ज्ञानासाठी कळकळ पाहिजे .प्रत्येक विचार ,प्रत्येक कल्पना ,प्रत्येक श्रद्धा ,प्रत्येक क्रिया ,यांचे साक्षित्व करता आले पाहिजे .स्व-ज्ञान ही फार बिकट गोष्ट आहे ."मी "हा स्थिर नाही .मी गतिमान आहे .प्रतिक्षणी तुम्ही जे आहा ते आहा .तुम्हाला जे होणे असेल ते नव्हे.प्रत्येक क्षणी असणारे विचार भावना व अनुषंगिक क्रिया  म्हणजेच "मी". प्रतिक्षणी स्व-निरीक्षण रहाण्यासाठी ,अत्यंत चाणाक्ष, जागृत ,सावधान व तरल मन पाहिजे .स्वतःचा धि:कार ,विरोध, किंवा दोष देणे, यामुळे स्वतःच्या हालचाली स्वतःला कळणार नाहीत  .समजून घेणे म्हणजेच समरस होणे, धि:कार करणे नव्हे. आपण फक्त साक्षित्व केले पाहिजे .अभ्यास केला पाहिजे . समजून घेतले पाहिजे .एखाद्या मुलाला समजून घ्यायचे असल्यास त्याच्यावर प्रेम केले पाहिजे .त्याच्याशी खेळले पाहिजे . त्याच्या हालचाली समजून घेतल्या पाहिजेत .त्याच्या हालचालींचे निरीक्षण केले पाहिजे .त्याचा उपहास हेटाळणी करता कामा नये .त्याच्यावर रागावता कामा नये . त्याचा धि:कारही करता कामा नये .जर आपण केवळ रागावत, दोष देत , धि:कार करीत ,विरोध करीत,  उपहास व हेटाळणी करीत राहू ,तर आपण त्याला कधीच समजू शकणार नाहीं .त्याप्रमाणेच स्व-ज्ञानासाठी, अत्यंत जागृत, सावधान, परंतु निरिच्छ , निवड रहित अहेतूक ,असे साक्षित्व पाहिजे .जे आपण आहोत, तेच आपण आहोत, तेच खरे आहे .जे आपण चाहतो ,ते नव्हे.  चाहणे खरे आहे ,पण चाहतो ते नव्हे.चाहतो ती एक कल्पना आहे आणि म्हणूनच ती खोटी व फसवी आहे . 
 

स्व-ज्ञानासाठी मन एका विशिष्ट जाणीवयुक्त  पातळीवर पाहिजे.तुलना ,धि:कार व समर्थन, यांचा तिथे मागमूसही असता कामा नये .जागृत निरीच्छता पाहिजे .जेव्हा ज्ञानाची उत्कट व प्रामाणिक तळमळ असेल ,तेव्हाच मन त्या विशिष्ट जाणीवयुक्त पातळीवर असेल .तळमळीमधून मनाला ती स्थिती ,आपोआप प्राप्त होते. स्व-ज्ञान तळमळ ,जर उत्कट असेल ,तर त्यासाठी कुठल्याही शिस्त ,यम नियम, इत्यादिकांची तिळमात्र गरज नाही .उत्कट निरीच्छ जागृतता, निवड शून्य जागृतता ,सावधान साक्षित्व, यांचीच गरज आहे . ज्ञान व अनुभव यामुळे संस्कार समुच्चय  वाढतो .परंतु यामुळे खरी समज येण्यामध्ये अडथळे निर्माण होतात.संस्कार समुच्चयच स्व-ज्ञानाच्या आड येतो .हे ज्ञान व हा अनुभव सर्व विचारांचे केंद्र बनतात व आपण स्व-ज्ञानापासून वंचित होतो . प्रतिक्षणी स्व- निरीक्षणातून स्व-ज्ञान होत असते. जग हे आपल्यापासून निराळे नाहीं .आपण म्हणजेच जग.परंतु जगाला ,म्हणजेच स्वतःला, म्हणजेच संबंधमयतेला, प्रत्यक्ष समोरासमोर जाणून घेण्यापेक्षा, त्याची ओळख ,आपण पंथ धर्म पुस्तके इत्यादिकांच्या मार्फत  करून घेण्याचा प्रयत्न करतो . स्व-ज्ञानाची एखादी पद्धत आहे काय?ती असू शकेल काय ? एखादा हुषार मनुष्य व तत्त्वज्ञानी तथाकथित एखादी पद्धत शोधीलही.त्या मार्गाने गेल्यावर त्या मार्गावरची ठिकाणेही लागतील .जिथे तो मार्ग संपतो तिथे आपण पोचू.पण त्याने स्व-ज्ञान होईल का ?   स्व-ज्ञान प्राप्तीचा कुठचाही मार्ग मी साचेबंद बनवितो .साचेबंदता म्हणजे स्व-ज्ञान नव्हे . स्व ज्ञानासाठी कुठलाही मार्ग नाही .कुठलीही पद्धत नाही .पंथ म्हणजे ध्येय व ध्येयप्राप्ती.  आपल्यापैकी बर्‍याच लोकांना हेच  हवे असते .आपण गुरु करतो . आपण नेता निवडतो . विचार प्रणाली मानतो .कोणता तरी पंथ अनुसरतो.कारण आपल्याला काहीतरी हवे असते .आपल्याला सुरक्षितता हवी असते.पंथ, नेता, गुरू, इत्यादींच्या आश्रयाखाली ती आपल्याला मिळेल असे आपल्याला वाटत असते .आपल्या क्रिया, हालचाली, कल्पना, विचार ,श्रद्धा, ध्येये, भावना,आपली संपूर्ण जागृत व सुप्त विचार प्रक्रिया,  समजून घेण्याची आपल्याला इच्छाच नसते .आपल्याला एका विशिष्ट फळाची हमी देणारा मार्ग हवा असतो .आपल्याला सुरक्षितता निश्चिंतता हवी असते .ही ज्यामुळे आपल्याला मिळेल असे वाटते तो मार्ग आपण अनुसरतो .परंतु हे स्व-ज्ञान नव्हे.पंथ म्हटला म्हणजे तिथे इप्सिताची हमी देणारा नेता, गुरू ,प्रेषित ,असतोच  परंतु हा स्व-ज्ञानप्राप्तीचा मार्ग नव्हे . श्रेष्ठता पूजा स्व-ज्ञानापासून आपल्याला वंचित करते .अभिनिवेश निर्माण होतो .अभिनिवेशामुळे आपण दुसऱ्याला व स्वतःला समजू शकत नाही .

एखाद्या श्रेष्ठ पुरुषाच्या क्षेत्राखाली ,आपल्याला कदाचित  तात्पुरती सुरक्षितता वाटेलही ,परंतु स्व-क्रिया आकलन त्यांमुळे होणार नाही.श्रेष्ठता पूजेचा हा गुणधर्मच आहे कि ती आपल्याला गुंगी आणते.पूर्ण जागृती पासून दूर नेते .पूर्ण जागृती शिवाय स्वतंत्रता नाही  .स्वतंत्रे शिवाय सृजनशीलता नाही .स्व ज्ञानातूनच सृजनशीलता  प्रगट होते .आपल्यापैकी बरेचजण सृजनशील नाहीत .आपण केवळ यंत्र आहोत .स्वतःचे किंवा इतरांचे  कुठचेतरी अनुभव, कुठचेतरी निर्णय, कुठचीतरी अनुमाने ,कुठच्यातरी आठवणी, पुन: पुनः वाजवणारे अापण ग्रामोफोन झालो आहोत .अशी पुनरुक्ती  म्हणजे सृजनशीलता नव्हे .फक्त आपल्या वासना त्या रूपाने प्रगट केल्या जातात.आपल्याला अंतर्यामी सुरक्षितता पाहिजे असते.त्यासाठी आपली धडपड असते. आपण मार्ग शोधत असतो .गुरू हुडकत असतो .परंतु श्रेष्ठता पूजा, जागृततेला ,म्हणजेच स्व-ज्ञानाला मारक ठरते.स्वयंभू निस्तरंग मनस्थितीतच सृजनशीलता असते . आपल्यापैकी बहुतेक जण सृजनशीलता विसरलेले आहेत . कविता करणे ,चित्र काढणे, नाटक कादंबरी  पुस्तके लिहिणे, अभिनय करणे, इ. म्हणजे सृजनशीलता असा सर्वसाधारण अर्थ घेतला जातो.मला वरील गोष्टीमध्ये  सृजनशीलता आहे असे वाटत नाही.एखादी कल्पना ,एखाद्या माध्यमाच्या रूपाने, लोक प्रशंसेला प्राप्त होईल, अश्या पद्धतीने ,प्रगट करण्याची ती एक शक्ती आहे .सृजनशीलता व वरील शक्ती यांचा गोंधळ करून उपयोग नाही .सृजनशीलता  म्हणजे जिथे "मी" हरवतो; जिथे मन अनुभव ,आठवणी, वासना, इच्छा ,कल्पना, धडपड, यांचे केंद्र असत नाही,  अशी स्थिती होय.सृजनशीलता ही स्थिर स्थिती नाही .ती नित्य नवी आहे. जिथे "मी" व "माझे"अस्तित्वात नसते, जिथे विचार हा कुठच्याही संस्कारांच्या दिशेने केंद्रित झालेला नसतो, जिथे मी हरवतो, तिथेच सृजनशीलता असते .तेच सत्य ,तोच विश्व निर्माता, त्याचे वर्णन करता येणार नाही .कुठचाही मार्ग ,तत्त्व ,पंथ, तत्त्वज्ञान ,शिस्त ,यामुळे सृजनशीलता प्राप्त होत नाही. पूर्ण स्व-ज्ञाना मुळे ,निस्तरंग झालेल्या मनात ,ती आपोआपच प्रगटते.स्व-ज्ञान ही एखाद्या प्रक्रियेच्या शेवटी प्राप्त होणारी वस्तु नाही .कल्पना ,वासना, इच्छा ,भावना ,श्रद्धा, अनुभव, पूर्वग्रह, शेजारी पाजारी ,इतर लोक ,स्थावर जंगम वस्तुजात, इत्यादिकांशी असलेल्या संबंधातून प्रगटणाऱ्या प्रतिबिंबाचे;अखंड, निरीच्छ,  निवड रहित ,जागृत,संपूर्ण सावधानतेने ,अत्यंत अलिप्त, असे साक्षित्व ;म्हणजे स्व-ज्ञान.

अखंड सावधानता, ही फार बिकट गोष्ट आहे .आपल्याला कोणाला तरी अनुसरणे, ही फार सोपी गोष्ट वाटते.परंतु त्यामुळे मन चेतनाहीन, निष्प्राण ,सुस्त, बोजड व मंद बनते  .असे मन सृजनशीलतेच्या पातळीवर कधीही जाणार नाही . स्वतः-- म्हणजेच तुलना, धि:कार समर्थन व संग्रह यात घडून गेलेले मन-- हे जेव्हा नष्ट होते, तेव्हा सृजनशीलता प्रगट होते . सर्व तुलना व अनुभव संग्रह यांचे मन हे केंद्र असते."मी" व "माझे" या जाणिवेच्या पातळीवर नेहमी ते असते . आपल्याला काहीतरी असावयाचे असते. नसणेपणाला आपण फार घाबरतो .लहानाला मोठे व्हायचे असते.दुर्गुणी इसमाला सद्गुणी बनायचे असते .दुर्बळाला सबळ बनायचे असते.भित्र्याला शूर निर्भय बनायचे असते .आपण सत्ता मान प्रतिष्ठा श्रेष्ठता यांचे भुकेलेले असतो .हा मनाचा स्वाभाविक गुणधर्म आहे .किंबहुना ही धडपड म्हणजेच मन .म्हणजेच "मी "असे मन कधीही शांत होणार नाही .त्याला कधीही सत्य कऴणार नाही . दुःखी, कष्टी ,उपाशी ,जात पात, वर्ण, झगडे ,गोंधळ ,यांनी संत्रस्त झालेल्या जगात ,क्रांतीची आवश्यकता आहे .जग क्रांतीसाठी ,स्व-क्रांती झाली पाहिजे .क्रांतीला सुरुवात, स्वतःपासून झाली पाहिजे .ही क्रांती ,साचे बंद प्रक्रियेचे फल नव्हे.साचेबंद प्रक्रिया व फलप्राप्ती म्हणजे क्रांती नव्हे.स्वतःची संबंध रूप ओळख, म्हणजेच स्व-ज्ञान ,यातूनच क्रांती होईल . सर्व प्रश्नांना हे एकच उत्तर आहे .सर्व प्रश्न तिथेच सुटतील .आणखी श्रद्धा ,आणखी ध्येये ,आणखी गुरू, आणखी पंथ,  आणखी नेते, आणखी प्रेषित, यामुळे प्रश्न सुटणार नाहीत.जर तुम्ही स्वतःला, नवीन संस्कार संग्रहा शिवाय ,प्रतिक्षणी जाणू शकाल ,तर तुम्ही मनातीत  शांत स्थितीचा उपभोग घ्याल, आणि त्याच स्थितीत सृजनशीलता असते. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel