स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःचे चराचराशी असलेले संबंध  ओळखणे, किंबहुना चराचराशी असलेले संबंध म्हणजेच मी व तेच चराचर असे ओळखणे.असणे म्हणजेच संबंध रूप असणे.फक्त निसर्ग व सर्व वस्तुजात यांच्याशी असलेले संबंध समजून घेणे नव्हे, तर लोक व कल्पना यांच्याशी असलेले संबंध समजून घेणे, म्हणजे  स्वतःला ओळखणे होय.अस्तित्व म्हणजेच संबंधरूपता, हेच जीवन, या संबंध समजासाठी काही तज्ञतेची अावश्यकता आहे काय? अर्थात मुळींच नाही .फक्त जीवनाबद्दल संपूर्ण जागृतता पाहिजे.

जागृतता हा शब्द कोणत्याही प्रकारची तज्ञता या अर्थाने वापरलेला नाही.जीवनाला भेटण्याचे सामर्थ्य कसे प्राप्त होईल हा खरा प्रश्न आहे .जीवन म्हणजे फक्त शेजारी पाजारी मित्र सहकारी इ.यांच्याशीच असलेले संबंध नव्हेत, तर निसर्ग, आपल्या मालकीच्या वस्तू, कल्पना, वासना, व मनाने निर्माण केलेल्या असंख्य गोष्टी, यांच्याशी असलेली संबंधरूपता म्हणजे जीवन होय. हे सर्व म्हणजे आपले जीवन नव्हे काय ?संबंधरूपता नाही म्हणजे जीवन नाही.म्हणूनच जीवन व ही संबंधरूपता समजण्यासाठी स्वतःला कुठे कोंडून घेण्याची गरज नाही.आपली संपूर्ण संबंधरूप प्रक्रिया समजून घेण्यासाठी सतत जागृतीची आवश्यकता असते .          आपण जागृत कसे असावे ?आपण जागृत कसे व्हावे?तुम्ही जागृत कसे असता ?आपण झोपलेले नसतो तेंव्हा सदैव जागृत नसतो काय ?मग आणखी जागृतता ती कसली? असे एखाद्याला वाटणे शक्य आहे.पुढील गोष्टींचा विचार करा म्हणजे जागृतता म्हणजे  काय हे तुम्हाला स्पष्ट होऊ लागेल . एखाद्या व्यक्तीशी असलेले संबंध, पक्षी,पशु, वृक्ष, पक्षांचे  ओरडणे, इत्यादिकांबद्दल तुम्ही कसे जागृत असता?वर्तमानपत्र वाचताना आपण जागृत कसे काय असतो ?उथळ प्रतिक्रिया व खोल प्रतिक्रिया या दोन्हीबद्दल आपण जागृत असतो काय?कोणत्याही गोष्टीबद्दल अापण कसे काय जागृत असतो?क्षणाक्षणाला अनेक आव्हाने दिली जात असतात .नंतर दिलेल्या जबाबांबद्दल आपण जागृत  असतो काय? जागृतता म्हणजे  काय?मी प्रथम झाड पाहतो  .मग प्रतिक्रिया, जाणीव, तुलना, ओळख, नामकरण, वासना, अशी प्रक्रिया असते .ही अगदी उघड वस्तुस्थिती आहे .ही नेहमी घडणारी गोष्ट आहे .काय होत असते हे पाहण्यासाठी एखादे पुस्तक उघडून अभ्यास करण्याची किंवा कोणाच्या मागून जाण्याची गरज नाही.फक्त लक्षपूर्वक पाहिले म्हणजे झाले .            

अशा प्रकारे ओळखीतून, तुलनेतून ,नामकरणातून, अनुभवातून, तुम्हाला सुख वा दुःख होते .सुख वाढविण्याची आणखी मिळवण्याची व दुःख कमी करण्याची टाळण्याची इच्छा  व शक्ती निर्माण होते.एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त गोडी असेल, त्यापासून तुम्हाला सुख होत असेल, तर लगेच एक प्रकारची शक्ती निर्माण होते.त्या गोष्टीची जागृतता निर्माण होते. एखाद्या गोष्टीपासून दुःख निर्माण होत असेल तर लगेच जागृतता निर्माण होते .ती टाळण्याची शक्ती निर्माण होते.जोपर्यंत आपण या शक्तीकडे, ती आपल्याला समजून घ्यायला मदत करील, अशा आशेने पाहात आहोत, या शक्तीमुळे  आपण स्वत:ला समजू शकू ओळखू शकू असे तुम्हाला वाटत आहे ,तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही, असे मला वाटते .स्व-समज स्व-ओळख स्व-ज्ञान हे एखादे असे तंत्र नाही कि जे शिकता येईल . शिकवता येईल . जसजशी कुशलता व तंत्रज्ञानता वृद्धिंगत होईल, तसतसे ते तंत्र धारदार व प्रभावी बनेल अशी मुळीच शक्यता नाही .स्व-जागृततेची आपण जरूर परीक्षा घेऊ शकतो .आपण बोलतो कसे, वागतो कसे, थोडक्यात आपली चराचर व  कल्पना जगत् यांच्याशी कसे संबंध आहेत, यावरून आपण किती जागृत आहोत ,त्याची परीक्षा होऊ शकेल .फक्त स्वतःकडे पाहा फक्त पाहा .ओळखल्याशिवाय, समरस झाल्याशिवाय, तुलना केल्याशिवाय ,धि:कार केल्याशिवाय, समर्थन केल्याशिवाय, फक्त स्वतःकडे पहा .एक असामान्य घटना घडून येत असल्याचे तुमच्या निदर्शनस येईल. आपल्या बऱ्याच क्रिया आपोआप घडत असतात .त्या करायच्या म्हणून जोर घेऊन लक्ष देऊन केलेल्या नसतात .त्या अजाणता केलेल्या असतात .या क्रि,या संपुष्टात येतील, एवढेच नव्हे तर या क्रिया मागचे हेतू खोदल्याशिवाय, चौकशी केल्याशिवाय, निदर्शनास येतील .त्या क्रियांच्या  पाठीमागच्या, खोल सुप्त कमालीच्या गुंतागुंतीच्या हेतूंबद्दल जागृतता येईल.                 

जेव्हा जागृत असाल, तेव्हाच तुम्ही तुमचे विचार व क्रियांमागील संपूर्ण हेतूंची, प्रक्रिया पाहू शकाल .हे  धि:कार नसेल त्यावेळीच फक्त शक्य होईल .जेव्हा मी एखाद्या गोष्टीचा धि:कार करतो, तेव्हा ती गोष्ट मला समजत नाही .कुठल्याही गोष्टींची समज टाळण्याची, धि:कार ही एक पद्धत आहे .आपल्या पैकी बरेच जण हे हेतूपूर्वक करीत असतात.आपण तत्काळ धि:कार करतो व आपली समजूत करून घेतो कि ते आपल्याला समजले आहे. जर अापण धि:कार केला नाही व प्रत्येक गोष्टीचा आदर केला,आणि अापण केवळ जागृत असलो, तर त्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येण्यास मदत होईल. त्यातील अर्थ उलगडण्यास सुरुवात होईल .प्रयोग करून पहा. तुमचा तुम्हाला उलगडा होईल .फक्त जागृत असा. कोणत्याही समर्थनाशिवाय किंवा धि:काराशिवाय ,फक्त जागृत असा .कदाचित तुम्हाला हे नकारार्थी वाटण्याचा संभव आहे, परंतु वस्तूत: ते तसे नाही .ती जागृत गतिशून्यता आहे .आणि हीच प्रत्यक्ष क्रिया आहे .प्रयोग करून पहा आणि तुमचे तुम्हीच ठरवा .         

आपण जागृत नेहमीच असतो.  ही जागृतता गतिशून्य नसते .ती गतियुक्त असते. तिला दिशा असते . आपण शक्तीबद्दल जागृत असतो. आणि ही गती, ही दिशा, ही शक्ती, धारणेने  ठरविलेली असते.म्हणूनच अशी क्रिया ही प्रत्यक्ष क्रिया न ठरता अप्रत्यक्ष क्रिया ठरते.          

एखादी गोष्ट तुम्हाला समजून घ्यावयाची असेल तर तुम्ही गतिशून्य नको काय ?तुमचा कल फक्त ऐकण्याचा असला पाहिजे .जर तुम्ही त्यावर विचार करीत रहाल,तर्क करीत रहाल, किंवा नाना प्रश्न विचारीत रहाल,तर तुम्हाला खरा अर्थ समजेल काय ?तुम्ही प्रचंड संवेदनामय लोहचुंबक असले पाहिजे ,तरच त्याचा अर्थ तुमच्या अंत:करणाला जाऊन भिडेल. हे एखाद्या अत्यंत संवेदनाक्षम फोटो काढण्याच्या फिल्म सारखे आहे. जर मला तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर मी गतिशून्य जागृत असले पाहिजे .तुम्ही तुमची कथा मला सांगण्याला सुरुवात करता, ती ऐकताना मी गतिशून्य जागृत पाहिजे.  एखाद्या शक्तीचा किंवा तज्ञतेचा येथे प्रश्न उद्भवत नाही .या गतिशून्य जागृततेच्या प्रक्रियेत अापण स्वतःला ओळखण्याला समजण्याला सुरुवात करतो.जाणिवेचे केवळ बाह्य थरच नव्हे,तर सुप्त खोल थरही  उलगडण्याला व समजण्यालाआपण सुरुवात करतो.सुप्त खोल थर प्रकाशित होण्यास सुरुवात होते .हे खोलवरचे थरच जास्त महत्त्वाचे आहेत .कारण येथेच आपले सर्व हेतू, इच्छा, कल्पना, आशा, आकांक्षा, सुप्त वासना, उतावळेपणा, भीती व भुका, दडलेल्या असतात .बाह्यात्कारी आपण कदाचित ते सर्व ताब्यात ठेवले असतील, परंतु आंत ते प्रचंड गतीने उकळत उसळत खदखदत असतात .गतिशून्य जागृतीतून जोपर्यंत ते पूर्णपणे समजले नाहीत,तोपर्यंत स्वातंत्र्य, आनंद, केवलबुद्धि, प्राप्त होणे शक्य नाहीं.  
                       
केवलबुद्धी तज्ञतेने प्राप्त होते काय ?  केवलज्ञान म्हणजे आपल्या संपूर्ण जीवित प्रक्रियेबद्दल अखंड  जागृतता .या केवलबुद्धीची कुठच्याही तंत्राने,मार्गाने,पंथाने,प्राप्ती करून घेता येईल काय ?अर्थातच नाही. धर्मोपदेशक, धर्मगुरू, डॉक्टर, कारखानदार व्यापारी इ.समाजातील श्रेष्ठ व्यक्तीना केवलबुद्धीची प्राप्ती करून घेता येईल काय ?नाही कधीच नाही. परंतु आपण तज्ञतेला एवढे सरावलेले आहोत कि कुठलीही गोष्ट तज्ञतेने प्राप्त होईल असे आपल्याला वाटते . धर्मोपदेशक धर्मगुरू तंत्रज्ञ यंत्रज्ञ प्राध्यापक कारखानदार व्यापारी डॉक्टर जिकडे तिकडे तज्ञ मंडळीचे पीक आलेले आहे .आपल्या मेंदूची रचनाच तज्ञताप्रिय झालेली आहे.बुद्धीचा परमोत्कर्ष,बुद्धीची परम उच्चतम अवस्था, मग तुम्ही त्याला ईश्वर,  अंतिम सत्य, किंवा आणखी काही म्हणा,त्याचे वर्णन करता येणार नाही.ते अंतिम सत्य समजण्यासाठी आपल्याला असे वाटते, कि आपण तज्ज्ञ झालो पाहिजे .मग आपण अभ्यास करतो, शोध घेतो, गुरू शोधतो,  तज्ञांकडे जातो .जी शक्ती आपली दुःखे व असंतोष नष्ट करण्यास मदत करील अशी शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण स्वतःच अभ्यास करतो .या सर्वांचा कांहीही उपयोग होणार नाहीं .        
 
आपल्या दैनंदिन अस्तित्वातील दु:खे विरोध असंतोष हे दुसर्‍या  कोणाकडून नष्ट केले जातील काय ?जर दुसरा कोणी ते नष्ट करू शकणार नसेल, तर अापण स्वतः ते नष्ट करू शकू काय?आपली समस्या ही आहे .कुठलीही समस्या समजण्यासाठी कांही बुद्धी लागते .ही बुद्धी तज्ञतेपासून, किंवा तज्ञता प्राप्त करून घेऊन,  नंतर तिच्या साह्याने समजण्याचा हेतू मनात धरून ,मशागत करून, प्राप्त होईल काय ? संपूर्ण स्व-प्रक्रियेबद्दल, अखंड गतिशून्य जागृत राहूनच ही बुद्धी अस्तित्वात येते.अखंड गतिशून्य जागृतता म्हणजेच केवलबुद्धी होय .स्वतःबद्दल निवडरहित जागृतता पाहिजे .योग्यायोग्य निर्णयविरहित जागृतता पाहिजे .ही गतिशून्य जागृतता म्हणजे झोप किंवा आळस नव्हे.उलट ही पराकोटीची तरलता व तत्परता आहे.तुम्ही जेव्हा असे गतिशून्य जागृत असाल तेव्हा त्या गतिशून्यतेतून कुठल्याही समस्येला सर्वस्वी निराळे महत्त्व प्राप्त होईल.जेव्हा कुठलीही समस्या ओळखली जात नाही, तुलना केली जात नाही, योग्य अयोग्य निर्णय नसतो, समरसता नसते ,तेव्हा समस्या आपणहून तिचा गाभा तुम्हाला विशद करण्यास सुरुवात करते .जर तुम्ही हे सतत अखंड अविरत करू शकाल, तर प्रत्येक समस्या तुम्ही उथळपणे नव्हे, तर मूलगामी पद्धतीने सोडवू शकाल.

पण सर्व अडचण तर इथेच आहे .आपल्यापैकी बरेचजण गतिशून्य जागृत राहण्यासाठी असमर्थ असतात .स्वतः भाष्य केल्या शिवाय जागृत राहण्यास असमर्थ असतात. अापण समस्येला तिचा गाभा उघडून दाखवण्याला वेळच देत नाही .जर आपण गतिशून्य जागृत राहू, तर समस्या आपली गाथा तुमच्या कानात गुणगुणायला सुरुवात करील.कुठल्याही समस्येकडे गुंतल्याशिवाय तटस्थपणे कसे पाहायचे हेच आपल्याला माहीत नाही. आपण गुंतल्याशिवाय समस्येकडे पहायाला समर्थ नाही.आपल्याला ती समस्या सोडवायची असते .आपल्याला फलप्राप्तीची इच्छा असते .आपल्याला उत्तर हवे असते. आपण शेवटाकडे बघत असतो .आपण ध्येय प्राप्तीकडे पाहात असतो.किंवा समस्येचे आपल्या सुखदुःखा प्रमाणे भाषांतर करण्याला सुरुवात करतो .किंवा आपल्याजवळ या समस्येशी दोन हात कसे करावेत त्याचे उत्तर तयार असते. मूलतः  नवी असलेली समस्या आपण जुन्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करतो .
  
आव्हान नेहमी नवे असते पण जबाब मात्र जुना असतो .प्रत्येक समस्येला यशस्वीपणे तोंड देता न येणे ती संपूर्णपणे सोडवता न येणे ही आपली अडचण असते .समस्या ही नेहमी संबंध-समस्या असते.कल्पना ,विचार, भावना, वस्तू व लोक, यांच्याशी असलेल्या संबंधा शिवाय दुसरी कुठलीही समस्या असू शकत नाही .सतत बदलत्या नित्य नव्या समस्यांना तोंड देण्यासाठी, त्या यशस्वी रित्या सोडविण्यासाठी, गतिशून्य जागृततेची आवश्यकता असते.ही गतिशून्यता ,इच्छाशक्ती तज्ञता इत्यादीनी प्राप्त करून घेता यायची नाही .
     
आपण गतिशून्य नाही .
आपण निवड रहित नाही.
आपण अलिप्त नाही.
आपण तटस्थ नाही.
              
या सर्व गोष्टींबद्दल जागृतता येणे ही सुरुवात असेल .विशिष्ट समस्येला विशिष्ट उत्तर आपल्याला हवे असते . जागृतता ही शहाणपणा्ची सुरुवात आहे.स्वतःचे समस्येशी असलेले संबंध ओळखणे व आपण ती कशी हाताळीत आहोत ते पाहणे ही सुरुवात असेल.जसजसे स्वतःचे समस्येशी असलेले संबंध समजण्याला सुरूवात होईल, आपण कसा जबाब देतो, आपले निरनिराळे पूर्वग्रह व समजुती काय आहेत ,आपल्या इच्छा वासना कल्पना आकांक्षा हेतू भावना अाशा काय आहेत, आपली विचारप्रक्रिया काय आहे,आपले अंतरंग कसे आहे, ते समजण्याला सुरुवात होईल .जसजसे हे होत जाईल, तसतसे स्वातंत्र्य प्राप्त होत जाईल ,आणि तिथेच सुटका आहे .

निवड रहित जागृतता अत्यंत महत्त्वाची आहे .निवड म्हटली की विरोध आला .निवडणारा गोंधळलेला आहे म्हणून तो निवडतो. गोंधळलेला नसेल तर निवडण्याचा प्रश्नच येत नाही .जो गोंधळलेला आहे तोच काय करावे व काय करू नये ते ठरवीत असतो .जो स्वच्छ स्पष्ट असतो तो निवडीत नसतो .जे काही आहे ते आहे, त्यात निवडण्याचा प्रश्नच कुठे येतो ?

कल्पनेवर आधारित कर्म, निवड युक्त कर्म असते. तिथे कर्ता असतो हेतू असतो व कर्मही असते.असे कर्म सोडविणारे,सुटका करणारे,मुक्त करणारे नसते .त्या कर्माने धारणे प्रमाणे आणखी विरोध आणखी अडथळा आणखी असंतोष निर्माण केला जातो .      

गतियुक्त जागृततेतूनच  अनुभव निर्माण होतो.अनुभव संग्रहाशिवाय प्रतिक्षणी अखंड जागृत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे .तुम्ही संग्रह करता त्याच क्षणी तुम्ही फक्त संग्रहानुरुप जागृत असता.तुमची जागृतता आकारयुक्त असते. चौकटीतील असते .ती धारणेतून निर्माण झालेली असते .आणि म्हणूनच ती गति युक्त दिशायुक्त असते.तिथे फक्त पहाणे नसते, तर आकार असतो, भाषांतर असते ,अनुवाद असतो, जिथे हेतू आहे तिथे निवड आहे.निवड विरोध आणतो आणि विरोध समज अशक्य करून टाकतो .        

जीवन म्हणजे संबंधरूपता. ही सतत बदलती संबंध रूपता समजण्यासाठी,उत्कट, गतिशून्य,  गतिमान नाही, अशी जागृतता आवश्यक आहे .मी पूर्वीच म्हटले आहे कि अशी निवडशून्य गतिशून्य जागृतता कुठल्याही शिस्त यम नियम तंत्र आदि गोष्टींनी प्राप्त होणार नाही.यासाठी आपण फक्त जागे असले पाहिजे .  फक्त सावधानता पाहिजे .आपले विचार व भावना याबद्दल प्रतिक्षणी अखंड गतिशून्य जागृतता पाहिजे .केवळ आपण जागे असू तेव्हा नव्हे ,तर झोपेत, स्वप्नातही निरनिराळे भास होत असतानाही, गतिशून्य जागृतता पाहिजे. अापण जसजसे खोल जातो तसतशी प्रतिके झुगारून द्यायला सुरुवात होते .त्यालाच आपण भास किंवा स्वप्ने वगैरे म्हणतो.अशा प्रकारे जे गुप्त आहे त्याचा दरवाजा उघडला जातो . गुप्त ज्ञात होते .परंतु जे अज्ञात  आहे त्यासाठी या सर्वांच्या पलीकडे गेले पाहिजे .आणि या दरवाजा पलीकडे जाता न येणे  ही आपली अडचण आहे .अंतिम सत्य ही मनाने जाणण्याची ओळखण्याची गोष्टच नव्हे .मन हे ज्ञाताचे फल आहे .ते भूतकाळाचे अपत्य आहे .आणि म्हणूनच मन जेव्हा आपली स्वतःची संपूर्ण हालचाल समजून घेईल तेव्हांच  सत्य प्रगट होण्याची सत्य अस्तित्वात येण्याची शक्यता आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel