सुनिलला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हे त्याला उमगलेच नाही, मग त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा खिडकीतून बघितल्यावर त्याला कळले की तो जहाजवरच्या एका खोलीत आहे आणि जहाज सौम्यपणे हेलकावे खात आहे. रूम मध्ये तो एकटा होता.

 

"म्हणजे इतर तिघे वर डेकवर गेले असावे आणि मला झोप लागून गेली असावी. आता रूम बाहेर जाऊन सर्वांना शोधतो कारण डॉक्टर नेत्रा पण काहीतरी सांगणार होत्या त्याला माझ्यामुळे उशीर व्हायला नको!", असा विचार करून तो रूम बाहेर आला आणि कॉरिडॉरमधून चालत चालत हॉलमध्ये आला. पण हॉल मध्ये कुणीही नव्हते. अरे? सगळेजण गेले कुठे? त्याने इतर ठिकाणी जाऊन बघितले, अनेक रूम्स ठोठावून पहिल्या, किचन मध्ये चेक केले कुठे, कुठेच कोणीही नव्हते. जहाजाचा कप्तान पण सुकाणू जवळ नव्हता. जहाज आपोआप चालते आहे? असे कसे शक्य आहे?

 

मग डेकवर जाण्यासाठी पायऱ्या शोधून तो वेगाने वर चढला.

 

"आपल्याला झोप लागून गेली म्हणून उशीर झाला. सगळेजण नक्की डेकवर जमले असतील. तिथे काहीतरी महत्त्वाची चर्चा चालली असणार!", असा विचार करत पायऱ्या चढतांना त्याला अपराध्यासारखे वाटत होते.

 

डेकवर येऊन बघतो तो काय, शुकशुकाट होता. कुणीही नव्हते. सगळेजण गेले कुठे? नक्की काहीतरी गडबड आहे, मी आता माझी दूरदृष्टी वापरतो. असे म्हणून त्याने डेकवर असलेल्या कठड्याला धरून उभे रहात केसांच्या आत लपलेल्या स्फटीकाला स्पर्श केला. थंड समुद्री वारा वाहात होता आणि जवळपास माथ्यावर सूर्य आलेला होता. त्याने जहाज जात असलेल्या दिशेच्या विरूद्ध दिशेने तोंड केले आणि मनाने डोळ्यांना सूचना देऊ लागला आणि थोडे थोडे अंतर कापत कापत त्याची दृष्टी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचली. दुपार असूनही तिथे कुठेही माणसांची वर्दळ नव्हती. ताज हॉटेलमध्ये दृष्टीने शिरून त्याने पहिले की सर्व दरवाजे रूम उघडे होते, किचन मधले दरवाजे उघडे होते, परंतु कुठेही माणसे दिसत नव्हती. अरेच्या? ही काय भानगड आहे! नंतर पुढे जाऊन एकेका मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये तो आपली दृष्टी नेऊ लागला. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. 

 

शेवटी एका मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये दूर एक माणूस त्याला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा, खिन्नता आणि विषाद असे भाव होते. तो अतिशय करुणपणे रडत होता आणि त्याने दोन्ही हात मदतीसाठी पसरलेले होते आणि जणू काही तो म्हणत होता की मला वाचवा! मी इथे एकटा आहे. सुनिलने वेगाने त्याची दृष्टी त्या माणसाकडे नेण्याचा प्रयत्न केला तसतसा तो माणूस आहे त्याच स्थितीत उभा असतांनाही दूर दूर जात असल्याचे त्याला जाणवले. हे काय बघतो आहे मी? हे चाललेय तरी काय?

 

"मला सांग काय झाले, तू का रडतो आहेस? इथली सगळी माणसे कुठे गेली? तू इथे एकटा कसा अडकलास?", तो माणूस दूर जात असतानाही सुनिलने त्याला तरीही हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि तो माणूस निश्चल उभा राहून नवनवे अश्रू सांडत करुणपणे हसायला लागला.

 

त्यामुळे सुनिलने तिथून दृष्टी बाजूला नेऊन मुंबईच्या रस्त्यांवर नेली. अनेक बेस्ट बसेस धावत होत्या. त्यातील खिडक्यांमधून त्याने दृष्टी आतमध्ये नेली. काही बसेस या ड्रायव्हर आणि प्रवासीविना धावत होत्या, तर काहींमध्ये फक्त ड्रायव्हर होते तर काही बसेस मध्ये फक्त एकटा प्रवासी मनुष्य किंवा स्त्री होते. 

 

एक स्त्री एका बसच्या खिडकीबाहेर हात काढून चेहऱ्यावर खिन्न भावाने एकसारखी शून्यात कुठेतरी बघत होते. तीची नजर एकाच ठिकाणी खिळून राहिलेली होती. असेच इतर अनेकांचे होत होते. त्या नजरा सुनिलला सहन झाल्या नाहीत. तो पुढे गेला.

सीएसटी स्टेशनवर सुद्धा शुकशुकाट होता. तेवढ्यात एक लोकल ट्रेन धडधड आवाज करत एका प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. ती संपूर्ण लोकल रिकामी होती. म्हणजे त्यात प्रवासी नव्हते, फक्त लोकलचा ड्रायव्हर म्हणजे मोटरमन त्यात होता. लोकल थांबल्यानंतर तो मोटरमन यंत्रवत पद्धतीने गाडीतून उतरला आणि यंत्रवत पद्धतीनेच चालू लागला. जणू काही त्याच्यात जीव नव्हता! तो पाठमोरा होता. सुनिलने दृष्टीने त्याचा पाठलाग सुरू केला.

 

सुनिलने त्याला विचारले, "सगळे लोक कुठे गेले? तू एकटाच कसा काय लोकल चालवतो आहेस?"

 

यांत्रिक पद्धतीने चालता-चालता तो थांबला. त्याला कळत नव्हते की हा आवाज कोठून आला? थोडा वेळ तो निश्चल उभा राहीला आणि मग त्याने मागे वळून बघितले. त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा निराशा, खिन्नता, विषाद असे भाव होते. त्यानेही दोन्ही हात पुढे पसरून मी लाचार, हतबल आहे अशा प्रकारचे हावभाव केले आणि स्थिर उभा राहिला.

 

त्या मोटारमन व्यतिरिक्त संपूर्ण सीएसटी स्टेशनवर कुणीही नव्हते. अनेक टिकीट खिडकी पैकी एका टिकीट खिडकीत बसलेला कर्मचारी डोक्याला हात लावून शून्य नजरेने कुठेतरी हरवल्यासारखा बघत होता.

 

तेवढ्यात आणखी दोन लोकल ट्रेन स्टेशनात येऊन थांबल्या.त्यापैकी एक लोकल संपूर्ण रिकामी होती. त्यात मोटरमन पण नव्हता. त्यातल्या एका डब्यातून एक तीनेक वर्षांची मुलगी उतरली. तिच्या एका हातात फिरकी होती, ती फिरकी न थांबता गर्रगर्र फिरत होती. ती मुलगी दुडूदुडू चालू लागली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. चालता चालता सुनिलच्या दृष्टीच्या दिशेने तिचे डोळे वळताच ती अचानक थांबली. तिच्या हातातली फिरकी फिरायची थांबली. ती सुद्धा त्या मोटरमन सारखी स्थिर निश्चल उभी राहिली. चेहऱ्यावर पुन्हा तेच भाव, इतरांसारखे!

 

स्टेशनवरच्या घड्याळात बारा वाजले होते. मग त्याच्या लक्षात आले की आतापर्यंत जिथे जिथे तो दृष्टीने गेला होता त्या प्रत्येक ठिकाणी जे घड्याळ होते तिथे बाराच वाजले होते.

 

हे सगळे बघणे त्याला असह्य झाले, त्याच्या छातीत धडकी भरली, नजर बंड करू लागली तेव्हा त्याने त्याची दृष्टी पुन्हा हळूहळू मागे मागे नेली, तेव्हा येताना दिसलेली प्रत्येक व्यक्ती हवेत हळू हळू विरत जाऊन छोटी होत गायब होत गेलेली त्याला दिसली. तो छोटी मुलगी, तो मोटरमन, बेस्ट बस मधली स्त्री, ताज हॉटेल मधला तो माणूस, सगळे!!

 

"अरे मला काही सांगाल की नाही? कुठे नष्ट होत चाललात तुम्ही सगळे? आणि कुठे गेलेत बाकी इतर सगळे?"

 

बाजूला जागी असलेली निद्राजीता सुनिलला हलवून झोपेतून उठवत म्हणाली, "आम्ही कुठे जात नाही आहोत! इथेच आहोत आपण सगळे. सायली आणि हाडवैरी झोपलेत अजून. आपण सर्वजण नाश्ता करून पुन्हा रुममध्ये येऊन झोपलो आहोत. तुला आता जाग आली, बडबड करत होतास. काय स्वप्न पडलं की काय?"

 

डोळे चोळत सुनिल झोपेतून जागा झाला. काय अभद्र आणि विचित्र स्वप्न होते ते! ते पण भर दुपारी? दिवास्वप्न! मला दूरदृष्टी अजून पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही पण स्वप्नात मात्र मी ती वापरत होतो आणि दूरच्या प्रसंगातील आवाज मला जरी ऐकू येत असला तरी मी तिथल्या लोकांशी बोलू शकत नाही पण स्वप्नात मात्र मी ते करू शकत होतो. पण त्या स्वप्नाचा काय अर्थ असेल?

 

भर दुपारी ते सर्वजण झोपले होते. निद्राजीताच्या आणि सुनिल च्या आवाजाने सायली आणि हाडवैरी पण आपापल्या सोफ्यावर उठून बसले. त्यांनाही दुपारची डुलकी लागली होती.

 

"काय झाले? कुणाला स्वप्न पडलं?", हाडवैरी आणि सायली डोळे चोळत म्हणाले.

 

"मला पडलं. जाऊ द्या विसरा. ते सांगून तुम्हालाही मी संभ्रमात टाकू इच्छित नाही!" असे म्हणून सुनिलने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. कारण स्वप्नात त्याने जे अनुभवले ते त्याला पुन्हा इतरांना सांगून अनुभवायचे नव्हते, तशी हिम्मत होत नव्हती. नंतर गरज पडली तर नक्की सांगू पण आता नको असा विचार त्याने केला.

 

तेवढ्यात नेत्राने त्यांना डेकवर बोलवल्याचा निरोप आला. सर्वजण तिथे जमले. नेत्रा आणि ते चौघे या व्यतिरिक्त तिथे इतर अनेकजण त्यांच्यासारख्याच काळ्या रंगाच्या अंगाला फिट बसणाऱ्या फायटर्स कपड्यात उपस्थित होते. समुद्री वारा वाहत होता. त्यामुळे सूर्याचे ऊन कमी जाणवत होते.

 ^ ^ ^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel