प्रकरण आठवे

कर्मयोग
बुद्ध नास्तिक की आस्तिक?


एके दिवशी बुद्ध भगवान वैशालीजवळ महावनात राहत होता. त्या वेळी काही प्रसिद्ध लिच्छवी राजे आपल्या संस्थागारात काही कारणास्तव जमले असता. बुद्धासंबंधाने गोष्टी निघाल्या. त्यातील बहुतेक बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति करू लागले. ती ऐकून सिंह सेनापतीला बुद्धदर्शनाची इच्छा झाली. तो निर्ग्रन्थाचा उपासक असल्यामुळे त्यांच्या मुख्य गुरूला- नाथपुत्ताला- भेटला आणि म्हणाला, “भदन्त, मी श्रमण गोतमांची भेट घेऊ इच्छितो.”

नाथपुत्त म्हणाला, “सिंहा, तू क्रियावादी असता अक्रियवादी गोतमाची भेट का घेऊ इच्छितोस?” हे आपल्या गुरूचे वचन ऐकून सिंह सेनापतीने बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत सोडून दिला. पुन्हा एकदोनदा त्याने लिच्छवीच्या संस्थागारात बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति ऐकली. तथापि नाथपुत्ताच्या सांगण्यावरून बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत त्याला पुन्हा तहकुब करावा लागला. शेवटी सिंहाने नाथपुत्ताला विचारल्यावाचून बुद्धाची भेट घेण्याचा निश्चय केला, व मोठ्या लवाजम्यासह महावनात येऊन तो भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसला आणि भगवन्ताला म्हणाला, “भदन्त आपण अक्रियवादी आहात व अक्रियवाद श्रावकांना शिकविता हे खरे काय?”

भगवान म्हणाला “असा एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य म्हणू शकेल, श्रमण गोतम अक्रियवादी आहे. तो पर्याय कोणता? हे सिंहा मी कायदुश्चरिताची, वग्दुश्चरिताची व मनोदुश्चरिताची अक्रिया उपदेशितो.

“सिंहा, दुसराही एक पर्याय आहे की, ज्याच्यामुळे सत्यवादी मनुष्य म्हणू शकेल, श्रमण गोतम क्रियावादी आहे. तो कोणता? सिंहा, मी लोभ, द्वेष मोह इत्यादि सर्व पापकारक मनोवृत्तीचा उच्छेद उपदेशितो.”

“असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला जुगुप्सी म्हणू शकेल. तो कोणता? सिंहा मी कायदुश्चरितांची, वग्दुश्चरिताची आणि मनोदुश्चरिताची जुगुप्सा (कंटाळा) करतो, पापकारक कर्माचा मला वीट आहे.

“असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला विनाशक म्हणू शकेल. तो कोणता? लोभाचा, द्वेषाचा आणि मोहाचा मी विनाश उपदेशितो.”

“आणि सिंहा, असा देखील एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला तपस्वी म्हणू शकेल. तो कोणता? हे सिंहा पापकरक कुशल धर्म तापवून सोडावे असे मी म्हणतो. ज्याचे पापकरक अकुशल धर्म वितळून गेले, नष्ट झाले, पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. त्याला मी तपस्वी म्हणतो.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel