पिंडोल भारद्वाज

“सिंहगर्जना १  करणार्‍या माझ्या भिक्षुश्रावकांत पिंडोल भारद्वाज श्रेष्ठ आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- सिंहगर्जना किंवा सिंहनाद ह्याचा अर्थ ‘मोठमोठ्यानें बोलणें’  नव्हे. मुद्याची गोष्ट सांगून ती प्रतिपादन करण्याचें करण्याचें सामर्थ्य असणें, ह्याला सिंहगर्जना किंवा सिंहनाद म्हणतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्याचा जन्म राजगृह नगरांत एका ब्राह्मणकुलांत झाला. भारद्वाज हें त्याचें नांव. वयांत आल्यावर वेदाध्ययनांत पारंगत होऊन तो पांचशें शिष्यांना वेद शिकवीत असे. स्वभावानें जरा लोभी असल्यामुळें आपल्या शिष्यांसह जेवण्याखाण्याचीं आमंत्रणें मिळविण्यांत बरीच खटपट करीत असे. त्यामुळें पिंडोल म्हणजे ‘पिंडासाठीं लोल’ असें त्याला नांव पडलें. भगवान् राजगृहाला आल्यावर त्याचा धर्मोपदेश ऐकून भारद्वाज भिक्षु झाला, व लवकरच अर्हत्पद पावला.

ही मनोरथपूरणीची गोष्ट झाली. पण सळायतन संयुत्ताच्या तिसर्‍या पण्णासकाच्या चोवीसाव्या सुत्ताच्या अट्ठकथेंत २  ह्याची गोष्ट निराळीच सांपडते :-
------------------------------------------------------------------------------------------------------------
२- केवळ सयामी अक्षरांनीं छापलेल्या अट्ठकथेच्या आधारें हा मजकूर लिहिला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
“हा अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता, व भिक्षुसंघाचा लाभसत्कार पाहून उदरनिर्वाहासाठीं भिक्षु झाला. त्यानें एक मोठें मातीचें पात्र भिक्षेसाठीं ठेवलें होतें, व तो तें भरून पेज (यवागू) पीत असे, त्या पात्रभर वडे खात असे व भात जेवीत असे. त्याचा अधाशीपणाचा स्वभाव भिक्षूंनी भगवंताला कळविला. भगवंतानें त्याला ‘पात्रस्थविका’ (पिशवी) वापरण्यास परवानगी दिली नाहीं. तो आपलें पात्र खाटेखालीं ठेवीत असे. तें काढीत असतां व ठेवीत असतां झिजत गेलें व त्यामुळें त्यांत पावशेराचाच भात (नाळिकोदन) मावूं लागला. ही गोष्ट भगवंताला समजलीं तेव्हां त्यानें भारद्वाजाला पात्रस्थविका वापरण्यास परवानगी दिली. ह्याप्रमाणें पिंडासाठीं भिक्षु झाला म्हणून त्याचें ‘पिंडोल’ हे नांव पडलें. त्याचें गोत्र भारद्वाज होतें. दोन्हीं मिळून ‘पिंडोल भारद्वाज’ म्हणत.

इंद्रियसंयुत्ताच्या एकुणपन्नासाव्या सुत्तांत पिंडोल भारद्वाजानें आपणाला अर्हतपद मिळाल्याचें आविष्करण केल्याची कथा आहे ती अशी :-

‘एके समयीं बुद्ध भगवान् कौशांबी येथें घोषितारामांत रहात होता. त्या वेळीं पिंडोल भारद्वाजानें, आतां जन्म राहिला नाहीं, ब्रह्मचर्य परिपूर्ण झालें, कर्तव्य केलें, आणि ह्यापुढें भव नाहीं हें मी जाणतों, अशा रितीनें अर्हत्पदप्राप्तीचें आविष्करण केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel