३०. उपसंपदा देण्यापूर्वीं उमेदवाराला एका बाजूला नेऊन संघाने परवानगी दिलेल्या भिक्षूनें संघापुढे त्याला कोणकोणत्या गोष्टी विचारण्यांत येणार आहेत समजावून सांगावें. नंतर त्या उमेदवाराला संघासमोर आणून हे प्रश्न विचारण्यांत यावे:-
कुष्ठ, गंड, किलास, क्षय व अपस्मार हे रोग तुला नाहींत ना? तूं मनुष्य आहेस ना? तूं पुरुष आहेस ना? स्वतंत्र आहेस ना? (दास नाहींस ना?) ऋणमुक्त आहेसना? आईबापांनी तुला परवानगी दिली आहे ना? तुला वीस वर्षें पुरीं झालीं आहेत ना? तुझें नांव काय? तुझ्या उपाध्यायाचें नांव काय? ह्या प्रश्नांची त्यानें यथायोग्य उत्तरें दिल्यावर पुद्धतीप्रमाणें विज्ञाप्ति करून व त्रिवार संघांत जाहीर करून, कोणी हरकत घेतली नाहीं तर त्याला संघांत उपसंपदा मिळाली असें समजावें.

३१. नंतर पावलें घालून सावली मोजावी१(१- पावलांनी सावली मोजून वेळ समजण्याची पद्धति होती.) कोणता ऋतु व दिवसाचा कोणता भाग हें त्यास सांगावे. २३व्या कलमांत सांगितलेले चार आश्रय त्यास सांगावे. तदनंतर त्याला चार अकार्य गोष्टी सांगाव्या:-(१) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें पशूशीं देखील मैथुन-व्यवहार करतां कामा नये. जो भिक्षु मैथुन-व्यवहार करील तो आश्रमण होईल. अशाक्यपुत्रीय होईल. जसा डोकें कापलेला मनुष्य नुसत्या धडानें जगूं शकत नाहीं. तसा मैथुन-व्यवहार केलेला भिक्षु श्रमण राहूं शकत नाहीं, शाक्यपुत्रीय होऊं शकत नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये. (२) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूने गवताच्या काडीचीहि चोरी करतां कामा नये. जो भिक्षु पावलीच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा पदार्थ चोरतो तो अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो. पिकलेलें पान खालीं पडलें असतां पुन्हां जसें हिरवें होणें शक्य नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहणें शक्य नाही, शाक्यपुत्रीय राहणें शक्य नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये, (३) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें जाणूनबुजून किड्यामुंगीसारख्या प्राण्यालाहि मारतां कामा नये. जो भिक्षु जाणूनबुजून-गर्भावस्थेंतील देखील-मनुष्यप्राण्याला ठार मारील तो आश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल. द्विधा झालेली शिला जशी पुन्हां सांधतां येत नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहूं शकत नाहीं. शाक्यपुत्रीय राहूं शकत नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये. (४) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षुनें आपणांस एकांत आवडतो एवढी देखील बढाई मारूं नये. जो भिक्षु असदिच्छेनें आपणांस प्राप्त झाली नसलेली समाधि प्राप्त झाली आहे असे लोकांस सांगतो, आपणास प्राप्त झाला नसेलेला मार्ग किंवा फळ प्राप्त झालें आहे असें सांगतो, तो अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो. डोकें कापलेला ताडवृक्ष जसा पुनरपि वाढूं शकत नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहूं शकत नाही. शाक्यपुत्रीय राहूं शकत नाही. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये.

श्रामणेरप्रव्रज्या


३२. भगवान् बराच काळ राजगृहांत राहून कपिलवस्तूला आला. तेथें तो निग्रोधारामांत रहात असे. एके दिवशी भगवान् शुद्धोदनाच्या घराच्या बाजूने भिक्षेला गेला. राहुलाची आई त्याला पाहून राहुल कुमाराला म्हणाली, “बरं राहुल, हा तुझा पिता आहे. त्याजवळ जाऊन आपलें दायाद्य माग.” तेव्हां राहुल बुद्धापुढें जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “हे श्रमणा, तुझी सावली सुखकारक आहे.” भगवान् आसनावरून उठून चालता झाला, व राहुल “मला दायाद्य द्या, दायाद्य द्या” असे म्हणून मागोमाग गेला. विहारांत गेल्यावर राहुलाला दायाद्य द्यावयाच्या उद्देशानें सारिपुत्राला बोलावून भगवन्तानें त्याला प्रव्रज्या देण्यास सांगितलें.

३३. राहुलकुमाराला आपण कशाप्रकारें प्रव्रज्या द्यावी अशी सारिपुत्रानें पृच्छा केली, तेव्हां भगवान ह्या प्रकरणी भिक्षूंना गोळा करून म्हणाला, “भिक्षुहो, तीन शरणगमनांनीं श्रामणेरप्रव्रज्य देण्यांत यावी. ती अशी:- प्रथम त्या मुलाचें क्षौर करावें. त्याला काषायवस्त्रें नेसवावीं, व भिक्षूंच्या पायां पडावयास लावून उकिडव्यानें हात जोडून बसवावें व ही वचनें त्रिवार उच्चारावयास लावावीं-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel