दरम्यान आकाशगंगेत एके ठिकाणी जेलीसारख्या द्रवपदार्थाने बनलेल्या लवचिक पारदर्शक, चमकणाऱ्या आणि सतत रंग बदलत राहणाऱ्या एका प्रचंड मोठ्या आकाराच्या ग्रहामध्ये (ग्रहा"वर" नाही, कारण हा मिती ग्रह होता ज्या"मध्ये" तिथले जीव राहत होते, "वर" नाही!) इतर मिती जीवांसोबत राहणाऱ्या स्मृतिका आणि रंगिनी या दोन्ही मितीजीव ग्रहाच्या आतमधल्या आपापल्या ठिकाणाहून निघून जेली बबल मधून प्रवास करत करत ग्रहाच्या बाहेर निघून अवकाशात आल्या. त्या ग्रहाचे नाव होते: प्लॅनेट ऑफ डायमेंशनस् (प्लॅन्डी)

 

आपापल्या जेली बबल मधून अवकाशात पृथ्वीकडे प्रवास करतांना त्या एकमेकींशी बोलत होत्या.

रंगिनी: "सुनिलने माझी आठवण काढली आहे!"

स्मृतिका: "हो ना! आणि योगायोग म्हणजे सायलीने पण मला बोलावलंय!"

रंगिनी: "पृथ्वीच्या नियमानुसार त्यांचं लग्न झालंय म्हणे! तरीही सध्या त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलंय!"

स्मृतिका: "लग्न म्हणजे तेच ना ते ज्यानंतर मानव जातीतले नर मादी ठरवून एके घरात एकाच ठिकाणी राहायला लागतात?"

रंगिनी: "हो, तेच ते. जोडीदार म्हणतात ते एकमेकांना! पण मग त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी का बोलावलंय?"

स्मृतिका: " हो ना. आपल्या ग्रहावर आपण सगळ्याजणी मादी आहोत. बरं आहे कुणी नर नाही ते! लग्न बिग्न झंझट नको! बरं ऐक! आपण ज्या कारणासाठी पृथ्वीवर मितींची विशेष शक्ती काही लोकांना देत आलो आहोत त्याची खरी परीक्षेची वेळ आता आली आहे. पृथ्वीवर वाईट नावाच्या एका संघटनेने पृथ्वीवरच्या लोकांना मारण्यासाठी काही वैज्ञानिक प्रयोग करून मानवी मेंदू असलेले आणि काही यांत्रिक असे प्राणी निर्माण केलेत. पण आपले मिती जीव आपण दिलेल्या शक्तीचं चांगल्या कामासाठी वापर करत आहेत. त्यांनी स्वागत नावाची टीम पण बनवली आहे!"

 

रंगिनी: "हो, माझ्या कानावर आलं ते. शक्तींचा वापर चांगल्या कामासाठी वापरला तर त्यांना आपण आणखी नव्या शक्ती देतो. सध्या त्यांना नवीन शक्तींची गरज आहे."

 

स्मृतिका: "त्याच कारणास्तव आपण जाऊन त्यांना भेटून येऊ. सायलीने नुकतेच आपल्या अद्वितीय स्मरणशक्ती आणि ज्ञानाचा वापर करून एक प्राणी बनवला आहे आणि म्हणूनच आता तिला मी अजून एक शक्ती देणार आहे! तिने माझी आधी सुपर नेचर बेटावर असतांना सर्वांच्या नकळत आठवण काढली होती, मी तिला जाऊन भेटले होते आणि तिच्या मनातील एका  प्रयोगाबद्दल तिने मला विचारले होते. पण तिला मी सांगितले होते की ती जेव्हा आपल्या शक्तीच्या आधारे खूप मोठी उपयुक्त निर्मिती करेल तेव्हा तिला अपेक्षित असलेल्या प्रयोगासाठी मी शक्ती देईन! आपल्या ग्रहावरचा नियम आहे त्याप्रमाणे आपण चालतो!"

 

रंगिनी: "ठीक आहे. सुनिलला पण मी एक नवी शक्ती देणार! पण ती हळूहळू विकसित होणार! त्यानेपण माझी  आताच आठवण केली आहे!"

 

स्मृतिका: "हो! दोघांना आता गरज पण आहे आणि ते लायक पण झालेत त्या नव्या शक्ती घ्यायला! आणि ती वाईट टीम आता अवकाशात नवीन पृथ्वीसारखी प्रतिसृष्टी उभारणार आहे म्हणे, हे आपल्या सर्वांसाठी खूप धोकादायक आहे, त्यांना थांबवायला आपल्याला असे आणखी मिती जीव पृथ्वीवर वाढवावे लागतील!"

रंगिनी: "हो नक्की! आपण पृथ्वीवरच्या घडामोडींमध्ये थेट हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून आपल्याला या मितीशक्ती जन्मापासून काही योग्य जीवांना द्याव्या लागतात!"

स्मृतिका: "हाडवैरी आणि निद्राजीता यांचं काय?"

रंगिनी: "माहीत नाही. त्यांच्या मिती जीव सध्या दुसऱ्या कामात बिझी आहेत! जातील त्या दोघीपण, वेळ आली की! नाहीतरी त्या दोघी आपल्याला विश्वासात घेतात कुठे?"

 

आकाशात दूरवर अनंत अंधारात पृथ्वीच्या दिशेने वेगाने दोन विविध रंगांत चमकणारे जेलीसारखे दोघींचे दोन बुडबुडे जातांना दिसत होते. मध्येच दोन चार धूमकेतू आणि उल्का वेगाने त्यांच्या मार्गात आल्या. दोन्ही जेलीबबल वेगाने त्यांच्यावर आपटता आपटता वाचले. कालांतराने दोघीजणी पृथ्वीवर पोहोचल्या. एक मुंबईला तर दुसरी पुण्याला गेली. त्यांचे जेली बबल पृथ्वीच्या वातावरणाबाहेर थांबले होते.

 

मग रंगिनीने सुनिलला नवी शक्ती दिली ज्याद्वारे तो वातावरणातील कुठेही लपलेले साध्या डोळ्यांनी दिसू न शकणारे सूक्ष्म जीव बघू शकणार होता आणि त्यातही जे विघातक असतील त्यांच्या समोर त्याला लाल वर्तुळ दिसू शकणार होते. तसेच सुनिलला साध्या मानवी डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या अनेक सूक्ष्म गोष्टी दिसू शकणार होत्या. त्याच्यात ही शक्ती हळूहळू विकसित होणार होती.

 

परत जातांना रंगिनी म्हणाली, "म्हणजे सुनिल आता तुझे डिटेक्टिव्ह हे नाव आणखी सार्थ झाले. जसा एखादा डिटेक्टिव्ह भिंग किंवा मॅग्नीफायर ग्लास ने सूक्ष्म गोष्टी शोधतो तसेच तुझे डोळे भिंग बनले आहेत! एके ठिकाणी एकसारखे दोन मिनिटं बघायचे आणि बघतांना डोळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल फिरवत राहायचे म्हणजे पुढच्या मिनिटाला तुला तिथल्या सगळ्या सूक्ष्म सजीव निर्जीव गोष्टी दिसायला लागतील!!"

सायलीला मिळालेल्या एका नव्या शक्तीद्वारे तिने एक अद्भुत प्रयोग करायला सुरुवात केली होती!

 

इकडे रंगिनीला बाय केल्यावर सुनिलला दिसले की पुलाखाली पडलेला भुसनळ्या हत्ती पुन्हा उठून नदीच्या पात्रात चालू लागला. नदीला जास्त पाणी नव्हते. तेवढ्यात त्या नदीपात्रात त्या हत्तीच्या विरुद्ध दिशेने हत्तींचा एक कळप वेगाने भुसनळ्या हत्तीकडे येऊ लागला होता. सगळे हत्ती पुलाजवळ आले आणि एकमेकांच्या अंगावर चढले आणि त्यावरून चढून एकेक हत्ती पुलावर चढू लागला.

 

आकाशात वेगवेगळ्या उडणाऱ्या पक्षी आणि कीटकांची आधीच प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे अंधारून आलं होतं आणि लोक जमेल तिथे आश्रय घेऊन आपापली सुटका करण्यासाठी धडपड करू लागले. न्यूज चॅनेलचे वार्ताहर आणि कॅमेरामन जमेल तशी शूटिंग करून सगळे प्रसंग लाईव्ह देण्याची धडपड करू लागले.

 

आपल्या हॅटच्या सरकत्या दरवाज्यातून एकेक सूक्ष्म शस्त्र काढून त्यावर फुंकर मारून त्यांना सुनिल मूळ रुपात आणत होता आणि एकेका उडणाऱ्या पक्ष्यांवर फेकत होता.

 

खरे पक्षी मरू नयेत याची तो काळजी घेत होता. फक्त यांत्रिक आणि विघातक प्रवृत्ती असलेले मानवी पक्षी (लाल वर्तुळ ओळखून) यांनाच तो मारत होता.

 

पण सध्या जिथे उभा आहे तिथेच तो असे निगेटिव्ह वर्तुळवाले पक्षी ओळखू शकत होता. आपली दृष्टी दूर दुसरीकडे नेली तर तिथले दिसेल पण जिथे उभा आहे ते चुकेल आणि इतक्या दूर शस्त्र मारणे शक्य नव्हते.

 

आणि तेवढ्यात....

^^^ 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel