रामजी -  हां हां हां ! असं कसं होईल ? रावसाहेब, असं उलटं रागानं बोलूं नका. मीं पैसे बुडवणार नाही.

लक्ष्मीधरपंत -  रामजी, मी थट्टा नाहीं करीत. माझ्या नारायणानं ही उदार बुध्दि मला शिकवली, दुस-याच्या घरादारावरून नांगर फिरवणारा तो लक्ष्मीधरपंत आतां नसून, परोपकारात आनंद मानणार, दुस-याचे अश्रू पुसणारा, त्यांचे संसार सुखाचे करण्यासाठीं त्यांना मदत करणारा, असा लक्ष्मीधरवंत आतां उरला आहे.

रामजी -  देव तुम्हां बापल्येकांना उदंड आयुक्ष देवो. असाच आम्हां गरिबांचा दुवा घेत आसा.

नारायण -  हा तुझा मुलगा वाटतं ?

रामजी -  होय, हा सगुणेच्या पाठचा विश्राम ! नको येऊं म्हटलं तरी आला.

विश्राम -  मी धाकटया धनीसाहेबांना पहायला आलों आहें. धाकटया धनीसाहेबांसाठीं काकडी आणली आहे. (देतो.)
लक्ष्मीधरपंत -  रामजी, तुमचीं मनं किती उदार असतात ! गरीब झोंपडयांत मोलाचे सद्गूण आढळतात ! दया, प्रेम, कृतज्ञता, आदर हें गुण तिथें जिवंत असतात, परंतु, दिवाणखान्यांत हे गुण मेले आहेत.

रामजी -  धनी, एक इनंती करूं का ? आमचीं गाय करकुनांनीं आणली आहे, ती परत देववाल का ? घरीं विश्रामच्या आईच्या औषधाला दूध नाहीं. आमचा गाईवर फार जीव. रोग्याचें पैसे घ्या पण गाय द्या.

पद (कवाली)
आम्हांला गाय ही प्यारी । जणूं मी माय संसारीं ॥ ध्रृ० ॥
वशिच धेनू सतत मानू । खचित संपत्ति ती भारी॥ १ ॥
जीवनांच्या । साधनांच्या । थोर राशीस देणारी ॥ २ ॥
धर्म - कर्मा । पुण्यधामा।  आम्हांला तीच दैन्यारी ॥ ३ ॥

ती गाय आमची आम्हांला द्याल का परत ?
लक्ष्मीधरपंत -  रोख्याचे पैसे घ्यावयाचें नहींत, हें ठरलेंच आहे.

यांनीं तुमची गाय आणली आहे, रामजी ?
कारकून -  मी पैसे देणार आहे. मला फुकट घ्यायची नाहीं !

लक्ष्मीधरपंत -  रामजी, किती किंमत ठरलीं होती ?

रामजी -  पंचवीस रूपये.

लक्ष्मीधरपंत -  मीं ती गाय पाहिली आहे. त्या सुंदर गायीचें पंचवीस रूपये देऊन या गरिबाला तुम्हीं नाडणार होता. परंतु तुम्हांला तरी मी कां दोष द्यावा ? मीं उलटया काळजाचा धनीच जवळ असलवर तुम्हीं तरी असें कां वागूं नये ? आतां यांची गाय यांस परत द्या.

कारकून -  मी आपल्या आज्ञेबाहेर नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel