सुधीर फडके

गीतरामायणाची चिरंतन, आध्यात्मिक, सांगितिक देणगी रसिकांना देणारे आणि महाराष्ट्राचे संगीत क्षेत्र अधिक श्रीमंत, अन्‌ आधुनिक करणारे कलानिष्ठ व राष्ट्रनिष्ठ कलाकार!

एखादी कला, छंद किंवा कौशल्य जोपासायचे म्हणजे त्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून द्यायचे, या प्रवृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबुजी हे होत.  गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्यापर्यंत पाहोचू शकले व शब्दातील अभिप्रेत भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकला.

शिस्तबध्द जीवनशैली, शुध्द भाषा-स्पष्ट विचार व उच्चार, कर्तव्यकठोरता, परिश्रमांची पराकाष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम व जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार ही त्यांच्या स्वभावाची आणि एकूण कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती.

संगीत क्षेत्रातील आपल्या अलौकिक कर्तृत्वाने रसिकांच्या चिरस्मरणात असलेल्या बाबुजींचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव श्रीराम फडके असे होते. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने, सुरुवातीच्या काळात कोल्हापुरातच श्री. विनायकबुवा पाध्ये यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतही संपूर्ण भारतभर फिरून अनेक दिग्गज संगीत तज्ज्ञांकडून मिळेल त्या चिजा, राग, गायकी त्यांनी आत्मसात केली. अपार कष्टाने, तपश्र्चर्येने त्यांनी आयुष्यभर संगीत-साधना केली.

१९४१ पासून एच.एम.व्ही. या कंपनीत नोकरी करता करता ते पुढे चित्रपटास संगीत देऊ लागले. १११ मराठी  चित्रपट व २१ हिंदी चित्रपटांना अन्‌ शेकडो भावगीतांना त्यांनी संगीत दिले. १९४५-४६ मध्ये त्यांनी ‘प्रभात’ चित्रपट संस्थेच्या माध्यमातून आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरूवात केली. सुमारे ५० वर्षे मराठी चित्रपट संगीत व भावगीत क्षेत्रांत फडके युग’ रसिकांच्या मनांवर राज्य करत होते. त्यांनीच निर्माण केलेला ‘वीर सावरकर’ हा हिंदी चित्रपट, संगीतकार व गायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होय.आपण स्वतः संगीतकार असूनही दुसर्‍या संगीतकारांसाठीही त्यांनी गाणी गायली. मराठी भावगीत क्षेत्रातील जवळजवळ सर्वच गायक-गायिकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायनाचे धडे घेतले. बालगंधर्व, पं. भीमसेनजी, हिराबाई बेडोदेकर, माणिक वर्मा, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले आदी दिग्गज गायक-गायिकांनी बाबुजींनी संगीत दिलेली गीते गायली आहेत. बाबुजींमधील संगीतकार व गायक रसिकांच्या अनेक पिढ्यांना प्रामुख्याने आकाशवाणीच्या माध्यमातून भेटला. हा माझा मार्ग एकला, देहाची तिजोरी, जिवलगा कधी रे येथील तू, सखी मंद झाल्या तारका, कुठे शोधीसी रामेश्र्वर, विठ्ठला तू वेडा कुंभार, आकाशी झेप घेरे, बाई मी विकत घेतला शाम, बाई माझी करंगळी मोडली, प्रिया आज माझी नसे साथ द्याया -अशी एकाहून एक सरस गाणी बाबुजींनी महाराष्ट्राला दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या असंख्यराष्ट्रभक्तीपर गीतांनाही त्यांनी चाली लावल्या.

अनेक मानसन्मान, पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. १९६३ सालचा संगीत दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार  ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी त्यांना मिळाला. १९९१ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. तसेच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८) व लता मंगेशकर पुरस्कार ही (२००१) त्यांना बहाल करण्यात आले. पण खरा पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीतावर व गायनावर रसिकांनी केलेले प्रेम हाच होय.

‘गीतरामायण’ म्हणजे त्यांच्या सांगितिक आयुष्यातील परमोच्च बिंदू होय. एक अलौकिक, दैवी कलाकृतीच त्या काळात बाबुजींच्या व गदिमांच्या (ग. दि. माडगूळकर) हातून घडली. या कलाकृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर जणू आध्यात्मिक संस्कारच केले. गदिमांची ‘अक्षर’ गीते, बाबुजींचे स्वर्गीय संगीत, व बाबुजींच्याच दैवी आवाजाने महाराष्ट्रावर जणू मोहिनीच घातली होती. त्या काळी गीतरामायण आकाशवाणीवरून प्रसारित होत असताना लोक रेडिओ संचाची पूजा करायचे आणि गाणी ऐकायचे. १९६० पासून आजपर्यंत गीतरामायण तितकेच लोकप्रिय आहे. स्वत: बाबुजींचे पुत्र श्रीधर फडके ‘गीतरामायण’ रसिकांसमोर सादर करतात. तसेच महाराष्ट्र्रातील अनेक वाद्यवृंद, अनेक शहरांत, गावोगावी, खेडोपाडी गीतरामायणाचे सादरीकरण करतात. खुद्द बाबुजींनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे सुमारे १८०० प्रयोग - भारतात व परदेशांतही केले.

राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ बाबुजी दादरा-नगर-हवेली मुक्तिसंग्रामातील प्रमुख योद्धयांपैकी एक होत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्यांचे दैवतच होते. आपले प्रेरणास्थान, श्रध्दास्थान, दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भव्य चित्रपट बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते त्याकरिता अखेरपर्यंत कार्यरत राहिले. गीतरामायणाचे कार्यक्रम करून, प्रसंगी लोकवर्गणी काढून, अनेक अडचणींना तोंड देत ‘वीर सावरकर’ हा हिंदी चित्रपट त्यांनी पूर्ण केला. स्वातंत्र्यवीरांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांची राष्ट्रभक्ती भावी पिढीत रुजावी म्हणून त्यांनी ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली. हे प्रतिष्ठान आजही मुंबई येथून कार्यरत आहे.

बाबुजींनी मराठी संगीत क्षेत्रावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवला, भावसंगीतावर वेगळे संस्कार केले. त्यांचे पुत्र श्रीधर फडके हेही त्यांची परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. श्रीधर फडके स्वत: उत्तम गायक आहेत आणि स्वत:ची वेगळी शैली ठळक करणारे उत्कृष्ट संगीतकारही आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षी बाबुजींची प्राणज्योत मालवली. पण त्यांच्या  संगीताची, गायनाची ज्योत रसिकांच्या मनात कायम तेवत राहील हे निश्र्चित!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel