गाडी अतिशय वेगाने चालवत ड्रायव्हरने शहरातील वेगळ्या मार्गाने हाडवैरीला आकुर्डीला आणले. मार्गात टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण त्याच्या टॅबवर हाडवैरी बघत होता. आणि सुनिलच्या दृष्टीने हाडवैरीला सांगितले की ते नुकतेच आकुर्डी स्टेशनवर पोहोचतील पण अर्थात रेल्वे तिथे थांबणार नाही पण तिथे त्या ट्रेनला तो पकडू शकतो.

दोघेजण असलेल्या डब्याचा नंबर होता: CR2 हे सुनिलने सांगितले.

आकुर्डी आलं....

ट्रेन नुकतीच आकुर्डी स्टेशनमध्ये वेगाने शिरण्याच्या बेतात होती.

एव्हाना समांतर रस्त्यावरून पोलिसांची गाडी रेल्वेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होती आणि MF1 आणि FF2 हे ट्रेनमध्ये CR7 डब्यात होते आणि त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांच्या गाडी मागे चॅनेलवाल्यांची गाडी होती. आणखी एक दोन चॅनेलच्या गाड्या आणि पत्रकार होते.

"किशोर, कसं वाटतंय आता तिथे फिल्डवर? काय परिस्थिती आहे तिथे असं इथे बसून विचारायला छान वाटतं पण प्रत्यक्ष फिल्डवर भीतीने आपली...", अनघा उपाहासाने पुण्यातील टीव्ही स्टुडिओत बातम्या देत म्हणाली.

"अनघा, प्लिज! चांगले शब्द वापर, पुणेरी टोमणे नको. लोक ऐकताहेत आपलं बोलणं!", किशोर शरमून म्हणाला.

"अरे चांगलेच शब्द आहेत. खोट तुझ्या विचारांत आहे. मी म्हणत होते की भीतीने आपली... गाळण उडते!",अनघा डोळे मिचकावत म्हणाली.

न्यूज चॅनेलचा सिटी हेड अनघा बातम्या देत असताना तिथे आला आणि म्हणाला, "अनघा, पुरे आता. गाळण बिळण बास करा! दोघेजण भांडू नका. बातम्या द्या बातम्या. लाईव्ह दाखवा लोकांना!"

"ओके ओके!", अनघाने ओशाळून खात्री दिली.

एका न्यूज चॅनेलने चर्चा सुरू केली. जसजसे फिल्डवर त्यांचे प्रतिनिधी रिपोर्ट द्यायचे तसतसे ते बसल्या बसल्या एकमेकांच्या अंगावर ओरडून माईक, पेन कागदपत्रे  एकमेकांना फेकून मारत होते. एक ग्रुप सरकारची बाजू घेत होता, दुसरा सरकारच्या विरोधात तर तिसरा कोणाचीच बाजू न घेता नुसता गोंधळ घालत होता. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सामील झालेल्या लोकांची पण करमणूक होत होती आणि त्यांनाही वाटत होते की आपण प्रत्यक्ष स्टुडिओत असतो तर तिथल्या बसलेल्या लोकांच्या एकेक कानाखाली आणि थोबाडीत देता आली असती...

लाल रंगाचा बॉडी फिट असा कवटीचे चित्र असलेला पोशाख आणि डोक्यावर संरक्षण हेल्मेट घातलेल्या हाडवैरीने वेळ न दवडता कारच्या छतावर उभा राहून बाजूच्या झाडावर उडी मारली आणि बरोबर नेम साधून ट्रेन आकुर्डी स्टेशनमध्ये शिरताच विजेच्या तारांना धरून  सरकत सरकत CR2 डब्याच्या छतावर उडी मारली. त्याला अर्थात कसलीही इजा झाली नाही कारण त्याची हाडे होतीच तशी! मजबूत! कधीही न तुटणारी! आणि त्वचा रबरासारखी लवचिक! आणि त्याला कोणत्याही विजेचा शॉक बसत नसे... तो शॉकप्रूफ होता!!

आता डब्याच्या आतमध्ये कसे जायचे? त्यासाठी छतावरून सरपटत उलटे खिडकीतून बघून त्याला दिसले की त्या दोघांनी दोन लेडीजला बंदुकीच्या टोकावर ओलीस धरले होते. डब्यात सगळ्यांना त्याने बंदुकीच्या धाकाखाली ठेवले होते. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेल्या एका महिलेचे लक्ष खिडकीतून उलट्या दिसणाऱ्या हाडवैरीच्या हेल्मेटच्या आतमधल्या चेहऱ्याकडे गेले. काचेसारख्या पारदर्शक धातूपासून बनवलेले ते हेल्मेट उघडझाप करता येत होते.

ती महिला ओरडली, "अगं बाई बाई बाई! हा सुपरहिरो थोडा लक्ष्मीकांत, थोडा गोविंदा आणि बराच आडदांड सारखा दिसतो!"

बाजूला बसलेली तिची भाची म्हणाली, "आडदांड नाही गं, अरनॉल्ड!"

"हा तेच ते! टर्मिनस पिक्चर मधला", ती तोंड विचकावत म्हणाली.

भाची, "टर्मिनस नाही गं!...बरं जाऊ दे! मी पण कोणाला समजवायला बसली!"

दोघींना थँक्स म्हणून तो म्हणाला, "त्या दोघांचे बारा वाजवायला आलोय मी! बघाच आता!" असे म्हणत आकुर्डी असे तीन वेगवेगळ्या भाषेत नाव लिहिलेल्या स्टेशनवरच्या नामफलकावर नेम धरून हाडवैरीने छतावरून त्यावर आडवी उडी मारली आणि वेगाने तिथून आपोआप उधळला जाऊन तो ट्रेनच्या दरवाज्यातून आतमध्ये पडला. पटकन सावरून उठला आणि म्हणाला, "सर्वांनी पटकन बाजूच्या डब्यात जा, पटकन!"

त्या दोघा गुंडांनी ओलीस धरलेल्या महिलांच्या गालावर जोराने बंदुका दाबल्या आणि हाडवैरीला वॉर्निंग दिली, "ए, सकाळी त्या डिटेक्टिव्ह निगेटिव्हला वाचवू शकला नाहीस आणि आलाय इथे शहाणपण दाखवायला. आणि शर्टवर कवटीचं चित्र छापून तुला काय वाटलं आम्ही तुला घाबरून पळून जाऊ? या डब्यातील कोणीच कुठेही जाणार नाही, नाहीतर एकेकाला गोळ्या घालीन! आणि त्या दोघी? काय नाव म्हणाल्या त्यांचं त्या? निद्राजीता आणि मेमरी डॉल? कसली डोंबलाची डॉल ती? नुसती कापसाची मऊ मऊ डॉल आहे! लढायला उपयोगाची नाही ती! ती आणि तिची दुसरी साथीदार कोणत्यातरी वेगळ्याच डब्यात भरकटलेल्या आहेत. असले कसले रे तुम्ही सुपरहिरो? एक जण सकाळपासून हॉस्पिटलमध्ये आहे आणि म्हणे डिटेक्टिव्ह निगेटिव्ह? हा हा हा हा... कसला भारी जोक करता तुम्ही सगळे! स्वतःला सुपरहिरो म्हणवता आणि साध्या हिरोसारखी पण कामं जमत नाहीत!"

डब्यातील पब्लिक घाबरली. आहे तिथेच थबकली.

हाडवैरीचा पारा चढला. त्याच्या हाडांमध्ये जणू काही इलेक्ट्रिक करंट धावायला लागलं. हाडांमध्ये त्याला एक प्रकारची उष्णता जाणवायला लागली. एका क्षणी त्याच्या जागी सगळ्यांना फक्त एक मजबूत हाडांचा सापळा दिसायला लागला आणि जणू काही त्याच्या प्रत्येक हाडांतून आग ओकणारा प्रवाह धावत आहे. तो अवतार बघून ते दोघेही क्षणभर बावचळले आणि विद्युत वेगाने पुढील घटना घडली. हाडवैरी ऐवजी दिसणारा हाडांचा सापळा त्या दोघांच्या जवळ आला आणि वेगाने एका गुंडाचे बंदूक धरलेल्या हाताचे मनगट इतक्या वेगाने पिरगळले की बंदूक हवेत बराच वेळ गोलाकार फिरत फिरत तर खाली पडलीच पण त्याच्या हाडांना जणू शॉक लागल्यासारखी फिलिंग झाली. दुसऱ्याच्या हातातील बंदूक कधी गळून पडली त्यालाच समजले नाही. दुसरा गुंड उसने अवसान आणून हाडवैरी वर चिडला आणि हाडवैरीला भिडला. डब्यातील सगळे जण दोन्ही बाजूला दूर जाऊन एकत्र झाले. त्यापैकी दोघांनी हातरुमाल टाकून बंदुका उचलल्या आणि रिकाम्या सीटवर ठेवल्या. एकाने चेन ओढून ट्रेन थांबवण्यास सुरुवात केली. मध्यभागी निर्माण झालेल्या रिकाम्या जागेत आता बघणाऱ्यांना एक मजबूत हाडांचा सापळा दोन गुंडांशी लढतो आहे असे अद्भुत दृश्य दिसत होते. ओलीस धरलेल्या दोन्ही महिला पटकन बाजूला झाल्या आणि डब्यातील गर्दीत सुरक्षितपणे जाऊन मिसळल्या.

दोन्ही हेल्मेट घातलेले गुंड हाडांच्या सापळ्याच्या रूपातील पारदर्शक हेल्मेटवाल्या हाडवैरीला जोर लावून मागे ढकलू लागले. हाडवैरीच्या कवटीचा जबडा कर्रर्रर्र असा आवाज करत दात ओठ खाऊ लागला. तेव्हा त्याच्या प्रत्येक दातातून वेल्डिंग करतांना उडतात तशा ठिणग्या उडू लागल्या. त्या दोघांकडून हाडवैरी मागे ढकलला जात नव्हता. बराच वेळ ते दोघे हाडवैरीला मागे ढकलून वैतागले. थकले. पण तरीही त्यांनी आणखी उरलासुरला जोर एकवटला आणि त्याला ढकलायला सुरुवात केली. हाडवैरीला सुरुवातीला त्यांच्या चिवटपणाचे कौतुक वाटले पण नंतर त्याला राग यायला सुरुवात झाली आणि त्याने दोघांच्या हेल्मेटला धरले, दोघांच्या हेल्मेटधारी चेहऱ्यांना एकमेकांवर आदळायला जवळ आणले आणि त्याच वेळेस स्वतःचा पारदर्शक मजबूत हेल्मेट घातलेला चेहरा त्या दोघांच्या चेहऱ्यावर आदळायला एकत्र आणला. तीन हेल्मेटधारी चेहरे एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. हाडवैरीच्या हेल्मेटच्या प्रचंड आघातामुळे त्या दोघांचे हेल्मेट अनेक जागी टिचून फुटले आणि हवेत काचेचे तुकडे उडाले. काही तुकडे त्या दोघांच्या चेहऱ्यात घुसले आणि त्यातून रक्त आले. हळूहळू दोघांचे हेल्मेट तुकडे तुकडे होऊन खाली पडले. त्यातून दोघांचे चिडलेले आणि रक्ताळलेले चेहरे दिसायला लागले. हाडवैरीने दोन्ही हातांनी एकाच वेळेस दोघांच्या गालांवर जोरात थोबाडीत मारली आणि म्हणाला, "ऊस खाल्लाय का कधी लहानपणी?"

कसेबसे ते दोघे गाल चोळत आणि सावरत म्हणाले, "ख ख खाल्लाय ना!"

"स्वतःच्या दातांनी सोलून मग छोटे छोटे तुकडे करून खाल्लाय की फक्त रसवंतीमध्ये जाऊन रस पिलाय?"

"सोलून छोटे तुकडे करून पण खाल्लाय, लय मजा यायची!"

"मोठ्या ऊसाचे दोन तुकडे केलेय कधी? उभ्या उभ्या? मांड्यांवर?"

"न न न नाही!"

"मग मी करून दाखवू का तसे दोन तुकडे तुमच्या दोघांच्या हातांना ऊस समजून?"

गर्दीतील एक सोळा सतरा वर्षाची मुलगी म्हणाली, "तुम्ही शेतकरी आहात का हो हाडवैरीजी?"

"हो, मी शेतकरी आहे. संपूर्ण जगाचा पोषणकर्ता असतो शेतकरी!", असे म्हणून पुढे तो गर्दीला उद्देशून म्हणाला, "ऊस तोडण्याचं प्रात्यक्षिक दाखवू का तुम्हाला? थांबा दाखवतो!"

आणि त्याने दोन्ही गुंडांचे एकेक हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडले आणि ते स्वतःच्या गुडघ्यांवर आपटून त्यांचे दोन तुकडे करणार तेवढयात एकाने हाडवैरीच्या पायात पाय अडकावून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, पण हाडवैरी सावरला आणि त्याने दोघांच्या हातांच्या कोपराला एक दणका दिला, ते कळवळले.

हाडवैरी म्हणाला, "वा! वा! कमाल आहे. चांगली सहनशक्ती आणि चिवटपणा आहे तुमच्यात! बरं, मला एक सांगा कोल्हापूरी ठेचा खाल्लाय का तुम्ही दोघांनी कधी?"

वेदनेने कळवळत ते म्हणाले, "हो खाल्ला आहे!"

"कसा लागतो?"

"झ झ झ झणझणीत!"

"तुम्ही अजूनही ऐकत नाहीयेत म्हणून म्हटलं तुम्हाला थोडं झणझणीत इलेक्ट्रिक करंट देतो. गुडघ्यापासून सुरुवात करून ते करंट थेट मस्तकापर्यंत जाईल! चालेल ना तुम्हाला? मजा येईल खूप!! जिथे जिथे करंट वाहात जाईल तो भाग मस्तपैकी भुसभुशीत होईल, तुमच्या शरीराचे रखरखीत वाळवंट होईल, तुमच्या शरीराचे विविध भाग कुरकुरीत होतील आणि तुमची वाळू होऊन तुम्ही भरभुरीत होऊन उडून जाल हवेत! मजेत! मग सगळं काही खुसखुशीत होईल!"

गर्दीतील ती सोळा सतरा वर्षाची मुलगी पुन्हा बोलली, "तुम्ही मराठीचे शिक्षक किंवा लेखक पण आहात का हो हाडवैरीजी?"

तिच्याकडे बघत हसत हाडवैरी म्हणाला, "चांगला प्रश्न आहे! पण तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी वाट बघ. तोपर्यंत मी या दोघांची वाट लावतो!"

असे म्हणून हाडवैरीने दोघांच्या पायाच्या गुडघ्यांवर आपले दोन्ही हात घट्ट धरले. करंटची भीती वाटायला लागून दोघे गुंड जाम घाबरले. दोघांनाही झणझणीत करंट नको होते. ते हाडवैरीच्या पाया पडू लागले. दोघांनी सपशेल शरणागती पत्करली.

"आम्हाला मारू नका, आम्ही शरण येतोय!"

 "मी तुम्हाला इतका वेळ जास्त काही केले नाही. तुमच्या हातापायाच्या ऊसाचे मी अनेक तुकडे करू शकलो असतो, तुमच्या अंगात करंट सोडू शकलो असतो पण मी तसे केले नाही, का माहितीये?"

"का?"

"मला तुम्हा दोघांची लढाऊ वृत्ती आवडली. आमच्या स्वागत टीममध्ये सामील व्हा, देशासाठी काम करायला मिळेल. चांगले कर्म करायला मिळतील!आयुष्य सार्थकी लागेल!!"

"पण आमचे बॉस आम्हाला मारतील, सोडणार नाही."

"तुमच्या सुरक्षेची हमी मी घेतो. स्वागत टीम घेईल!"

"ठीक आहे, जशी आपली मर्जी, पण इथले सगळे लोक हळूहळू मरणार, आम्ही वाईट टीमसोबत प्रतिसृष्टीत जाणार होतो पण आता...?"

"कसली प्रतिसृष्टी आणि कसलं काय? आम्ही वाईट टीमचा प्लॅन फेल करायलाच आलोय! प्रतिसृष्टीचा पूर्ण प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही! घाबरू नका!"

"प पण वा वाईट टीमचा प्लॅन फेल करणं एवढं सो सोपं नाहीये जेवढं तुम्ही स समजताहात!"

हाडवैरीने अंदाज केला की बहुतेक हे दोघेजण आता वाईट टीमच्या आजच्या बारा वाजेच्या प्लॅनबद्दल सांगतील त्यामुळे त्याने इतर गर्दीच्या नकळत त्या दोघांना डोळ्यांनी खूण करून पुढे काही बोलू नका असा इशारा केला. कारण डिटेक्टिव्ह निगेटिव्हने दूरदृष्टीने पाहिलेला वाईट टीमचा आजचा प्लॅन स्वागत टीमला कळला आहे, याची वाच्यता हाडवैरीला सार्वजनिकरित्या करायची नव्हती तसेच या दोघांकडून पण तो प्लॅन कुणाला कळता कामा नये कारण मीडियामुळे ते जगजाहीर होऊन त्यामुळे लोक सावध झाले असते हे जरी चांगले झाले असते पण त्यापेक्षा जास्त धोकेदायक म्हणजे वाईट टीम सावध होऊन त्यांनी त्यांचा प्लॅन बदलला असता.

"अरे तुम्ही कोणाकडून आहात? आमच्याकडून की त्यांच्याकडून?", हाडवैरी दोघांना म्हणाला.

"तु तु तुमच्याकडून!", ते दोघे म्हणाले.

"ओक्के! मग काळजी नक्को! जास्त टेन्शन नाही बरं घ्यायचं बाळांनो!"

आता सर्वांना मजबूत हाडांच्या सापळ्याऐवजी पुन्हा हाडवैरी दिसू लागला होता.

एव्हाना न्यूज चॅनेलवाले, पोलीस आणि MF1,2, FF1,2 आणि आणखी गर्दी तिथे जमा झाली होती. हाडवैरीने दोघांना चौघा स्वागत फायटर्सच्या हवाली केलं. मग त्यांना थोडक्यात खासगीमध्ये वाईट टीमच्या प्लॅनबद्दल अपडेट दिले. मग पोलिसांशी त्यांचे बोलणे झाले आणि त्या दोघांना स्वागत टीमकडे सुपूर्द करण्यासाठी परवानगी घेतली.

"तर आपण बघू शकता, की इथे हाडवैरीने सुपरहिरो नावाला सार्थ केले आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो की एक अद्भुत अशी फाईट लोकांना बघायला मिळाली आहे. त्या फाईटचे आमच्या चॅनेलने दर्शकांना थेट प्रक्षेपण दाखवले आहे. स्वागत प्रमुख डिटेक्टिव्ह निगेटिव्ह हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हणून काय झालं, त्याचा साथीदार पण काही कमी नाही! त्याने एकच निरोप स्वागत टीम तर्फे सगळ्यांना दिला आहे तो म्हणजे घाबरू नका पण जागरूक राहा. आजपासून आतापासून जागरूक राहा, सावध राहा! आपल्या आजूबाजूला नीट निरीक्षण शक्ती ठेऊन काय चाललंय त्याकडे लक्ष असू द्या! स्वतः मधला लढवैय्या कायम जागृत असू द्या! प्रत्येक जण हा हाडाचा लढवैय्या असतोच, फक्त विशिष्ट वेळ येऊ द्यावी लागते!"

"होय किशोर! अगदी बरोबर आहे हाडवैरीचे म्हणणे! आता आपला एक प्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये गेला आहे डिटेक्टिव्ह निगेटिव्हची तब्येत कशी आहे ते विचारायला!"

"नक्कीच, अनघा! एकंदरीत आज दिवसभरात काय होईल ते सांगता येत नाही! मी या संदर्भातील प्रत्येक बातमी फिल्डवरून आपल्या दर्शकांना देतच राहीन. आपले काही प्रतिनिधी मुंबईतील व्हीआयपी च्या घराजवळ तैनात आहेत, त्यांच्याकडूनही तू काही अपडेट घेत राहा!"

"होय किशोर! आशा करूया की या सगळ्याचा लवकर अंत होईल!"

पण ही तर सुरुवात होती...

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel