अहिंसा टिकाव धरून राहिली

जुनी अहिंसात्मक अग्निहोत्रपद्धति मृतप्राय झाली खरी, तथापि ती अगदीच नाश पावली नाही. तिने राजदरबारातले आणि वरच्या दर्जांतील लोकातले आपले वर्चस्व सोडून देऊन गलाचा आश्रय धरला. म्हणजे जे लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले, त्यांनी आपली तपश्चर्या जंगलांतील फळामुळांवर निर्वाह चालवून कायम ठेवली. जातकअट्ठकथेत अशा लोकांच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. नवीन स्थापन झालेल्या हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेक ब्राह्मण आणि इतर वर्णीय लोक देखील जंगलात जात आणि आश्रम बांधून तप:साधन करीत. वर्षातून काही दिवस हे लोक आंबट आणि खारट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत येत आणि पुन्हा आपल्या आश्रमात परत जात. तात्पर्य, सप्तसिंधू यतींप्रमाणे मध्यहिंदुस्थानातील ऋषिमुनि नष्टप्राय न होता जंगलाच्या आश्रयाने तपश्चर्या करीत कसे तरी बचाव धरून राहिले.

आधुनिक उदाहरण


याला आधुनिक इतिहासातील एक उदाहरण देता येण्याजोगे आहे. पश्चिम सिहंलद्वीप पोर्तुगीजांनी काबीज केले, आणि तेथील बुद्धमंदिरे आणि भिक्षूंचे विहार जमीनदोस्त करून सर्वांना जबरदस्तीने रोमन कॅथिलक धर्माची दीक्षा दिली. याप्रसंगी सिंहलराजाने बुद्धाची दंतधातु बरोबर घेऊन क्यांडीच्या जंगलात पळ काढला; आणि तेथे डोंगराआड आपली नवीन राजधानी स्थापन केली. पश्चिम सिंहलद्वीपातून पोर्तुगीजांच्या हातून बचावलेले भिक्षु शक्य तेवढे बौद्ध ग्रंथ बरोबर घेऊन डोंगराळ प्रदेशात क्यांडीच्या राजाच्या आश्रयाला जाऊन राहिले. हाच प्रकार काही अंशी गोव्यात घडून आला. पोर्तुगीजांनी साष्टी, बार्देश आणि तिसवाडा हे तीन तालुके प्रथमत: जिंकले, आणि काही वर्षांनी त्या तालुक्यातील देवळे जमीनदोस्त करून लोकांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक करण्याचा सपाटा चालविला. अशा वेळी काही हिंदूंनी आपल्या इस्टेटींवर पाणी सोडून आणि देवदेवतांना बरोबर घेऊन पळ काढला व जवळच्या संवदेकर संस्थानिकाच्या मुलखाचा आश्रय धरला. आजला पूर्वीची साष्टी प्रांतातील हिंदूंची सर्व दैवते या संवदेकर संस्थानात आहेत. पुढे हा प्रांत देखील पोतुगीजांनी जिंकला; पण पुन्हा हिंदूंच्या धर्मांत त्याने हात घातला नाही. तीच स्थिति काही अंशी मध्यहिंदुस्थानातील अहिंसात्मक संस्कृतीची झाली असे म्हणण्यास हरकत नाही.

अहिंसेचा प्रभाव


परीक्षित किंवा जनमेजय राजाने जोरजुलमाने बलिदानपूर्वक यज्ञयागांची प्रथा लोकांवर लादली नाही. पण त्या प्रथेला राजाश्रय मिळाल्याबरोबर ब्राह्मणांनी ती आपण होऊनच पत्करली आणि ज्यांना ती पसंत नव्हती, त्यांना जंगलाच्या व तपश्चर्येच्या आश्रयाने आपली जुनी परंपरा कायम ठेवणे भाग पडले. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती केलेल्या बौद्धांवर किंवा हिंदूंवर  जसा आजलाही बौद्ध आणि हिंदु संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे, तसा मध्य हिंदुस्थानातील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा देखील सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला. जंगलात राहणारे ऋषिमुनि जेव्हा गावात किंवा शहरात येत, तेव्हा लोक त्यांची परमादराने पूजा करीत. बाकीच्या वेळी यज्ञयाग आणि बलिदान हे पण प्रकार चालू असत.

यज्ञसंस्कृतीची वाढ

ऋषिमुनींचा  मान बराच होता खरा, पण त्या संस्कृतीने काहीच उन्नति केली नाही. सप्तसिंधूच्या प्रदेशात तक्षशिलेसारखी जी विश्वविद्यालये स्थापन झाली तीच शिक्षणाची केन्द्रे होऊन बसली. जातक-अट्ठकथेतील  अनेक गोष्टींवरून दिसून येते की, ब्राह्मणकुमार वेदाध्ययन करण्यासाठी आणि राजकुमार धनुर्विद्या शिकण्यासाठी तक्षशिलेसारख्या दूरच्या सप्तसिंधूप्रदेशात जात असत.

सप्तसिंधूच्या प्रदेशात काय किंवा मध्य हिंदुस्थानात काय, इन्द्राच्या सारखे एक बलाढ्य साम्राज्य राहिले नाही. परीक्षित किंवा जनमेजय यांच्या राज्याची इन्द्राच्या राज्याशी तुलना करता येत नाही. त्यांनी बलिदानपूर्वक यज्ञयागांना उत्तेजन दिले, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे गंगायमुनांच्या मधला प्रदेश आर्यावर्त झाला, एवढेच काय ते. त्यांच्या कारकीर्दीनंतर सप्तसिंधू आणि मध्य हिंदुस्थान प्रदेशाचे लहानसहान भाग पडले असावे तथापि आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षातून उत्पन्न झालेली बलिदानपूर्वक यज्ञयागांची संस्कृति मात्र दृढ होऊन बळावली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel