प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल

                     १
आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

देणं , घेणं ,कर्तव्य या गोष्टी लगेच न केल्या तर त्यातील गोडी काळ खाऊन टाकतो.

कालः पिबति तद्रसम् हा चरण लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे .--काल:बिपति-- एवढेही पुरेसे आहे .वेळच्या वेळी गोष्टी करण्याचे महत्त्व यामध्ये अधोरेखित केलेले आहे .देणे घेणे कर्तव्य एवढ्याचाच जरी यामध्ये उल्लेख असला तरी अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत करता येतील .एखाद्या व्यक्तीचे आपण ऋणी आहोत असे एखाद्याला वाटत असेल परंतु जर ते त्याने बोलून दाखविले नाही तर ते दुसऱ्याला कसे कळणार ?जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मनाला कायमची रुखरुख लागून राहील आभार वेळच्या वेळी मानले. पाहिजेत .शिक्षण, लग्न, आजारपणांमध्ये वैद्यकीय उपचार ,वेळच्या वेळीच झाले पाहिजेत .समजा आपल्याला प्रवासाची खूप आवड आहे परंतु जर आपण प्रकृती  धडधाकट असताना प्रवास केला नाही तर पुढे प्रकृती तंदुरुस्त नसताना प्रवास त्रासदायक होईल किंवा अशक्य होईल  . आपल्याला कायमची रुखरुख लागून राहील . सर्वच गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत .समजा धरणाला बारीक छिद्र पडल्यामुळे पाणी वहात आहे. जर ते छिद्र वेळच्या वेळी बुजविले नाही तर धरणाची भिंत कोसळेल .मला आणखी एक म्हण आठवत आहे--- बैल गेला आणि झोपा केला-- .गोठ्याचा दरवाजा आज करू उद्या करू म्हणून आपण दिरंगाई केली आणि बैल वाघाने तरी  मारून खाल्ला किंवा तो पळून तरी गेला असे होईल.आपल्या ओळखीच्या एखाद्या मुलाला वाईट संगत लागली आहे असे आपल्याला दिसले तर वेळीच आपण ते त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे .अन्यथा नंतर उपयोग होणार नाही .अशी अनेक उदाहरणे देता येतील. सुभाषिता मध्ये म्हटल्याप्रमाणे" काल गोडी  पिऊन टाकतो ".गोष्टी वेळच्या वेळी करण्यातच गंमत आहे .

                 २
सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति |
कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालं संतोष एव पुरुषस्य परं निधानम् ||

साप हवा खाऊन राहतात पण ते अशक्त नसतात, वाळलेली पाने खाऊन रानटी हत्ती ताकदवान होतात, थोर ऋषी कंदमुळे खाऊन दिवस काढतात समाधान हाच माणसाचा मोठा खजिना आहे. 

साप वायू भक्षण करून दीर्घकाळ जगू शकतात अशी कल्पना आहे 
हत्ती झाडांची पाने खाऊन जगतात ते शाकाहारी आहेत तरीही त्यांचे बळ प्रचंड आहे .
ऋषी तपश्चर्या करीत असतांना गुहेमध्ये कंदमुळे खाऊन जगतात तरीही ते तेजस्वी असतात.
साप हत्ती ऋषी हे जसे आपापल्या ठिकाणी समर्थ अाहेत.त्याचप्रमाणे संतोष हे मनुष्याचे सामर्थ्य आहे .

----संतोष एव पुरुषस्य परं निधानम्--- हा चरण सुप्रसिद्ध आहे .आपल्या इच्छा आकांक्षा खूप असतात .आपल्याला जे पाहिजे ते आपण साध्य करू शकतोच असे नाही .

कारण आपण जसे पुढे पुढे जातो तसे तसे क्षितिजही पुढे पुढे जात असते .अापण जसे उंचावर जातो तसे क्षितिजही मोठे मोठे होत जाते .आपण शेवटी सुख कशात मानावयाचे ,समाधान कशात घ्यायचे ,आनंद कसा प्राप्त करून घ्यायचा .हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.सुख मानण्यात असते असे जरी सर्व म्हणत असले तरी ते खरे नाही.सुख समाधान आनंद संतोष हा आंतूनच असला पाहिजे.त्यासाठी मनाची एक विशिष्ट बैठक असणे गरजेचे आहे .ती ज्याच्या जवळ असेल तो स्वयंभू सुखी समाधानी व आनंदी असेल .हत्तीवरून जाणार्‍याकडे  पाहू नका पायी जाणार्‍याकडे पहा या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत . कोणत्याही परिस्थितीत जो आनंदी असेल त्याने मिळावयाचे काही शिल्लक राहिले नाही असे म्हणता येईल .सर्व धडपड आनंदासाठी आहे त्याचा स्रोत जर आतूनच असेल तर काही प्राप्त करण्यासारखे शिल्लक राहिले नाही .सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट मला आठवते .येथे पुरुष असा शब्द वापरला असला तरी पुरुष व स्त्री  दोघांनाही हे वचन लागू आहे .निरिच्छता हा संतोषाचा खजिना म्हणता येईल आणि.--संतोष हा मनुष्याचा मोठा खजिना आहे --

स्मरणीय
१)कालः पिबति तद्रसम्
२)संतोष एव पुरुषस्य परं निधानम् 

१२/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel