कात्यायनः- आणि ब्राह्मण भिक्षु झाला तर त्याला तेवढा मान मिळतो, व शूद्र भिक्षु झाला तर मिळत नाहीं काय?

राजाः- माझ्या राज्यांत सर्व जातींच्या शीलवान भिक्षूंना सारखाच मान मिळतो.

कात्यायनः- असें आहे तर सर्व वर्ण समान आहेत, असें ठरत नाहीं काय?  आणि ब्राह्मणवर्ण श्रेष्ठ, हा केवळ घोष ठरत नाहीं काय?

अवंतिपुत्र राजा महाकात्यायनाच्या भाषणानें प्रसन्न झाला व त्याला शरण गेला; म्हणजे त्याचा उपासक झाला. पण आपणाला शरण न जातां भगवंताला शरण जाणें योग्य आहे, कारण आपणहि त्याला शरण गेलों आहें, असें महाकात्यायनानें त्याला सांगितलें.

राजाः- पण तो भगवान् सध्यां कोठें आहे?

कात्यायनः- महाराज, तो भगवान् परिनिर्वाण पावला.

हें ऐकून राजाला फार वाईट वाटलें व तो म्हणाला, “जर त्या भगवंताचें दर्शन होणें शक्य असतें तर मी दहा आणि वीस योजनें नव्हें, तर शंभर योजनेंहि प्रवास केला असता. जरी त्याचें दर्शन होणें शक्य नाहीं, तरी मी त्याला शरण जातों.”

११ आणि १२
चूळपंथक आणि महापंथक

“मनोमय देह उत्पन्न करणार्‍या माझ्या भिक्षुश्रावकांत चूळपंथक श्रेष्ठ आहे.”
“चेतोविवर्त कुशल भिक्षुश्रावकांत चूळपंथक श्रेष्ठ आहे.”
“संज्ञाविवर्त १ कुशल भिक्षुश्रावकांत महापंथक श्रेष्ठ आहे.”
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- चार ध्यानें भराभर उल्लंघन करीत जाणार्‍या चेतोविवर्तककुशल, व आकाशआनंत्यादिक आरूपावचर आयतनें भराभर उल्लंघन करीत जाणार्‍याला संज्ञाविवर्तकुशल म्हटलें आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
राजगृहांत धनश्रेष्ठी नांवाचा एक सधन व्यापारी रहात असे. त्याच्या तरुण मुलींचे प्रेम त्याच्या एका तरुण दासावर जडलें, तें इतकें कीं, हाताला लागणारी चीजवस्तू घेऊन तीं दोघें घरांतून पळून गेलीं, व दूरच्या एका गांवांत जाऊन राहिलीं. कांहीं काळानें ती तरुणी गरोदर झाली. अशा प्रसंगीं आपल्या आईबापांची आठवण येणें साहजिकच होतें. कितीहि मोठा अपराध केला असला तरी आईबाप आपणाला क्षमा करतील, असें तिला वाटे. पण गांधर्वविधीनें वरलेला तिचा नवरा राजगृहाचें नांव घेतलें कीं घाबरत असे, व तो, आज जाऊं उद्यां जाऊं असें म्हणून दिवस काढीत असे.

नवमास पूर्ण झाल्यावर एके दिवशीं नवरा कामावर गेला असतां घरांतील वस्तू जागच्याजागीं ठेवून व शेजार्‍यापाजार्‍यांना सांगून ती तरुणी एकाकीच राजगृहाला जाण्यास निघाली. नवरा घरीं आल्यावर शेजार्‍यापाजार्‍यांकडून त्याला हें वर्तमान समजलें. तेव्हां पळत जाऊन त्यानें तिला गांठलें. रस्त्यांतच ठिकाणीं ती पुत्र प्रसवली. आतां आईजवळ जाऊन काय करावयाचें, अशा विचारानें ती नवर्‍याबरोबर पुन्हां राहात्या गांवीं आली. हा मुलगा रस्त्यांत जन्मला म्हणून त्याला ‘पंथक’ हे नांव देण्यांत आलें. त्याच्या मागोमाग कांहीं वर्षांनीं अशाच रीतीनें प्रवास करीत असतां दुसरा एक मुलगा जन्मला. तेव्हां पहिल्याला ‘महापंथक’ व ह्याला ‘चूळपंथक’ म्हणूं लागले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel