संध्याकाळ झाली होती.
वैज्ञानिक डॉ. शिशिर आणि त्यांची टीम डॉ. राधाकृष्णन, हिमांशू, सर्वेश, मिनाक्षी, स्कार्लेट, अब्दुल, फिलिप, लिओनार्दो, अलोंझो आणि नतालिया हे सगळेजण बेटावरील गुहेतील सुसज्ज प्रयोगशाळेत उपस्थित होते.
आतापर्यंत घडलेला सर्व वेगवान घटनाक्रम थोडक्यात चौघांनी त्या वैज्ञानिकांच्या टिमला सांगितला. नेत्राच्या मृत्यूबद्दल सर्वांनी हळहळ व्यक्त केली. स्वागत संस्थेचा पहिला प्रमुख असलेली नेत्रा हिचा बेटावरील नैसर्गिक साधने वापरून एक पुतळा बनवायचा ठरवला गेला आणि तो त्या बेटावरच्या सर्वात मोठ्या तळ्याच्या मध्यभागी उभारायचे ठरले. नेत्रा चांगल्या कारणासाठी शहिद झाली होती याचा आनंद सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता आणि आता तिचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी सगळ्यांवर येऊन पडली होती. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मग चर्चेला सुरुवात झाली. आता वेळ दवडून चालणार नव्हते. शत्रूची ताकद, कारवाया आणि त्याने जगभर सुरू केलेले नुकसान वाढत चालले होते. त्याआधी सर्वांनी एकमेकांची नीट ओळख करून द्यायला सुरवात केली.
डॉ. शिशिर म्हणाले, "आम्ही प्रत्येकजण विज्ञानातील एकेक क्षेत्रात तज्ञ आहोत. फिलिप आणि स्कार्लेट मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत तर इतर आम्ही वैज्ञानिक आहोत. तुम्हाला आधी या बेटाबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगतो. हाडवैरीने मला थोड्या वेळापूर्वी विचारले की इथे वीज कशी तयार होते! त्याबद्दल सांगतो. आपले हे बेट पृथ्वीवर समुद्रात जिथे आहे तिथे एक विशिष्ट प्रकारची चुंबकीय शक्ती आहे. येथे भूगर्भात नेहमी विशिष्ट लयीत फिरत राहणारे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय उत्तर दक्षिण ध्रुव एकमेकांच्या जवळ धरून ठेवल्यास जो अदृश्य मग्नेटिक फ्लक्स (चुंबकीय धारा) दोघांमध्ये वाहातो तो इथे कायम फिरत्या अवस्थेत आहे. तुम्हाला कल्पना आहे की स्थिर फ्लक्समधून कॉपर वायर फिरवली तर त्यात वीज निर्माण होते पण इथे फिरते फ्लक्स असल्याने स्थिर कॉपर वायरची योजना आपण केली असून येथे सतत वीज निर्मिती होत राहाते!"
"अदभुत आहे हे सगळं!", सायली म्हणाली.
पुढे राधाकृष्णन सांगू लागले, "आपल्या बेटा भोवती जसे नियम बदललेले प्रकाशाचे कवच आहे जे आपल्याला अदृश्य बनवते तसेच या चुंबकीय फिरत्या शक्तीमुळे एक कवच बेटाभोवती तयार होते ज्यामुळे त्यावर काहीही आदळले तर ती वस्तू नष्ट होते त्यामुळे कोणत्याच वस्तू जसे जहाज, विमान आणि इतर उडत्या वस्तू आपल्या अदृश्य चुंबकीय कवचावर आदळून नष्ट होतात आणि प्राणी माणसे असतील तर ते आदळून पुन्हा समुद्रात फेकले जातात. बेटावर यायचे झाले तर त्यासाठी तेवढ्या भागाचा अदृश्य चुंबकीय प्रवाह किंवा फ्लक्स आपण प्रयोगशाळेतून मोकळा करतो आणि आत शिरल्यावर पुन्हा पूर्ववत करतो. आपल्या या बेटावर जे प्राणी, झाडे वनस्पती आहेत ते इथले आधीपासूनच रहिवासी आहेत. ते इतर प्राण्यांच्या प्रजातींपासून वेगळे आहेत!"
नंतर स्कार्लेट म्हणाली, "मी आणि मिनाक्षी त्या जहाजावर सापडलेल्या दंडगोलाकार वस्तूबद्दल आज रात्री संशोधन करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपापल्या ट्री हाऊसेस मध्ये आराम करा. हात पाय दुखत असल्यास ट्रीमेनच्या फांद्यांवर बसा, ते तुम्हाला तुमच्या ट्री हाऊसेस पर्यंत पोहोचवतील! पण ते हळू चालतात, वेळ लागतो! पण तुम्ही मस्त बेटावरचे सौंदर्य बघत बघत जाऊ शकता! उद्या सकाळी येथेच भेटू सगळेजण!"
सुनिलने दोघींना थोडे सावध राहायला सांगितले कारण त्या दंडगोलाकार वस्तू मध्ये त्याला नकारात्मक अस्तित्व जाणवले होते. या सर्व चर्चे दरम्यान सुनिलच्या मनात बरेच काहीतरी सुरु होते.
थोडा वेळ विचार करून सुनिल म्हणाला, "मला वाटते हे संशोधन करतांना मी आणि सायलीसुद्धा तुमच्या सोबत असावे. कारण मला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांची साखळी एकत्र गुंफली आहे असे वाटते आणि या दंडगोलाकार वस्तूमध्ये त्याचे उत्तर आपल्याला एकत्रितरित्या मिळेल! आणि सायली यासाठी की ती आपले सुपर कॉम्प्युटर आहे. आपल्या सगळ्या संशोधन करत असलेल्या गोष्टी ती लक्षात ठेवेल!"
सर्वांनी संमती दर्शवली.
मीनाक्षी आणि स्कार्लेट पुढे म्हणाल्या, "दोन कोणत्या वेगळ्या घटनांची साखळी तुम्ही म्हणत आहेत DN?"
DN म्हणजे सुनिल म्हणाला, "तुम्ही नका म्हणू मला. तू म्हणा. त्यात आपलेपणा आहे. मी तुमचा आपला DN आहे. तर आता सांगतो या घटनेची साखळी क्रमांक एक. सजीव गोष्टी गायब होण्याच्या घटना. त्यापैकी आपल्याला माहिती असलेल्या घटना म्हणजे जपानचे सायंटिस्ट बाथरूममध्ये गायब होणे आणि त्यांचे फक्त कपडे सापडणं, हॉस्पिटलमध्ये सायलीवर हल्ला करणारी नर्स पुन्हा बाथरूम मध्येच गायब होणं आणि तिचे अंगावरचे सगळे कपडे आणि दागिने सापडणं तसेच मी दूरदृष्टीने पाहिलेले पप्पू आणि त्या मास्कवाल्या माणसाच्या शरीराचे लहान होत जाणे आणि पेशी समूहात रूपांतर होणे. तसेच नंतर त्याच दिवशी जग्गू पण घरातून गायब झाला. त्याचं पण असंच कुणीतरी पेशी समूहात रुपांतर केलेलं असावं. कारण कोणत्याच सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसला नाही. यापैकी जपानी सायंटिस्टचा पेशीसमूह कुणीतरी बाथरूममधून चोरला असावा आणि नर्सचा उरलेला पेशीसमूह? तो कुठे गेला असावा? कदाचित पाण्याबरोबर तो वाहून गेलं असावा. कारण नर्सचे कपडे सापडले तेव्हा तिथे शॉवर सुरू होता. म्हणजे तिने स्वतः आपण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून स्वतःला इंजेक्शनचे लिक्विड वापरून नष्ट तर केलेच पण त्याआधी शॉवर चालू करून आपल्या शरीराचा उरलेला पेशी समूह कुणाच्या हाती न लागता पाण्याबरोबर वाहून जाईल अशी पुरेपूर व्यवस्था केली जेणेकरून मागे कोणताही पुरावा रहाणार नाही!"
मीनाक्षी म्हणाली, "यू आर जिनियस DN!"
सुनिल हसला. सायली त्याच्याकडे बघू लागली.
सुनिल पुढे म्हणाला, "मला वाटतंय की तेच लिक्विड या दंडगोलाकार वस्तूमध्ये एका बाजूला असावे आणि त्या नेत्रावर हल्ला करणाऱ्या स्त्रीचा प्लॅन पण तिला पेशीसमूहमध्ये रूपांतर करून तो समूह चोरण्याचाच असावा. पण तिचा प्लॅन फसला आणि तिने विषारी शस्त्राने नेत्राला मारले. आता प्रश्न पडतो की समजा तिने नेत्राचा पेशीसमूह स्वतः सोबत नेला असता, तो ती कुणाकडे घेऊन जाणार होती आणि त्याचे ते अज्ञात लोक पुढे काय करतात? एखादा क्लोन? की आणखी काही?"
स्कार्लेटला हे सगळे समजत होते कारण सर्वांकडे ऑललँग्वेज ट्रान्सलेटर (सर्वभाषी भाषांतर करणारे) गॅजेट होते.
स्कार्लेट म्हणाली, "मग आता ते लिक्विड या दंडगोलाकार वस्तूमधून बाहेर काढणे योग्य होणार नाही, बरोबर?"
"काढू शकतो पण ते वस्तूच्या कोणत्या बाजूला आहे हे आपल्याला माहिती नाही आणि दुसऱ्या बाजूला काय आहे हेही माहिती नाही. मला दोन्ही बाजूला निगेटिव्ह लाल वर्तुळ दिसले आहे. ते लिक्विड जरी आपण बाहेर काढले तरीही ते इथे कुणाच्याही शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल!"
मीनाक्षी म्हणाली, "आणि ती दुसरी कोणती गोष्ट आहे DN, जी या सगळ्या घटनांशी साखळीने बांधली गेली आहे?"
"ती दुसरी गोष्ट म्हणजे, नुकत्याच सुरू झालेल्या काही महत्वाच्या घटना म्हणजे निर्जीव वस्तू नष्ट होणाच्या घटना. जगातील महत्वाच्या वास्तू नष्ट होणे. त्याच्याशी संबंधित एखादी गोष्ट दंडगोलाकार वस्तूच्या दुसऱ्या बाजूत असेल याची मला खात्री आहे. म्हणजे त्या हल्लेखोर स्त्रीला नेत्राचा पेशीसमूह सोबत घेऊन जायचा होताच पण त्याच सोबत कदाचित निर्जीव गोष्ट म्हणजे आपले जहाज सुद्धा नष्ट करायचे होते असे मला वाटते आहे! आणि हे सगळे कोण करते आहे आणि कशासाठी हे शोधून आपण सगळ्यांनी त्यांना धडा शिकवायचा आहे!"
डॉ. शिशिर आणि त्यांची टीम DN चे विश्लेषण ऐकून प्रभावित झाली. अगदी नेत्राप्रमाणेच याचीही बुद्धी विलक्षण तीव्र होती!
"आता प्रश्न असा आहे की सजीवांवर जसा लिक्विडचा प्रयोग होतो तसा निर्जीव वस्तू नष्ट करण्यासाठी ते नेमके काय वापरतात? पावडर, लिक्विड की एखादा गॅस? म्हणजे दुसऱ्या बाजूला काय आहे आणि त्याचा वापर आणि प्रभाव कसा पडतो हे आपल्याला माहिती नाही. म्हणून सध्या ती दंडगोलाकार वस्तू उघडण्याची घाई करण्यापेक्षा, त्याचा थोडा वरवरचा तुकडा तोडा आणि तो धातू कोणता आहे ते आधी तपासा! कारण मला तो धातू कोणत्याच परिचित धातूंपैकी वाटत नाही. कदाचित त्या दोन्ही गोष्टी फक्त याच प्रकारच्या धातू मध्ये सुरक्षित रहात असाव्यात!"
सर्वांना ही सूचना पसंत पडली.
नंतर हाडवैरी, निद्राजीता ट्रीमेन वर बसून आपापल्या ट्रीहाऊसेस कडे निघाले.
सायली आणि सुनिल प्रयोगशाळेतच थांबले. सकाळपर्यंत धातूच्या तुकड्यावर संशोधन सुरू होते. पृथ्वीवर प्रचलित असलेल्या कोणत्याच धातूशी (मेटल शी) किंवा गुणधर्माशी त्या तुकड्याशी साधर्म्य नव्हते. साम्य नव्हते. त्या धातूंवर वेगवेगळ्या तापमानाचा प्रयोग करून बघण्यात आला.
त्या बेटावर एका गुहेत अशीही एक प्रयोगशाळा होती जिथे बेटावरच्या बदललेल्या वातावरणापासून मुक्त आणि जसे पृथ्वीवर इतर ठिकाणी वातावरण आहे तसे वातावरण निर्माण केले होते तिथेही नेऊन त्या तुकड्यावर वेगवेगळ्या तापमानात संशोधन केले गेले पण शेवटी असा निष्कर्ष निघाला - हा धातू पृथ्वीवर प्रचलित असलेल्या धातूंपैकी नाही!!
सकाळी 5 वाजता सर्वजण पुन्हा चर्चेसाठी जमले. सुनिलने सर्वांना बोलावून घेतले. रात्रभर संशोधन सुरू होते तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात सुनिलचा एक प्लॅन तयार होत होता तो सांगण्यासाठी त्याने ही मिटिंग बोलावली.
"हे बघा, मला दूरदृष्टीची सुद्धा शक्ती आहे हे फक्त आपल्या स्वागत टीमला माहिती आहे. मला निगेटिव्ह विचार व्यक्तीच्या डोक्याभोवती लाल प्रकाशमान वर्तुळाकार स्वरूपात दिसतात हे सुद्धा सगळ्यांनाच माहिती नाही. ती जी कुणी विघातक टीम आहे तीला समजा माझ्या नकार शोधक शक्तीबद्दलच माहिती आहे असे मानले तरीही माझ्या दूरदृष्टीबद्दल माहिती असण्याची शक्यता नाही. कारण ही शक्तीच मुळात मला अलीकडेच मिळाली आहे आणि त्याबद्दल मी स्वागत टीम व्यतिरिक्त कुणालाच सांगितले नाही. त्यामुळे मी जहाजवरून जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरच्या पप्पूला पाहिले असल्याचा विचार त्यांनी केला असेल याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना असे वाटले असेल की हल्लेखोर स्त्रीने जहाजावर विसरलेले दंडगोल आपण उघडले की, त्यातील सजीव निर्जीव वस्तू नष्ट करणारे पदार्थ जहाजाला आणि आपल्याला नष्ट करतील आणि जहाज त्यामुळे नष्ट झाले असेल. आपण सर्व नंतर बुडून मेले असू!"
हाडवैरी म्हणाला, "शक्य आहे, शंभर टक्के!"
सुनिल पुढे म्हणाला, "आता तुम्ही एक करा. भारतातील आणि जगातील महत्वाच्या ऐतिहासिक आणि सरकारी तसेच महत्वाच्या वास्तू, पर्यटन स्थळे आणि अति महत्त्वाचे व्यक्ती रहात असणाऱ्या घरांच्या आणि ऑफिसेसच्या आसपास असणाऱ्या सीसीटीव्ही कमेऱ्यांचे प्रक्षेपण शहरात ठिकठिकाणी असलेल्या आपल्या टीमकडून आपल्याला दिसेल अशी व्यवस्था करा. सायली, मिनाक्षी दिवसा आणि निद्राजीता रात्री असे तुम्ही सीसीटीव्हीचे फुटेज मॉनिटर करत रहा. लागल्यास तुमच्या मदतीला आणखी काहीजण घ्या. मला खात्री आहे की उडणारे भुंगे किंवा कीटक यांच्या आधारे ते काहीतरी लिक्विड किंवा पावडर किंवा एखादा गॅस रिमोटने ऑपरेट करून एखाद्या निर्जीव वस्तूवर स्प्रे करत असावे. असा एखादा संशय आलाच तर आपण त्या ठिकाणचा लाईव्ह कॅमेरा झूम करू आणि कीटक दृष्टीस पडला की मी वेगाने दूरदृष्टीच्या आधारे तिथे जाण्याचा प्रयत्न करीन आणि त्या उडणाऱ्या यांत्रिक कीटकांचा पाठलाग करेन आणि हे शोधण्याचा प्रयत्न करीन की ते कीटक कुठे कुणाकडे जातात! मग एखाद्या व्यक्तीचा सुगावा लागला की त्याचा पाठलाग करून मी काही शोध लागेल का ते बघेन. एकदा का त्या विघातक टीमचा ठावठिकाणा आणि त्यांचे हेतू आपल्याला समजले की मग आपल्याला त्यांच्या कारवाया नष्ट करणे सोपे होईल! आहात का सर्वजण तयार?"
सर्वजण एकमुखाने म्हणाले, "आम्ही तयार आहोत!"
इतर जगासाठी त्या बेटाच्या ठिकाणी फक्त एक शांत समुद्राचा भाग होता पण ठराविक लोक वगळता कोणालाही हे माहिती नव्हते की इथे जगावर येऊ घातलेल्या संकटावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत!
^^^