प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल       
                      
                   १
उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि: शक्तिः पराक्रमः ।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥

उद्योगशीलता, धाडस ,धीरता , हुशारी , ताकद आणि शौर्य हे सहा गुण ज्याच्याजवळ असतील त्याला देव मदत करतो. 

  ---षडेते यत्र वर्तंते तत्र देव: सहायकृत---हे वचन सहज वापरता येण्यासारखे आहे.देव मदत करतो याचा अर्थ असा मनुष्य यशस्वी होतो असा आहे  .यशस्वी होण्यासाठी हे गुण मनुष्याजवळ असले पाहिजेत .या गुणांची जोपासना प्रत्येक मनुष्याने यशासाठी करणे आवश्यक आहे .हे गुण असलेला मनुष्य  यशस्वी होतो .यशस्वी व्यक्ती जवळ हे गुण असलेले आढळतात .

                  २
अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका |
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः ||

अगदी लहान वस्तूंच्या समूहामुळे काम होऊन जाते. [अगदी कमी मजबुती असलेल्या ] गवताचा दोर वळला की त्याने माजलेले हत्ती [एवढे शक्तिमान असूनही ] सुद्धा बांधता येतात.

याचाही अर्थ सहज सरळ सोपा आहे .लहानपणी" एकीचे बळ" नावाची प्राथमिक पुस्तकात असलेली गोष्ट बऱ्याच जणांना आठवत असेल .म्हाताऱ्याने मरताना आपल्या चार मुलांना गवताच्या काड्या आणण्यास सांगितले .एक काडी सहज तुटली परंतु जेव्हा चार काड्या एकत्र आल्या तेव्हा त्या कुणालाच तोडता येईनात .त्याने मुलांना एकीने राहण्यास सांगितले .आपल्या देशात भाषा, धर्म,जात ,पोटजात ,परंपरा,पक्षीय तत्वज्ञान ,अशा गोष्टींमुळे फार फाटाफूट दिसून येते .आपण जर असेच भांडत बसलो तर राज्याचे व राष्ट्राचे तुकडे होण्याला वेळ लागणार नाही .हे सर्वांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे .भाषा पक्ष धर्म जात यांच्या वर जाऊन काहीतरी विचार करणे गरजेचे आहे .हे या श्लोकाने अधोरेखित होते .---बध्यन्ते मत्त दन्तिन:---एवढा भाग सहज वापरता येण्यासारखा आहे .(एकीचे बळ ही कथा पुन्हा पाठय़पुस्तकात घालणे व मन लावून शिकवणे आवश्यक आहे )

            स्मरणीय  
  ‍१)-षडेते यत्र वर्तंते तत्र देव: सहायकृ‍त्
   २)बध्यन्ते मत्त दन्तिन:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel