कुठलीही काल्पनिक कथा वाचायची म्हटली तर वाचकाला सुद्धा आपली कल्पनाशक्ती वापरावी लागते आणि ज्या गोष्टी प्रत्यक्षांत शक्य नाहीत त्या शक्य आहेत असे समजून कथा वाचावी लागते. "तो सरदार घोड्यावर बसून लढाईला गेला" इतके साधे वाक्य जरी वाचले तरी घोडा का  होता कि पांढरा, सरदार चा पोशाख काय होता इत्यादी अनेक गोष्टी वाचक म्हणून आम्हाला मनात चित्रित कराव्या लागतात. विज्ञान कथा वाचताना हे आणखीन क्लिष्ट होते कारण विज्ञान कथा लेखकाचा जो कॅनवास असतो तो फारच मोठा असतो. इथे ग्रह तारे निर्माण केले जाऊ शकतात किंवा समुद्राच्या गर्भांत शहरे वसवली जाऊ शकतात. त्यामुळे लेखकाप्रमाणे वाचकाला सुद्धा कथा वाचायची मेहनत करावी लागते. कथा जर जास्तच किचकट असली तर मग त्यांत आनंद उरत नाही. किंवा कथा जर फार साधी सोपी असली तर त्यांत मजा येत नाही. त्यामुळे विज्ञान कथा लेखकाला एक तारेवरची कसरत करावी लागते. वाचकाला घेऊन कल्पनाशक्तीची भरारी घ्यायची असतेच पण त्याच वेळी वाचकाने भरकटू नये म्हणून काळजी घ्यावी लागते.

 

निमिष ह्याचे पुस्तक डिटेक्टिव्ह निगेटिव्ह माझ्या मते एक पहिले पाऊल आहे. ह्या पुस्तकांत निमिष ह्यांच्या लेखनाची काही महत्वाची वैशिष्ट्ये दिसतात ती सामान्य वाचकाला कदाचित प्रथमदर्शनी लक्षांत येणार नाहीत पण विज्ञान कथा किंवा सुपरहिरो कॉमिक्स च्या वाचकांना नजरेत भरतील. पण डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ह्या पुस्तकांतून निमिष ह्यांनी जो भरभक्कम पाया घातला आहे त्यावर निमिष ह्यांनी आणखीन कथानके वाचकांपुढे आणावीत असे मला वाटते.

 

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ह्या कथेतून निमिष ह्यांनी हा बॅलन्स फार चांगला सांभाळला आहे. मी वाचकांना स्पॉईलर देऊ इच्छित नाही त्यामुळे मला ज्या गोष्टी आवडल्या त्या इथे विस्तृत पणे सांगणार नाही. पण खालील काही वैशिष्ट्ये मी जरूर नमूद करेन. 

 

निमिष ह्यांनी "वर्ल्ड बिल्डिंग" वर खूप भर दिला आहे. खूप कमी लेखकांना हि गोष्ट जमते. आपल्या नायकाला पहिल्या पानावरुन हिरो न बनवता त्यांनी हळू हळू नायकाचे पात्र उभे केले आहे आणि त्याच वेळी मुंबई शहर, डिटेक्टिव्ह निगेटिव्ह च्या शक्ती ह्यांची माहिती खोलवर दिली आहे. फक्त सुपरपावर आहे असे नाही तर त्यामागे नक्की शास्त्र काय आहे हे सुद्धा वाचकांना सांगण्याचे कष्ट त्यांनी घेतले आहेत. अनेक नवीन लेखक हि महत्वाची बाब विसरून जातात. आयर्नमॅन चे अनेक चित्रपट आम्ही पहिले असले तरी त्याची ओरिजिन स्टोरी आम्ही कधीही विसरू शकत नाही. बॅटमॅनच्या आईवडिलांचा क्राईम एली मध्ये खून होतो हि घटना तशी मोठीशी नसली तरी असंख्य बॅटमॅन कॉमिक्स आणि चित्रपटांतून ती आमच्या मनावर कोरली गेली आहे. हि वर्ल्ड बिल्डिंग ची खूप छान उदाहरणे आहेत. डिटेक्टिव्ह निगेटिव्ह वाचताना निमिष ह्यांनी वर्ल्ड बिल्डिंग वर खूप भर दिला आहे हे जाणवते. x-men सारख्या कॉमिक बुक्स प्रमाणेच निमिष ने डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ची टीम उभी केली आहे.

 

दुसरी गोष्ट ठळक पणे उठून दिसते ती म्हणजे ज्या बारकाईने निमिष ह्यांनी विविध घटना लिहिल्या आहेत. सर्व कथा  पुणे-मुंबई सारख्या खर्या शहरांत घडते गॉथम सारख्या काल्पनिक शहरांत नाही त्यामुळे, स्थळे आणि काळ विषयी लिहिताना लेखाला विशेष ध्यान द्यावे लागते. रावन सारख्या बिग बजेट चित्रपटांत सुद्धा मुंबई शहराबद्दल इतक्या चुकीच्या गोष्टी दाखवल्या होत्या कि तो चित्रपट बघावासा वाटला नाही, पण निमिष ने विशेष ध्यान देऊन बारकाईने आपली स्थाने कथेत गोवली आहेत. त्यामुळे कथा आल्हादायक आणि तर्कशुद्ध वाटते. जे वाचक ह्या शहरांत राहत असतील त्यांना हि कथा वाचून विशेष आनंद मिळेल.

 

निमिष ह्यांनी अश्याच प्रकारे  मराठी साहित्यांत भर घालावी आणि आधुनिक माध्यमांचा वापर करून आपले नाविन्यपूर्ण साहित्य वाचकांकडे पोचवावे अशी मी आशा करतो.

 

  • अक्षर प्रभू देसाई - कॅलिफोर्निया

(गूगल मध्ये इंजिनयर आहेत, त्याशिवाय बूक्सट्रक हे मराठी आणि हिंदी साहित्याचे संकेतस्थळ  चालवतात)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel