राजयोग

बोधिसत्त्व केवळ हटयोग आणि तपश्चर्या यांच्यामध्येच आपला सर्व काळ कंठीत होता असे नाही. कसे करणे कोणत्याही तपस्व्यांना शक्य नव्हते. मधून मधून त्यांना चांगले अन्न खावे लागत असे. शरीरात थोडे बळ आले म्हणजे पुन्हा ते उपोषणादिकांच्या योगाने देहदंडन करीत. सात वर्षांच्या काळात बोधिसत्त्व प्राधान्येकरून तपश्चर्या आचरीत असला, तरी मधून मधून चांगले अन्न सेवन करीत होता आणि शांत समाधीही अनुभवीत होता यात शंका नाही. हटयोग सोडून आपण आनापानस्मृतिसमाधीची भावना कशी करीत होतो, हे भगवान बुद्धाने आनापानसंयुत्ताच्या पहिल्या वग्गाच्या आठव्या सुत्तात सांगितले आहे.

भगवान म्हणतो— “भिक्षुहो, आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असता मोठा फायदा होतो तिची कशा रतीने भावना केली असता मोठा फायदा होतो? एखादा भिक्षु अरण्यात झाडाखाली किंवा दुसर्‍या एकांत जागी आसनमांडी घालून बसतो तो दीर्घ आश्वास घेत असला तर दीर्घ आश्वास घेत आहे, असे जाणतो, दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो, ऱ्हस्व आश्वास घेत असला, इत्यादि* याप्रमाणे आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असता मोठा फायदा होतो. भिक्षुहो, मी देखील संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्वावस्थेत असताना बहुधा हीच भावना करीत होतो. त्यामुळे माझ्या शरीराला आणि डोळ्यांना त्रास होत नसे आणि माझे चित्त पापविचारांपासून मुक्त होत असे.”

ध्यानमार्गाचा अवलंब

अशा रीतीने उपोषणे आणि आहार घेणे, हठयोग आणि राजयोग यांच्यामध्ये हेलकावे खात खात अखेरीस बोधिसत्त्वाच्या मनाचा एकाएकी असा निश्चय झाला की, तपश्चर्या निखालस निरर्थक आहे, तिच्यावाचून मुक्ति मिळणे शक्य आहे, म्हणून ती सोडून त्याने पुन्हा पूर्णपणे ध्यानमार्गाचे कसे अवलंबन केले, याचे थोडक्यात वर्णन महासच्चक सुत्तांत केले आहे.
भगवान सच्चकाला म्हणतो, “अग्गिवेस्सन माझ्या शाक्य पित्याच्या शेतावर काम चालले असता जंबुवृक्षाच्या शीतल छायेत बसून प्रथमध्यान प्राप्त करून घेतल्याची मला आठवण झाली आणि त्या आठवणीला अनुसरून माझी समजूत झाली की, हाच बोधाचा मार्ग असला पाहिजे. आणि जे सुख चैनीच्या पदार्थांच्या उपभोगावाचून आणि अकुशल विचारांपासून लाभते, त्या सुखाला मी का भ्यावे? असा माझ्या मनात विचार आला आणि त्यानंतर या सुखाला मी भिणार नाही. असा मी निश्चय केला परंतु ते सुख अत्यंत कृश झालेल्या देहाने मिळणारे नव्हते. म्हणून थोडा थोडा आहार खाण्याचा विचार करून मी त्याप्रमाणे वागू लागलो, त्या वेळी पाच भिक्षू माझी सेवा करीत होते. का की, मला ज्या धर्माचा बोध होईल तो धर्म त्यांना शिकवीन असे त्यास वाटे. परंतु जेव्हा मी अन्न खाऊ लागलो (तपश्चर्या सोडून दिली) तेव्हा ‘हा गोतम तपश्चर्येपासून भ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला,’ असे वाटून ते पाच भिक्षु मला कंटाळून निघून गेले.”

तथापि बोधिसत्त्वाचा निश्चय आढळला नाही. तपश्चर्येचा मार्ग सोडून साध्या ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला पाहिजे, याबद्दल त्याची खात्री झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel