बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
         
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् |
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ||

[प्रत्येक] क्षण [उपयोगात आणून] विद्या मिळवावी, [प्रत्येक] कण [वापरून] संपत्ती मिळवावी. क्षण वाया घालवल्यास विद्या कोठून [मिळणार?] कण वाया घालवल्यास संपत्ती कशी साठणार l

सर्व चरण महत्त्वाचे असले तरी शेवटचे दोन चरण
क्षण त्यागे कुतो विद्या  कण त्यागे कुतो धनम् सहज लक्षात राहण्यासारखे आहेत .विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे .जर त्यांनी वाटेल तिथे वेळ फुकट दवडला तर त्यांना विद्या कुठून मिळणार ?.येथे विद्या याचा अर्थ केवळ पुस्तकी विद्या असा न घेता ज्याला आपण  ऑल राऊंडर असे म्हणतो तसे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे .जीवनात वावरताना केवळ पुस्तकी विद्या उपयोगी पडत नाही .वाक्चातुर्य शरीरसंपदा वर्तणुकीतील मार्दव अनेक दिशांनी बुद्धीची झेप (अवगाहनता)  इत्यादी अनेक गोष्टी उपयोगी पडतात . 

कण त्यागे कुतो धनम् याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी--- थेंबे थेंबे तळे साचे ---ही म्हण योग्य आहे थेंबभर आहे अतिशय कमी आहे म्हणून आपण जर ते फुकट दवडले मिळवले नाही त्याकडे दुर्लक्ष  केले तर स्वाभाविक धनसंचय होण्यात अडचण निर्माण होईल  .त्याग याचा अर्थ फुकट दवडणे असा घेतला पाहिजे दान करणे असा नव्हे  

              लक्षात ठेवा 
       क्षण त्यागे कुतो विद्या।  कण त्यागे कुतो धनम् ॥

२१/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel