७०
उत्तरा नंदमाता

“ध्यानरत उपासिकांत उत्तरा नंदमाता श्रेष्ठ आहे.”

राजगृह येथे सुमनश्रेष्ठी नांवाचा एक धानाढ्य व्यापारी होता. पूर्ण नांवाचा एक त्याच्या पदरी नोकर असे, त्याची ही मुलगी. एके दिवशीं राजगृहांत उत्सव चालला होता. त्या वेळीं सुमनश्रेष्ठी पूर्णाला म्हणाला, “पूर्णा, आज तूं उत्सवांत मजा करणार, कीं चांगले बैल आणि नांगर घेऊन शेत नांगरावयास जाणार?” पूर्ण म्हणाला, “आर्य, मी माझ्या बायकोला विचारून काय तें सांगतों.” त्यानें आपल्या बायकोला विचारलें, तेव्हां ती म्हणाली, “हें काय विचारतां? मालकाची इच्छा तुम्हीं शेत नांगरावें, अशी दिसते, तेव्हां तें काम सोडून उत्सवांत जाऊं नका.” बायकोचें बोलणें ऐकून पूर्ण शेतीचीं आउतें घेऊन शेत नांगरावयास गेला.

त्याच दिवशीं सारिपुत्त निरोधसमाधीपासून उठून त्याच मार्गानें येत होता. पूर्णाला पाहून, ‘येथें पाणी कोठें मिळेल,’ असा त्यानें प्रश्न केला. पूर्णानें त्याला दंतकाष्ठ व तोंड धुण्यासाठीं पाणी आणून दिलें; आणि त्याच्या मनांत असा विचार आला कीं, आज अशा सत्पुरुषाला कांहीं भिक्षा देतां आली असती तर बरें झालें असतें. पूर्णाची बायको नवर्‍यासाठीं त्या उत्सवाच्या दिवशीं पक्वान्न तयार करून तें घेऊन त्या मार्गानें येत होती. सारिपुत्ताला पाहून तिनें मनांत विचार केला कीं, आमच्या सारख्या दरिद्यांच्या घरी अशा सत्पुरुषाला देण्यास भिक्षा कोठून असणार? आज हें अन्न याला देऊन पुन्हां घरी जाऊन नवर्‍यासाठी आणखी आणतां येणें शक्य आहे. अशा विचारानें तें सर्व अन्न सारिपुत्ताच्या पात्रांत ओतून तीं म्हणाली, “भदन्त, अशा ह्या दारिद्यापासून आम्हांला मुक्त होऊं द्या.” सारिपुत्तानें, ‘तुझे मनोरथ पूर्ण होवोत’ असा आशीर्वाद दिला, व तो तेथूनच विहारांत गेला.

पूर्णाची बायको परत घरीं गेली; व नवर्‍यासाठीं तिनें आणखी पक्वान्न तयार केलें व तें पूर्ण नांगरीत होता तेथें नेलें. आपणाला उशीर झाला असल्यामुळें पूर्णाला राग आला असला पाहिजे, असें तिला वाटलें व ती म्हणाली, “स्वामी, आज एक दिवस मला क्षमा करा. तुमच्यासाठीं तयार केलेले पक्वान्न वाटेंत मी स्थविराला दिलें, आणि हें दुसरें तयार करून घेऊन आलें. ह्याच कारणास्तव मला उशीर झाला.”

पूर्ण :- भद्रे, हें तूं फार चांगलें केलेंस. आज सकळीं मी स्थविराला दंतकाष्ठ व तोंड धुण्यास पाणी दिलें, आणि त्याच वेळीं माझ्या मनांत त्याला कांही भिक्षा द्यावी असा विचार आला होता. जणूं काय माझें मन जाणूनचं तूं हें वर्तन केलेंस.

बायकोनें आणलेलें पक्वान्न खाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून पूर्ण थोडा वेळ निजला, व उठून पहातो तो नांगरलेल्या एका ठिकाणीं त्याला सोन्याचीच माती दिसली. तो म्हणाला, “भद्रे, आज मी नांगरलेल्या ठिकाणीं हें सोनें दिसत आहे, पाहिलेंस काय?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel