आर्यांच्या जयाने झालेली हानी

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षणाने जी मोठी हानी झाली, ती ही की, दासांची घरे आणि नगरे बांधण्याची कला नष्टप्राय होऊन गेली. सिंध आणि पंजाब प्रांतात सापडलेल्या प्राचीन नगरांची आणि घरांची परंपरा हिंदुस्थानात राहिली नाही. दुसरी गोष्ट ही की, जंगलात राहणारे यति कशा रीतीने वागत, हे समजण्याचा मार्ग राहिला नाही. वरच्या उतार्‍यात इन्द्राने त्यांना कुत्र्याकडून खाववले असा उल्लेख आला आहे. मूळचा शब्द `सालावूक’. ह्याचा अर्थ लांडगे किंवा कुत्रे असा होऊ शकतो. टीकाकाराने शालावृक म्हणजे लांडगे असाच अर्थ केला आहे. परंतु इन्द्राजवळ पुष्कळ शिकारी कुत्रे होते आणि त्याने ते यतींच्या अंगावर घातले, हे अधिक संभवनीय दिसते. या यतींचे वजन समाजावर फार असल्याशिवाय इन्द्राने त्यांना मारण्याचे काहीचे कारण नव्हते. पण ते वागत होते काय, लोक त्यांना का मानीत, इत्यादि गोष्टी समजण्याला काही मार्ग राहिला नाही.

आर्यांच्या संस्कृतीला कृष्णाचा विरोध

सप्तसिंधूच्या प्रदेशावर इन्द्राची पूर्ण सत्ता स्थापन झाल्यावर त्याचा मोर्चा मध्य हिंदुस्थानाकडे वळला असल्यास नवल नाही. पण तेथे त्याला मोठाच प्रतिस्पर्धी भेटला. देवकीनंदन कृष्ण केवळ गाईंचा प्रतिपालक राजा होता. इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचे वर्चस्व तो मान्य करण्यास तयार नव्हता. यास्तव इन्द्राने त्याच्यावर हल्ला केला. कृष्णाजवळ घोडदळ नव्हते. तथापि त्याने मार्‍याची अशी जागा शोधून काढली की इन्द्राचे त्याच्यासमोर काही चालले नाही. बृहस्पतीच्या मदतीने तो कसा तरी आपला जीव संभाळून मागे हटला. ऋग्वेदात (८।९६।१३-१५) सापडणार्‍या काही ऋचांवरून आणि भागवत इत्यादि पुराणात आलेल्या दंतकथांवरून या विधानाला बरीच बळकटी येते. हिंदी संस्कृति आणि अहिंसा, पृ. २२-२५
पाहा.

कृष्ण यज्ञयागांची संस्कृति मानण्याला तयार नव्हता. मग तो मानीत होता तरी काय? त्याला अंगिरस ऋषीने यज्ञाची एक साधी पद्धति शिकविली. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हटल्या म्हणजे तपश्चर्या, दान, सरळपणा (आर्जव), अहिंसा आणि सत्यवचन या होत. `अर्थ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणा:’ (छां. उ. ३।१७।४.६). यावरून असे दिसते की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षात जी यतींची संस्कृति सप्तसिंधु प्रदेशात नष्ट झाली, तिचा काहीसा अंश गंगायमुनेच्या प्रदेशात कायम राहिला होता. तपश्चर्या करणार्‍या अहिंसक मुनीची कृष्णासारखे राजे या प्रदेशात पूजा करीत होते, हे वरील उतार्‍यावरून दिसून येते.

वैदिक संस्कृतीचा विकास

परंतु या अहिंसात्मक संस्कृतीची फारशी उन्नति झाली नाही. ब्राह्मणांनी राजकारणातून अंग काढून घेतल्यावर वाङ्मयाकडे आणि इतर लोकोपयोगी गोष्टींकडे चांगले लक्ष पुरवले. हिंदुस्थानात सगळ्यात प्राचीन विश्वविद्यालय म्हटले म्हणजे तक्षशिला येथे होते. तेथे ब्राह्मण वेद तर शिकवीतच; आणि त्याशिवाय धनुर्विद्या, वैद्यक इत्यादि शास्त्रेही शिकवीत. सप्तसिंधुंतून इन्द्राच्या परंपरेचे साम्राज्य नष्ट झाले, तरी त्या परंपरेपासून उद्भवलेल्या नवीन संस्कृतीचे राज्य सुरू झाले, आणि त्याची वाढ होत गेली.

वैदिक संस्कृतीचा मध्यदेशांत विजय

कृष्णाने इन्द्राचा पराभव केल्यानंतर सहाशे-सातशे वर्षांनी परीक्षित आणि त्याचा त्याचा मुलगा जनमेजय या दोन पांडवकुलोत्पन्न राजांनी सप्तसिंधूंत तयार झालेल्या आर्यसंस्कृतीची संस्थापना गंगायमुनांच्या प्रदेशात केली. पांडव आर्यसंस्कृतीचे भोक्ते होते याला आधार वैदिक वाङ्मयात सापडत नाही. कृष्णामध्ये आणि पांडवांमध्ये तर निदान सहाशे वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. महाभारतात ज्या कृष्णाच्या कथा येतात, त्या वरवर वाचल्या तरी प्रक्षिप्त असाव्याशा वाटतात. निदान इन्द्राबरोबर युद्ध करणारा कृष्ण आणि महाभारतांतील कृष्ण एक नव्हते, असे मानावे लागते. पांडवांचे वंशज परीक्षित आणि जनमेजय या दोघांनी मात्र वैदिक संस्कृतीला भरपूर आश्रय दिला, हे अथर्ववेदावरून (काण्ड २०, सू. १२७) चांगले सिद्ध होते. (हिंदी संस्कृति आणि अहिंसा, पृ. ३७-३८ पाहा.)

सप्तसिंधूत यतींची संस्कृति साफ नष्ट झाली, तरी ती प्रामुख्याने मध्य हिंदुस्थानात वास करीत होती, हे वर दिलेल्या छांदोग्य उपनिषदाच्या उतार्‍यावरून आणि पालि वाङ्मयातील सुत्तनिपातात सापडणार्‍या  `ब्राह्मणधम्मिक’ सुत्तावरून दिसून येते. (हिंदी संस्कृति आणि अहिंसा , पृ. ३९-४० पाहा.) सप्तसिंधूतील चातुर्वर्ण्य मध्य हिंदुस्थानात देखील स्थिरावले होते. फरक एवढाच की, सप्तसिंधूतील ब्राह्मणांनी आर्यांच्या विजयामुळे उत्पन्न झालेली यज्ञयागांची पद्धति पूर्णपणे स्वीकारली. मध्य हिंदुस्थानात जरी ब्राह्मण अग्निपूजा करीत असत, तरी त्या पूजेत प्राण्यांचे बलिदान होत नसे. तांदूळ, जव वगैरे पदार्थांनीच ते अग्निदेवतेची पूजा करीत. परंतु परीक्षित आणि जनमेजय यांनी यज्ञयागाला सुरुवात केल्यानंतर ही जुनी अहिंसात्मक ब्राह्मण संस्कृति नष्टप्राय झाली, आणि तिच्या जागी हिंसात्मक यज्ञयागाची प्रथा जोराने पसरू लागली. सप्तसिंधूच्या ऐवजी गंगायमुनांच्या मधला प्रदेशच आर्यावर्त बनला!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel