अशा प्रकारचा भिक्षु पुण्ण मन्तानिपुत्त आहे, असें त्यांनीं भगवंताला सांगितलें. सारिपुत्त तेथें जवळच बसला होता. तो आपल्या मनाशींच म्हणाला, “सहब्रह्मचारी ज्याची अशी स्तुति करतात, तो पुण्ण खरोखरच धन्य असला पाहिजे! आमची भेट झाली व संभाषणाचा प्रसंग आला तर फार चांगलें होईल!”

भगवान् योग्य काल रजगृहांत राहून अनुक्रमें उपदेश करीत करीत श्रावस्तीला आला. पुण्णाला ही बातमी लागली, तेव्हां तोहि एकटाच तेथें आला, व अनाथपिंडिकाच्या आरामांत जाऊन त्यानें भगवंताची भेट घेतली. भगवंतानें त्याला धर्मोपदेश केला; तेव्हां तो भगवंताला नमस्कार करून विश्रांतीसाठीं जवळच्या अंधवनांत जाण्यास निघाला. त्याला पाहून दुसरा एक भिक्षु सारिपुत्तापाशीं जाऊन त्याला म्हणाला, “आयुष्मन्, तूं ज्या पुण्णाची स्तुति करीत होतास, तो भगवंताला नमस्कार करून नुकताच अंधवनांत जाण्यास निघाला आहे.” तें ऐकून त्वरेत्वरेनें आपलें आसन घेऊन सारिपुत्त पुण्णाचें डोकें दिसेल इतक्या अंतरावरून मागोमाग जाऊं लागला. पुण्ण अंधवनांत शिरून दुपारच्या वेळीं विश्रांति घेण्यासाठीं एका झाडाखाली बसला. सारिपुत्तहि तेथेंच दुसर्‍या एका झाडाखालीं बसला.

सायंकाळीं सारिपुत्त पुण्णाजवळ जाऊन आगतस्वागत करून एका बाजूला बसला, आणि त्याला म्हणाला, “भगवंताच्या नेतृत्वाखालीं जें आम्ही ब्रह्मचर्य आचरीत आहों, तें शीलविशुद्धीसाठीं आहे काय?”

‘नाहीं, आयुष्मन्,’ असें पुण्णानें उत्तर दिलें.

‘चित्तविशुद्धीसाठीं, दृष्टिविशुद्धीसाठीं, कांक्षावितरणाविशुद्धीसाठीं, मार्गामार्ग ज्ञानदर्शनविशुद्धीसाठीं, प्रतिपदाज्ञानदर्शनविशुद्धीसाठीं, ज्ञानदर्शनविशुद्धीसाठीं भगवंताच्या नेतृत्वाखालीं आम्ही ब्रह्मचर्य आचरीत आहों काय?’  असे सहा प्रश्न सारिपुत्तानें क्रमानें विचारले, व पुण्णानें त्या सर्वांचे नकारार्थींच उत्तर दिलें. तेव्हां सारिपुत्त म्हणाला, “तर मग कशासाठीं आम्ही ब्रह्मचर्य आचरीत आहों?”

पुण्ण :- उपादानावांचून (आसक्तीवांचून) परिनिर्वाणाचा लाभ करून घ्यावा म्हणून आम्ही ब्रह्मचर्य आचरीत आहों.

ह्या प्रत्येक विशुद्धींत उपादानविरहित परिनिर्वाण आहे कीं काय? असा सारिपुत्तानें प्रश्न विचारला, तेव्हां त्याचेंहि पुण्णानें नकारार्थीच उत्तर दिलें. या सातांच्या बाहेर परिनिर्वाण आहे कीं काय, ह्या प्रश्नाचेंहि पुण्णानें नकारार्थींच उत्तर दिलें. सारिपुत्तानें त्याचें स्पष्टीकरण विचारलें, तेव्हां पुण्ण म्हणाला, “समजा, कोसलराजाला जरूरीच्या कारणास्तव श्रावस्तीहून साकेताला जाणें भाग पडलें; व त्यानें वाटेंत सात टप्याचे रथ ठेविले. पहिल्या रथांतून उथरून दुसर्‍या रथांत व दुसर्‍यांतून तिसर्‍यांत ह्याप्रमाणें सातव्या रथांतून तो साकेताला पोहोंचला. तेथें त्याचे आप्तमित्र त्याला म्हणाले कीं, ‘ह्या रथानें महाराज श्रावस्तीहून साकेताला आले काय?’ पण राजानें, ‘आपण सात रथांतून कसा आलों’ हें त्यांस सांगितलें. त्याचप्रमाणें ह्या सात विशुद्धि निर्वाणाच्या पायर्‍या आहेत (म्हणजे यांच्यावांचून निर्वाण नाहीं, पण त्या पायर्‍यांना निर्वाणहि म्हणतां येत नाहीं).” १
-----------------------------------------------------------------------------------------------------
१ या सात विशुद्धींचें सविस्तर स्पष्टीकरण विशुद्धिमार्गांत केलें आहे. त्यांचा थोडक्यांत अर्थ असा :- 
-----------------------------------------------------------------------------------------------------
(१) लाभसत्कारादिकांच्या इच्छेने शीलाचें पालन न करतां केवळ जागाच्या कल्याणासाठीं व आत्मबोधासाठीं शीलाचें पालन करणें ही शीलविशुद्धि. (२) शुद्ध समाधि प्राप्त करून घेणें ही चित्तविशुद्धि. (३) बुद्धाच्या मध्यम मार्गाविषयीं दृष्टि साफ करणें, ही दृष्टिविशुद्धि. (४) त्याविषयीं येणार्‍या शंकांचे समाधान करून घेणें, ही कांक्षावितरणविशुद्धि. (५) त्या मार्गाची भावना करीत असतां मार्ग कोणता आणि अमार्ग कोणता याचें ज्ञान करून घेणें, ही मार्गामार्ग ज्ञानदर्शनविशुद्धि. (६) अमार्गाचें ज्ञान झाल्यावर तो सोडून ध्येयाकडे जाणार्‍या मार्गाचें (प्रतिपदेचें) पूर्ण ज्ञान मिळविणें, ही प्रतिपदाज्ञानदर्शनविशुद्धि. (७) ध्येयाचें (निर्वाणाचें) अनुभविक ज्ञान मिळविणें, ही ज्ञानदर्शविशुद्धि. )
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel