अन्योन्यवाद व वैशेषिक दर्शन

पकुध कच्चायनाचा अन्योन्यवाद वैशेषिक दर्शनासारखा होता. पण त्याच्या सात पदार्थांत आणि वैशेषिकांच्या पदार्थांत फार थोडे साम्य आहे. कच्चायनाचा मोठा श्रमणसंघ होता. तथापि त्याची परंपरा कायम राहिली नाही. अर्वाचीन वैशेषिक दर्शन त्याच्याच तत्त्वज्ञानातून निघाले असावे, पण तशा प्रकारचे तत्त्वज्ञान मानणारा श्रमणसंप्रदाय बुद्धकालानंतर अस्तित्वात राहिला नसावा.

विक्षेपवाद व स्याद्वाद

संजय बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद जैनांच्या स्याद्वादाप्रमाणे होता आणि त्याचा समावेश काही कालाने जैनांनी आपल्या तत्त्वज्ञानात करून घेतला. ‘असे असेल, असे नसेल’ (स्यादस्ति स्यान्नास्ति) इत्यादि स्याद्वाद आणि वर वर्णिलेला बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद या दोहोंत फारसा फरक नाही. तेव्हा जनसंप्रदायाने विक्षेपवादालाच आपले मुख्य तत्त्वज्ञान बनविले, असे म्हणण्यास हरकत कोणती?

निर्ग्रन्थ आणि आजीवक


बुद्धसमकालीन जैनांचा चोविसावा तीर्थकर महावीरस्वामी (ज्याला निगष्ठ नाथपुत्त म्हणत) व मख्खलि साल या दोघांनी सहा वर्षेपर्यंत एकत्र राहून तपश्चर्या केली, असे जैन ग्रन्थांवरून दिसून येते. आजीवकांचा आणि निर्ग्रन्थाचा संप्रदाय एक करावा, असा त्या दोघाचा प्रयत्न असावा. पार्श्व मुनीने संन्यासी एक वस्त्र किंवा तीन वस्त्रे बाळगीत असत. पण महावीरस्वामीने मक्खलि गोसालचे दिगंबरव्रत स्वीकारले, आणि तेव्हापासून निर्ग्रन्थ निर्वस्त्र झाले, परंतु निर्ग्रन्थाच्या आणि आजीवकंच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ होऊ शकला नाही. महावीरस्वामीने लक्षचौर्‍यांसी फेर्‍यांचे तत्त्वज्ञान अंगीकारले असते, तर निर्ग्रथांच्या परंपरेत चालत आलेल्या चातुर्यामांची किंमत राहिली नसती. प्राणी नियति (नशीब), संगति (परिस्थिती) आणि स्वभाव यांच्या योगाने परिणत होत असतात असे मानले तर अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार यामांचा उपयोग काय? अर्थात हे दोघेही आचार्य एकत्र राहू शकले नाहीत. आजीवकांच्या चौर्‍यांशी लक्ष फेऱयांच्या तत्त्वज्ञानापेक्षा निर्ग्रथांचा चातुर्यांमसंवरवाद लोकांना विशेष आवडला, यात आश्चर्य नाही. का की, त्याच्या आणि तपश्चर्येच्या योगे मागील जन्मी केलेले पात्र धुवून टाकता येऊन एका जन्मातच मोक्ष संपादता येणे शक्य होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel