बोधिसत्त्वाचे भविष्य

“बोधिसत्त्व जन्मल्यानंतर त्याला मातेसह घरी आणून शुद्धोदनाने मोठमोठ्या पंडित ब्राह्मणांकडून त्याचे भविष्य वर्तविले. पंडितांनी त्याची बत्तीस लक्षणे पाहून हा एकतर चक्रवर्ती राजा होणार, किंवा सम्यक् संबुद्ध होणार असे भविष्य वर्तविले.” अशा अर्थाची विस्तृत वर्णने जातकाच्या निदानकथे, ललितविस्तरात आणि बुद्धचरितकाव्यात आली आहेत. त्या काळी या लक्षणांवर लोकांचा फार भरवसा होता यात शंका नाही. त्रिपिटक वाङमयात त्यांचा अनेक ठिकाणी सविस्तर उल्लेख आला आहे. पोक्खरसाति, ब्राह्मणाने तरुण अम्बष्ठाला बुद्धाच्या शरीरावर ही लक्षणे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पाठविले. त्याने तीस लक्षणे स्पष्ट पाहिली, पण त्याला दोन दिसेनात. बुद्धाने अदभुत चमत्कार करून ती त्याला दाखविली.* अशा रीतीने बुद्धचरित्राशी या लक्षणांचा जिकडे तिकडे संबंध दाखविला आहे. बुद्धाची थोरवी गाण्याचा हा भक्तजनांचा प्रयत्न असल्यामुळे त्यात विशेष तथ्य आहे, असे समजण्याची आवश्यकता नाही. तथापि बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असत ऋषीने येऊन त्याचे भविष्य वर्तविले. ही कथा फार प्राचीन दिसते. तिचे वर्णन सुत्तनिपातातील नालकसुत्ताच्या प्रस्तावनेत सापडते. त्याचा गोषवारा येथे देतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*दीपनिकाय, अम्बट्ठसुत्त.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“चांगली वस्त्रे नेसून व इंद्राचा सत्कार करून देव आपली उपवस्त्रे आकाशात फेकून उत्सव करीत होते. त्यांना असित ऋषीने पाहिले आणि हा उत्सव कशासाठी आहे असे विचारले. लुम्बिनीग्रामात शाक्यकुलात बोधिसत्त्वाचा जन्म झाला आहे व त्यामुळे आपण उत्सव करीत आहोत, असे त्या देवांनी असिताला सांगितले. ते ऐकून असित ऋषि नम्रपणे शुद्धोदनाच्या घरी आला आणि त्याने कुमाराला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. शाक्यांनी बोधिसत्त्वाला असितासमोर आणले, तेव्हा त्याची लक्षणसंपन्नता पाहून ‘हा मनुष्यप्राण्यात सर्वश्रेष्ठ आहे’ असे उदगार असिताच्या तोंडून निघाले. पण आपले आयुष्य थोडे राहिले आहे, हे लक्षात आल्याने असित ऋषीच्या डोळ्यांतून आसवे गळू लागली. ते पाहून कुमाराच्या जीवाला काही धोका आहे की काय असा शाक्यांनी प्रश्न केला. तेव्हा असिताने, ‘हा कुमार पुढे संबुद्ध होणार आहे, परंतु माझे आयुष्य थोडेच अवशिष्ट राहिले असल्यामुळे मला त्याचा धर्म श्रवण करण्याची संधि मिळणार नाही. म्हणून वाईट वाटते.’ असे सांगून शाक्यांचे समाधान केले आणि त्यांना आनंदित करून असित ऋषि तेथून निघून गेला.”

बोधिसत्त्वाचे नाव

स शाक्यसिंह: सर्वार्थसिद्ध: सोद्धोदनिश्च स:।
हौतमश्चार्कबंधुश्च मायदेवीसुतश्च स:।।

अमरकोशात ही बोधिसत्त्वाची सहा नावे दिली आहेत. त्यापैकी शाक्यसिंह, शौद्धोदनि आणि मायादेवीसुत ही तीन
विशेषणे व अर्कबंधु हे त्याच्या गोत्राचे नाव आहे. बाकी सर्वार्थसिद्ध आणि गौतम या दोन नावापैकी त्याचे खरे नाव कोणते? किंवा ही दोन्हीही त्याची नावे होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

त्रिपिटक वाङमयात बोधिसत्त्वाचे सर्वार्थसिद्ध नाव होते, असा उल्लेख कोठेच सापडला नाही, जातकाच्या निदानकथेत तेवढे सिद्धत्व (सिद्धार्थ) हे त्याचे नाव आले आहे. पण ते देखील ललितविस्तरावरून घेतले असावे, त्या ग्रंथ म्हटले आहे की –
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel