सकाळीच रणजित यांचा सुनिलला फोन आला.

 

"ताबडतोब नाश्ता आटोप आणि नरीमन पॉईंटला ये. तिथून मरीन ड्राईव्हला फिरत फिरत तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे!"

 

मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील रस्ता नरीमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीला संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय आहे. मुंबईचे सौंदर्य बघायचे तर या रस्त्याला पर्याय नाही. मुळात हा रस्ताच मुंबईराणीच्या गळ्यातील हार बनून तिचे सौंदर्य वाढवतोय, क्वीन्स नेकलेस बनून!

 

सीएसटी फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्याने तो सीएसटीला उतरला आणि टॅक्सीने नरिमन पॉइंटला आला. ट्रेन मध्ये बसला असतांना खिडकीतून बाहेर बघत त्याने त्याची दूरदर्शन शक्ती वापरण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या वस्तू एकमेकांत मिक्स होऊन त्याला सगळी भेसळ मिसळ दिसायला लागली, बुब्बुळे छऱ्याच्या गेमसारखी गरागरा डोळ्यात फिरत आहेत असे त्याला जाणवले म्हणून त्याने प्रयत्न तातडीने रद्द केला!!

 

ट्रायडेंट हॉटेलसमोर उतरला तेव्हा त्याला आता एसएसपी म्हणजे सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस झालेल्या रणजित यांची पांढऱ्या कलरची व्हॅन उभी असलेली दिसत होती. त्यातून सिव्हिल ड्रेस मधले रणजित आणि सोबत आणखी दोन युनिफॉर्म मधले पोलीस उतरले आणि एक जण विना युनिफॉर्म गाडीतच बसलेला होता. नुकतीच रणजित यांना बढती मिळाली होती हे सुनिलला माहिती होतं.

 

सुनिल आणि रणजित मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला चालू लागले. त्यांच्या पासून थोडे अंतर ठेऊन दोघे पोलीस त्यांच्या मागे मागे सुरक्षेसाठी चालू लागले.

 

"मी तुला अर्जंट आणि अशा सार्वजनिक ठिकाणी बोलावून घेतले त्याला कारणही तसेच आहे, सुनिल!"

"काय झाले मामा?"

"मी जी तुला माहिती सांगणार आहे ती लीक होऊ नये असे मला वाटते म्हणून अशा ठिकाणी मी तुला बोलावले आणि मीही सिव्हिल ड्रेस मध्येच आहे. मागे स्टेशनवर आपण एका माणसाला पकडलं होतं तुला आठवत असेलच!"

"स्टेनगनसारखी दिसणारी शस्त्रे त्याच्या बॅगमध्ये सापडली होती, गन्सचा भरपूर साठा होता त्याच्याकडे!"

"होय, त्याला कोर्टाने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान त्याच्यावरील आणखी काही गुन्हे सिद्ध झाले आणि आणखी त्याची शिक्षा वाढवण्यात आली! त्याचे नाव जग्गू भुसनळ्या!"

"बरोबर, मला वाटते ती शिक्षा त्याची भोगून नुकतीच संपली असेल आणि सुटला असेल तो!"

"हो शिक्षेचा कालावधी संपल्याने त्याला लवकरच तुरुंगातून सोडणार आहेत. त्याची तुरुंगातील वागणूक खूप चांगली होती. त्याला तुरुंगातील केलेल्या कामाचे चांगले मानधन मिळणार आहे!"

"मग?"

"तुरुंगात त्यांचेकडून त्याच्या टोळीची आणि साथीदारांची नावे आम्ही काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दोन चार साथीदारांची नावे सांगितली, आम्ही त्यांना पकडले सुद्धा! ती छोटी मोठी भुरट्या चोऱ्या करणे, माल इकडचा तिकडे पोचवणे अशी कामं करणारी निघाली. सर्वांच्याच चौकशीतून फार काही हाती लागलं नाही! एका मास्क घातलेल्या माणसाने त्याला त्या बंदुकाची बॅग समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका निर्जन ठिकाणी ठेवायला सांगितले होते! पण त्या बंदुका घ्यायला कोण येणार हे त्याला माहीत नव्हतं आणि बंदुका त्याला कुणी दिल्या हेही नाही आणि त्या कुणाला मारण्यासाठी वापरल्या जाणार होत्या हेही कळलं नाही! त्या बंदुकातून अचूक नेम साधता येतो आणि गोळी झाडतांना आवाजही येत नाही!"

"एक मात्र नक्की की, त्या बंदुकांचा वापर करून जे गुन्हे होणार होते ते टळले!"

"होय, पण खऱ्या चिंतेचे कारण वेगळे आहे सुनिल, सांगतो! गेल्या काही दिवसांपासून तो जग्गू भुसनळ्या तुरुंगात सतत हसतोय आणि म्हणतोय: ते लोकं वाईट आहेत, त्यांचे वाईट हाल होतील! वाईट लोकं येतील आणि वाईट लोकांना मारतील!"

"ते काय तो असंच घाबरवायला म्हणत असेल! आपल्याला अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या मानसिकतेबद्दल माहिती आहे!"

"मी त्याला जोराने ओठांवर मारलं, त्याचं रक्त काढलं. आणखी दोन ठोसे मारून त्याचे समोरचे रक्ताने लाल झालेले दोन दात पाडले आणि त्याला विचारलं की तो असं का बडबडतोय? तर तो फक्त हसला आणि रक्त येत असलेल्या तोंडाने तेच वाक्य बोलला! पण त्याकडे वायफळ बडबड म्हणून दुर्लक्ष आपण करूही शकतो पण हे माझे चिंतेचे कारण नाही. तो हे कशाकरता का म्हणेना, पण योगायोग म्हणजे आपल्या आयटी सेलकडे काल शेकडो जणांनी तक्रारी केल्यात की त्यांच्या फोनवर एक Unknown Number वरून एक मेसेज आला: 'ते लोकं वाईट आहेत, त्यांचे वाईट हाल होतील! वाईट लोकं येतील आणि वाईट लोकांना मारतील!' सगळ्या तक्रारदारांना हाच मेसेज आला, काहींनी रेकॉर्ड करून आपल्याला दिला आहे!"

"हे मात्र जरा विचित्रच आहे!"

"म्हणूनच मी तुला बोलावलंय. जरा चेक कर हे मेसेज कोण करतंय? सायबर एक्सपर्ट आहेस ना!"

"ठीक आहे. मी चेक करतो. पण असं जर असेल तर मग आपण त्याला सोडलं नाही पाहिजे!"

"त्याला आपण थांबवू शकत नाही. कोर्टाचा आदेश धुडकावू शकत नाही! त्याला तुरुंगातून सोडायलाच पाहिजे!"

"आणि बाय द वे त्याला तुरुंगात कुणी भेटायला वगैरे येत होतं का?"

"त्याला त्याचा भाऊ पप्पू भेटायचा कधी कधी!"

असे ते म्हणत असतांनाच त्यांना प्रायव्हेट वॉकीटॉकीवर काहीतरी संदेश आला आणि ते मागे वळले.

"चल तूही आमच्यासोबत गाडीत पोलीस स्टेशनला लवकर! एक अर्जंट केस आहे! आणि जग्गू भुसनळ्याला तुरुंगातून सोडल्यावर त्याच्या मागावर राहा, तुझ्या खास शक्ती त्यासाठी वापर!"

"माझी नवी शक्ती यांना सांगू का?", असे सुनिलच्या मनात आले, पण त्याने स्वतःला रोखले.

पुन्हा दोघे उलट्या दिशेने त्यांच्या व्हॅनकडे जायला निघाले.

"आणि आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट! जापानमध्ये एक प्रसिद्ध वैज्ञानिक अचानक गायब झालेत, हे मागे तू ऐकले असशीलच! तसेच काही देशांत अनेक वैज्ञानिक, संशोधक आणि तंत्रज्ञ यांचेवर हल्ले वाढत आहेत! त्यामुळे आता हा तपास इंटरपोलकडे आला असून त्यांनी प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेकडे आपापल्या देशात तातडीचा तपास करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. आपल्या सनसिया (SNSIA) च्या मुंबई शाखेचे हेड जयवंत जसकर यांना तशा सूचना आल्यात. त्यांना वाटते आहे की मागे जो सायन्स फेस्टिव्हल मधल्या मुलांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि पुराव्याभावी तपास थांबला होता त्याचा संबंध या सगळ्या जागतिक पातळीवर वैज्ञानिक, संशोधक आणि तंत्रज्ञ यांचेवर होणाऱ्या हल्ल्याशी नक्की संबंध आहे आणि त्या दिवसाच्या आधी आणि नंतर घडलेल्या सर्व गुन्हेगारी घटनांचा तपास पुन्हा नव्याने करायचा आहे! आणि त्यातच आता हे सगळे लोकांना येणारे गूढ SMS आणि तुरुंगातील बडबडणारा तो जग्गू!"

"आणि हो तुला आणखी एक महत्वाचे सांगायचे आहे! खूप महत्वाचे! चल गाडीत बैस! सांगतो", असे म्हणून रणजित गाडीकडे चालू लागले किंवा जवळपास पळायलाच लागले. रणजित यांच्या सूचनेनुसार मागोमाग येणारे दोघे पोलीस आता त्या दोघांच्या पुढे चालत चालत व्हॅन मध्ये  मागे बसले, रणजित जवळपास पळत पळतच घाईने व्हॅनकडे आले, त्या वेगाच्या मानाने  सुनिल खूप मागे पडला. रणजित व्हॅनमध्ये बसले. सुनिल व्हॅनकडे यायच्या आतच व्हॅनचा प्रचंड स्फोट झाला. सर्वजण हवेत उडाले. सुनिल व्हॅनपासून बराच दूर होता पण गरम हवेच्या झोताने वेगाने मागे फेकला गेला.

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel