२८
कुमार काश्यप

“उत्तम भाषण करणार्‍या भिक्षुश्रावकांत काश्यप श्रेष्ठ आहे.”

राजगृह येथील एका तरुणीला भिक्षुणी होण्याची उत्कट इच्छा होती. पण आईबापांची तिला परवानगी मिळेना. पुढें लग्न झाल्यावर आपल्या नवर्‍याचें मन वळवून त्याच्याकडून तिनें परवानगी मिळविली, व ती भिक्षुणी झाली. भिक्षुणी झाल्यावर गर्भवतीचीं लक्षणें तिच्यांत स्पष्ट दिसूं लागलीं, व त्याबद्दल गवगवा झाला. ह्या प्रकरणीं चौकशी करण्यासाठीं भगवंतानें उपालीला नेमलें. त्यानें विशाखेला व श्रावस्ती येथील इतर उपासिकांना बोलावून ह्या प्रकरणीं नीट चौकशी करून ‘त्या तरुण भिक्षुणीचा कांहीं दोष नाहीं, कारण भिक्षुणी होण्यापूर्वींच ती गरोदर होती,’ असा निकाल दिला; व तो भगवंतालाहि पसंत पडला. तिला जो मुलगा झाला त्याला पसेनदि राजाच्या स्वाधीन करण्यांत आलें. पसेनदीनें त्याचें काश्यप असें नांव ठेवलें, व तो मोठा झाल्यावर त्याला प्रव्रज्या देवविली. काश्यप नांवाचे दुसरेहि भिक्षु होते; म्हणून त्याला कुमार काश्यप म्हणण्याचा प्रघात पडला;  व त्याच नांवानें तो पुढें प्रसिद्धीला आला. मज्झिमनिकायांतील वम्मीक सुत्ताच्या अट्ठकथेंतहि अशाच तर्‍हेची कुमार काश्यपाची गोष्ट आली आहे.


२९
महाकोट्ठित

“प्रतिसंभिदाज्ञान १ झालेल्या भिक्षुश्रावकांत महाकोट्ठित श्रेष्ठ आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- अर्थ, धर्म, निरुक्ति आणि प्रतिभान, अशा चार प्रतिसंभिदा आहेत. पदार्थाच्या यथार्थ ज्ञानाला अर्थप्रतिसंभिदा, कार्यकारणाच्या ज्ञानाला धर्मप्रतिसंभिदा, भाषाज्ञानाला निरुक्तिप्रतिसंभिदा व निर्वाणाच्या ज्ञानाला प्रतिभानप्रतिसंभिदा असें म्हणतात. ह्या चार प्रतिसंभिदांचा विस्तार त्रिपिटकान्तर्गत ‘पटिसंभिदामग्ग’ ह्या ग्रंथांत केला आहे. अभिधर्म पिटकाच्या विभंग प्रकरणांतहि ह्यांच्यावर टीका आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
हा श्रावस्ती येथें ब्राह्मणकुळांत जन्मला. कोट्ठित हें त्याचें नांव. पुढें भिक्षु झाल्यावर त्याला महाकोट्ठित म्हणूं लागले. माज्झिमनिकायांतील महावेदल्लसुत्तांत त्याचप्रमाणें संयुत्त आणि अंगुत्तरनिकायांतील बर्‍याच सुत्तांत ह्यानें सारिपुत्ताला फार महत्त्वाचे प्रश्न विचारल्याचे आढळून येतें, व त्यावरून त्याला प्रतिसंभिदाज्ञान झालें होतें, हें स्पष्ट दिसतें. परंतु दुःखाची गोष्ट ही कीं, ह्या सर्व सत्तांतून किंवा त्यांच्या अट्ठकथांतून महाकोट्ठिताच्या चरित्रावर विशेष प्रकाश पाडणारा मजकूर सांपडत नाहीं.                       
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel