एक खेचर कुरणात फार दिवस चरून चांगले धष्टपुष्ट झाले व स्वच्छंदीपणे नाचू लागले. स्वतःच्या स्थितीसंबंधाने त्याला थोडा गर्व होऊन तो आपल्याशीच म्हणाला, 'कसाही झालो तरी मी घोडीचा बच्चा आणि ती घोडी म्हणजे एखादी हरदासी घोडे नसून चांगली शर्यत जिंकणारी काठेवाडी घोडी होती आणि मी तिचा बच्चा असल्यामुळे अर्थातच मीही पाणीदार निघालो. प्रसंग पडल्यास वाटेल तेवढी मजल मी सहज मारू शकेन यात बिलकुल संशय नाही.' पुढे एके दिवशी त्याचा मालक त्याच्या पाठीवर बसून काही जरुरीच्या कामासाठी एका गावी जाण्यास निघाला व खेचराने लवकर चालावे म्हणून त्याला चाबकाने फटकारे लगावू लागला. चालता चालता ते खेचर फार दमले तेव्हा त्याला आठवण झाली की, 'आपली आई जरी घोडी होती तरी आपला बाप कधीही घोडा नव्हता, गाढवच होता !'

तात्पर्य

- आपल्या अंगचे नुसते सद्‌गुण पाहून किंमत ठरविणे वेडेपणाचे होय, गुणाबरोबर दोषाचाही विचार केला पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel