प्रकरण दहावे

जातिभेद
जातिभेदाचा उगम


‘ब्राह्मणोस्य मुखमसीदबाहू राजन्य: कृत:।
ऊरू तदस्य यद्वैश्य: पद्म्या शुद्रो अजयत:।।‘

ऋ. १०।९०।१२

हिंदुस्थानातील जातिभेदाचे मूळ ह्या पुरुषसुक्ताच्या ऋचेत आहे असे समजले जाते. परंतु ही समजूत चुकीची आहे. बेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्य हिंदुस्थानात अहिंसा धर्माप्रमाणे जातिभेदधर्म देखील अस्तित्वात होता. आर्यांच्या आगमनामुळे आणि वैदिक संस्कृतीच्या प्रसारामुळे अहिंसाधर्माला अरण्यवास कसा पत्करावा लागला हे पहिल्या प्रकरणात दाखविण्यात आलेच आहे. (पृ. ७ ते ९) पण जातिभेदाची अशी स्थिती झाली नाही. त्यात थोडा फेरफार होऊन तो तसाच चालू राहिला.

क्षत्रियांचे वर्चस्व

सुमेरियात बहुधा पुजारीच राजा होत असे आणि तसाच प्रकार सप्तसिंधु प्रदेशात होता. ह्या प्रदेशात जी लहानसहान संस्थाने होती त्यांचा प्रमुख वृत्र याला इंद्राने ठार मारले, आणि त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागले. असे वर्णन महाभारतात आढळते.

आर्य येण्यापूर्वी कोणती स्थिती होती हे वरील ऋचेत सांगितले आहे. ऋषि म्हणतो, “एके काळी विराट पुरुषाचे मुख ब्राह्मण होता. बाहु राजन्य असे, त्याच्या मांड्या वैश्य, आणि त्याच्या पायापासून शुद्र झाला.” आर्याच्या आगमनामुळे क्षत्रियांना महत्त्व आले, आणि ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट झाले. तथापि पुरोहिताचे काम त्यांजकडे राहिले ही स्थिती बुद्धकाळापर्यंत चालू होती. पालि वाङमयात जिकडे तिकडे क्षत्रियांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. आणि उपनिषदात देखील त्याचाच प्रतिध्वनि उमटलेला दिसून येतो. उदाहरणार्थ खालील मजकूर पाहा.

ब्रह्म वा इदमग्र आसीदेकमेव। तदेकं सन्न व्यभवत्तच्छेयोरूपम्यसृजत क्षत्र यान्येतानि देवता क्षत्राणीन्द्रो वरुण: सोमो रुद्र: पर्जन्यो यमो मृत्युरीशान इति तस्मात् क्षत्रात्परं नस्ति। तस्मादब्राह्मण: क्षत्रियमधस्तादुपास्ते। (बृहदारण्यक १।४।११)

‘पूर्वी ब्रह्म तेवढे होते. पण ते एक असल्यामुळे त्याचा विकास झाला नाही. म्हणून त्याने उत्कृष्टरूप क्षत्रिय जाति उत्पन्न केली. ते क्षत्रिय म्हणजे देवलोकात इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यु आणि ईशान यास्तव क्षत्रियजातीहून श्रेष्ठ दुसरी जात नाही आणि म्हणूनच ब्राह्मण आपणाकडे कमीपणा घेऊन क्षत्रियाची उपासना करतो.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel