एकदा पशू आणि पक्षी यांची भयंकर लढाई सुरू झाली तेव्हा वटवाघळाने विचार केला की, आपल्या शरीराच्या विचित्र रचनेमुळे आपण पशू आहोत की पक्षी आहोत याबद्दल सगळ्यांना जो संशय वाटतो त्याचा फायदा घेण्यास ही संधी चांगली आहे. मग ते वटवाघूळ बाजूस जाऊन तिर्हाईताप्रमाणे लढाई पाहात उभे राहिले. काही वेळाने पक्ष्यांची सरशी होऊन पशूंचा पराभव होऊ लागला. तेव्हा वटवाघूळ पक्ष्यांमध्ये जाऊन मिसळले. पण थोड्या वेळातच पशूंचा जय होईल अशी लक्षणे दिसू लागली. तेव्हा ते पशूंकडे जाऊन त्यांना म्हणाले, 'अरे, माझं तोंड उंदराच्या तोंडासारखं आहे. यावरून मी पक्षी नसून पशूच आहे, याबद्दल तुमची खात्री होईल. तर मला तुमच्यात घ्या, मी तुमचं नेहमी कल्याण करण्यासाठी झटेन.' पशूंनी ती गोष्ट मान्य केली. लढाईच्या शेवटी पक्ष्यांचा राजा जो गरुड त्याने मोठा पराक्रम करून सगळ्या पशूंचा पराभव केला. तेव्हा आपल्या जातीच्या हाती लागून आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून ते वटवाघूळ तेथून लपत छपत पळून जाउन झाडाच्या ढोलीत लपून बसले. रात्र पडून सगळे पक्षी आपापल्या घरट्यात गेल्याशिवाय ते आता बाहेर पडत नाही.
तात्पर्य
- स्वजनास सोडून परकीयांना फितूर होणे हे पाप असून त्याचे प्रायश्चित्त बर्याच वेळ मिळाल्यशिवाय राहात नाही.