१८
सीवलि

“लाभी भिक्षुश्रावकांत सीवलि श्रेष्ठ आहे.”

ह्याच्या आईचें नांव सुप्पवासा. ती एका कोलिय राजाची मुलगी होती. तिची गोष्ट उदानवग्गांत आहे ती अशी :-

भगवान् बुद्ध कुंडिया नांवाच्या नगराजवळ कुंडधान वनांत रहात होता. कोलियराजाची मुलगी सुप्पवासा सात वर्षेंपर्यंत गरोदर असून त्या वेळीं सात दिवस प्रसववेदना भोगीत होती. (१) तो भगवान् सम्यक्संबुद्ध आहे खरा, जो अशा दुःखाच्या विनाशासाठीं धर्मोपदेश करतो;  (२) त्या भगवंताचा श्रावकसंघ सन्मार्गानें चालणार खरा, जो अशा प्रकारच्या दुःखाच्या विनाशासाठीं प्रयत्‍न करतो; (३) तें निर्वाण सुखकारक खरें, ज्यांत अशा प्रकारचें दुःख आढळत नाहीं;  ह्या तीन साद्विचारांनीं ती आपल्या असह्य वेदना सहन करी. आपण अशा रितीनें दुःख भोगीत आहें, हें तिनें नवर्‍याकडून भगवंताला कळविलें. तें ऐकून ‘ती सुखी होवो,’ असा भगवंतानें आशीर्वाद दिला, व त्याच वेळीं सुप्पवासा प्रसववेदनांतून मुक्त होऊन पुत्र प्रसवली. पुढें तिनें भिक्षुसंघासह भगवंताला आमंत्रण करून सात दिवसपर्यंत दानसमारंभ केला. त्या वेळीं सारिपुत्तानें सीवलीला ‘प्रपंचांत कसें काय वाटतें,’ असा प्रश्न केला. तेव्हां तो म्हणाला, “सात वर्षें मातेच्या उदरांत काढलेल्या मला प्रपंचाचें सुख काय विचारतां?” १ 
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- ह्या वेळीं सीवलींचे वय जन्मल्यापासून अठरा दिवसांचें होतें, असें उदानअट्ठकथेंत सांगितलें आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
सीवलि वयांत आल्यावर भिक्षु झाला. त्यानें पुष्कळ लांबलांबचे प्रवास केले होते; आणि पूर्वपुण्याईमुळें प्रवासांत त्याला चीवरपिंडपातादिकांची कधींहि टंचाई पडत नसे. त्याच्या प्रवासाची यादी ह्या दोन गाथांत आहेः-

निग्रोधं पठमं पस्सि दुतियं पण्डवपब्बतं ।
ततियं अचिरवतियं चतुत्थं वरसागरं ।।
पञ्चमं हिमवन्तं सो छट्ठं छद्दन्तमागमिं ।
सत्तमं गन्धमादनं अट्ठमं अथ रेवतं ।।


अर्थः- पहिल्यानें निग्रोधाला १ (१- तो एका निग्रोधवृक्षाजवळ आला व तेथें त्याला देवतेनें भिक्षा दिली, असे मनोरथपूरणीचें म्हणणें आहे. परंतु प्रथमतः तो कपिलवस्तु येथील निग्रोधारामांत आला, असें म्हणणें विशेष सयुक्तिक दिसतें.) आला, नंतर राजगृह येथील पांडवपर्वतावर, तिसर्‍यानें श्रावस्ती येथील अचिरवती नदीवर, चवथ्यानें महासमुद्रापर्यांत, पांचव्यानें हिमालयावर , सहाव्यानें षड्दन्त सरोवाला, सातव्यानें गंधमादनाला, व आठव्यानें (भगवंताबरोबर) खदिरवनिय रेवताला भेटण्यासाठीं.

अशा बिकट प्रवासांत सीवलीला त्रास पडला नाहीं, म्हणून त्याला लाभी भिक्षूंत अग्रस्थान मिळालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel