डॉ. य. दि. फडके

ज्यांच्या साहित्याचा संदर्भ घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या कोणत्याही राजकीय-सामाजिक अभ्यासकाचा अभ्यास पूर्णच होणार नाही, असे ज्येष्ठ लेखक, संशोधक व थोर विचारवंत!

वैचारिक व इतिहासपर लेखन करणारे, महाराष्ट्राला लाभलेले ज्येष्ठ लेखक, राजवाडे व सरदेसाई या इतिहासकारांचे वारस म्हणून संबोधले जाणारे संशोधक व विचारवंत म्हणजे डॉ. य.दि. फडके होत. पुढील काळात शिक्षकी पेशा स्वीकारणार्‍या डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म सोलापूरला झाला.

१९५५ मध्ये पुणे विद्यापीठातून बी.ए. (ऑनर्स) पूर्ण केल्यानंतर १९५३ व १९५८ मध्ये अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यामध्ये य.दि. फडके यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कॉंग्रेस पक्ष’ हा प्रबंधाचा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून १९७३ साली त्यांनी पी.एचडी. प्राप्त केली. ३७ वर्षांच्या त्यांच्या अध्यापनाच्या कालखंडात मुंबई व पुणे या विद्यापीठांतील राज्यशास्त्र विभागात त्यांनी प्रपाठक,प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्था, येथे १९८४ ते १९९१ या कालावधीत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केल्यानंतर य.दि फडके यांनी सेवानिवृत्ती घेतली.

त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषदेची पहिली डॉ. आंबेडकर राष्ट्रीय गौरववृत्ती १९९१-१९९३ या दोन वर्षांसाठी य.दि. फडके यांना प्रदान करण्यात आली. मुंबईतील एशियाटिक सोसायटी या संस्थेने १८१५-१९९५ या १८० वर्षांच्या काळातील १२२ व्यक्तींना सन्माननीय सदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला, त्यांतील डॉ. फडके हे एक होत.

डॉ. फडके यांनी त्यांच्या जीवनात अनेक मानद पदे भूषविली. त्यातील काही म्हणजे; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद व बेळगांव येथे भरलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, भारतीय ज्ञानपीठाच्या मराठी सल्लागार समितीचे निमंत्रक अध्यक्षपद, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या प्रकाशन विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य- ही होत.

आपली मते परखडपणे मांडणार्‍या डॉ. फडके यांना फिलाडेल्फिया येथील टेंपल विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ फेडरॅलिझममध्ये’ ज्येष्ठ फुलब्राईट संशोधक म्हणून संशोधन करण्याची संधी १९८४ मध्ये उपलब्ध झाली.

डॉ. फडके यांचा व्यासंग व लेखनाचा आवाका अफाट होता, त्यांच्याकडून इंग्रजी तसेच मराठी लेखन झाले आहे. त्यांनी २ पुस्तके अनुवादित केली आहेत व अनेक पुस्तके संपादितदेखील केली आहेत. ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ च्या आठ खंडांच्या माध्यमातून त्यांनी एक संशोधक व लेखक म्हणून महाराष्ट्राचा सखोल आढावा घेतला. महाराष्ट्राचा इतिहास (भूतकाळ) व भविष्यकाळ या दृष्टिकोनातून हे त्यांचे बहुमूल्य योगदान आहे.

डॉ. फडके यांच्या ६ पुस्तकांना - शोध बाळगोपाळांचा; व्यक्ती आणि विचार; केशवराव जेधे; शोध सावरकरांचा; लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक व आंबेडकरी चळवळ या पुस्तकांना - महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या ६०० वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वोत्कृष्ट पुस्तके म्हणून वाचकांनी निवडलेल्या १७७ पुस्तकांच्या यादीत त्यांच्या ’शोध बाळगोपाळांचा’ या पुस्तकाचा समावेश आहे. याखेरीज डॉ. फडके यांचे अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,वृत्तमानस, नवशक्ती वगैरे दैनिकांत त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले. आकाशवाणी व दूरदर्शन यांसारख्या माध्यमांद्वारेही त्यांनी मोठे वैचारिक योगदान दिले.  

आधुनिक इतिहास लेखनास प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा राजवाडे-सरदेसांईंचा वारस दिनांक ११ जानेवारी, २००८ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel