प्रवेश सोळावा
(लक्ष्मीधरपंत आपल्या दिवाणखाण्यांत बसले आहेत. पलंगावरच्या स्वच्छ आंथरूणावर आजारांतून उठलेला नारायण आहे.)

नारायण -  बाबा, मजवरचा सगळा राग गेला ना ? मी करीत असलेलं काम तुमच्या बरंच मनाविरूध्द झालं !

लक्ष्मीधरपंत -  बाळ, नको रे पुन्हा असं बोलू ! कसला रे राग ! तें झालं गेलं आतां तें सारं विसरलं पाहिजे. (कारकून येतो.)

कारकून -  रामजी शेतकरी आला आहे.

लक्ष्मीधरपंत -  मग रामजीला इथंच घेऊन या.

कारकून -  (आश्चर्यानें ) इथें दिवाणखान्यांत ?

लक्ष्मीधरपंत -  हो, येथें दिवाणखान्यांत, इथं मी बसलों आहें इथं आणा. गरिबांत व आपणांत कसला भेद ?
(कारकून जातो. रामजी आपला मुलगा विश्राम यासह प्रवेश करतो.)

रामजी
-  रामराम, दादा !

लक्ष्मीधरपंत
-  राम !काय रामजी, बस. बसण्यास संकोच नको करूं. बसरे बाळ ! (रामजी व विश्राम अदबीनें बसतात.)

लक्ष्मीधरपंत -  रामजी, यंदाहि पिकं बरीं नाहींत ना ?

रामजी -  प्रथम पीक बरं हातं, परंतु मागूनच्या संततधारेनं नुकसान झाल. आलेल सारं गेलं.

लक्ष्मीधरपंत -  देव ठेवील तसं राहिलं पाहिजें.

रामजी -  आमची देव तुम्हीच ! दादा, तुम्ही दया कराल तरच आम्हीं जगूं ! मी आपणास पैशाच विचारवयास आलों होतों. घरीं एक पै नाहीं. माझी पोर गेली. तिच्या आजारांत औषधपाण्याची नीट तरतूद झाली नाहीं. बायको आजारी आहे. काय करूं ? (रामजीच्या डोळयास पाणी येतें; विश्राम डोळे चोळतो.)

लक्ष्मीधरपंत -  रामजी, तूं पैशाची काळजी नको करूं. खरं म्हटलं तर आजपर्यंत जें व्याज घेतलं त्यानंच माझ्या पैशांची फेड झाली आहे, समजलास ? माझं देणं तूं आतां मुळींच लागत नाहींस. (कारकुनाकडे वळून) तो कर्जरोखा फाडून यांस ' सर्व देणं पावलं ' असं लिहून द्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel