प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल.

                       १                          
भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.] 

चारही वेद पवित्र आहेत .त्याच प्रमाणे महाभारतही पवित्र आहे .वेद कळण्यासाठी कठीण आहेत व मनोरंजकही नाहीत . परंतु महाभारत गोष्टीरूपाने  असल्यामुळे मनोरंजक आहे व तत्त्वज्ञान तर त्यात रोमरोमात भरलेले आहे .मनोरंजन करता करता काही ना काही तत्त्वज्ञान प्रत्येकाच्या मनात स्वाभाविकपणे उतरेल अशी रचना आहे. महाभारतात ज्याला जे हवे ते आहे असे म्हणता येईल .महाभारतात नाही ते कुठेही नाही असेही म्हणता येईल .ऋग्वेदापासून अथर्ववेदा पर्यंत प्रत्येक वेद उत्क्रांतीच्या एकेका पायरीवर लिहिला गेलेला आहे .महाभारत ही त्याच्या पुढची पायरी आहे . महाभारतात काही नाही असे नाही .महाभारताला म्हणूनच पाचवा वेद असे म्हटलेले आहे .         षडरस जीवनात रुची आणतात . त्यामुळे ते आपल्याला हवे हवेसे वाटतात .     
     
चांगला मुलगा(मुलगी )आपल्या जीवनात रस आऩद निर्माण करतो . जन्माला आल्यापासून त्याचे बोबडे बोल आपल्याला रिझवतात . त्याच्या रूपाने आपण आपले बालपण अनुभवत असतो .त्याच्या बरोबर आपण वाढत असतो .त्याचे यश आपल्याला  आनंदित करते .त्याच्याशी आपले संबंध मैत्रीचे असले ,तो आपला सल्ला घेत असला ,तर आनंदात वाढ होते.आपण त्याला  म्हातारपणा चा  आधार समजतो .त्याच्या रूपाने अापण पुन:जगत असतो.         आपला मुलगा जीवनात आनंद निर्माण करतो .चांगला मुलगा तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत सर्व अवस्थातआपल्याला समाधान आणि आनंद देतो. त्यामुळे त्याला सातवा रस (आपले जीवन जोआनंदमय करतो )असे म्हटले आहे 

मुलगीही आपल्याला तेवढाच आनंद देत असते त्यामुळे मुलाच्या बाबतीत जे जे म्हटले आहे ते ते सर्व मुलीच्या संदर्भातही बरोबर आहे .(.सुपुत्री/सुपुत्र:){हे सुभाषित पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दर्शविते त्यामुळे मुलीचा उल्लेख केलेला नाही .अजूनही त्या संस्कृतीमध्ये फार फरक पडला आहे असे मला वाटत नाही बऱ्याच सुभाषिता मध्ये अशी रचना व दृष्टिकोन दिसतो }

उदार मनुष्य तर सर्वांना प्रिय असतो .संकटात सर्वांना तो मदत करण्यासाठी तत्पर असतो त्यामुळे त्याला पंधरावे रत्न म्हटले आहे .(काही वेळा छडीला चौदावे रत्न म्हटलेले आढळून येते .मुलांना धाक दाखवण्यासाठी तर काही वेळा ताडन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो .त्याचा हेतू शिस्त लागावी असा असतो .मुलांच्या हितासाठी त्याचा वापर केला जातो . चौदावे रत्न तर अमृत आहे. छडीला चौदावे रत्न का म्हणतात कळत नाही .)
जामातो दशमो ग्रह:वचन तर सर्व सुप्रसिद्ध आहे .जावई मुलीला छळतो त्रास देतो पर्यायाने आपल्यालाही त्रास देतो त्याच्या आर्थिक मागण्या असतात .वगैरे वगैरे .परंतु सर्व ग्रह हे नेहमीच आपल्याला त्रास देतात असे नाही .काही ग्रह आपल्याला यश सौख्य आनंद पैसा देऊन जातात .काही जावई बायकोला (आपल्या मुलीला)  आणि पर्यायाने सासऱ्याला छळताना जरी दिसत असले .तरी हल्ली काळ बदलला आहे .जावई हा मुलासारखाच असतो व  त्याच्या प्रमाणे आपल्याला सौख्य समाधान आनंद ( काही वेळा क्लेशही) देतो.

पूर्वी जावयाला अहो जाहो करण्याची पद्धत होती .त्याला दबकून सासरा वावरत असे .हल्ली जावयाला मुलासारखाच समजून अरे जारे केले जाते . त्याच्याशी घनिष्ठ संबंधही ठेवला जातो. काही ठिकाणी धाक व परकेपणा तर काही ठिकाणी प्रेम व आपुलिक आढळून येते .जामातो दशमो गृह: या वचनाचाअनुभव संमिश्र आहे.जावई दहावा ग्रह असला तरीही तो आपल्याला सौख्य आनंद देऊ शकतो .असे म्हणावे लागेल .

                   २
मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |
भ्रृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

गप्प बसणे, वेळ लावणे, निघून जाणे, जमिनीकडे बघत बसणे, भुवया वाकड्या करणे, दुसर्‍याशीच बोलत बसणे अशा सहा रीतींनी नकार दिला जातो. 

नकार देण्याच्या या सहा पद्धती प्रत्येकानेच केव्हा ना केव्हा कुठून ना कुठून अनुभवलेल्या असतील.कदाचित स्वतः वापरल्या असतील.आई वडील शेजारी मित्र दुकानदार बॉस इत्यादीजवळ त्यांना अप्रिय अशी गोष्ट जर अापण मागितली तर या प्रत्येकाचा अनुभव केव्हा ना केव्हा येतो. पती पत्नी दोघानाही परस्परांशी बोलताना याचा अनुभव केव्हा ना केव्हा  येत असेल !!
नकार:षडविध:स्मृत: हे सहज लक्षात राहण्यासारखे आहे

                स्मरणीय 
१)जामातो दशमो ग्रह:
२)नकार: षडविध:स्मृत:

५/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel