ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, 'सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !'
रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, 'अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?' त्यावर इसापने उत्तर दिले, 'जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?'विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.'
इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, 'अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.' मग तो इसापकडे पाहून म्हणाला, 'अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.'
दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, 'अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?' त्यावर इसाप उत्तरला, 'जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.' इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.
तात्पर्य
- कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.