केळशीच्या बंदरात जिवाजी विनायक सुभे
दार यांची वाट पाहात दौलतखान आणि दर्यासारंग थांबले होते. सुभेदार जी रसद आणि युद्धसाहित्य घेऊन येणार होते , ते आलेच नाहीत. काय घोटाळा झाला कोण जाणे! पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वाट पाहूनही सुभेदार न आल्यामुळे दौलतखानाने रायगडाकडे बातमी पाठवली की , ‘ आम्ही अगदी वेळेवर केळशीच्या बंदरात गलबते घेऊन थांबलो आहोत. पण जिवाजी सुभेदार अद्यापही आलेले नाहीत , तरी आम्ही काय करावे ? आज्ञा करावी. ‘

केळशीची ही खबर महाराजांस रायगडावर समजली. कोणतेही काम ठरल्याप्रमाणे वेळच्यावेळीच करण्याचा महाराजांचा शिरस्ता आणि कडक हट्ट होता. इथे तर ऐन युद्धकाळात कांसा बेटावर काम करणाऱ्या शेकडो मराठी लोकांच्याकरिता रसद पाठवण्यास थोडाही उशीर करून चालणार नव्हता. सुभेदार जिवाजींचा हा गलथानपणा किंवा बेखबरदारपणा पाहून महाराज संतापले आणि त्यांनी जिवाजी विनायक सुभेदार यांना असे झणझणीत पत्र पाठवले , की त्यातील एक एक अक्षर लवंगी मिरचीसारखे तिखट होते. महाराजांनी लिहिले होते , ‘ कांसा बेटावर हशम , कामाठी आणि आरमारी शिपाई काम करीत आहेत. जंजिऱ्याच्या श्यामलांस जबर शह देण्यासाठी आम्ही दांडा राजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पहात आहोत. तुम्ही मात्र बेदरकार दिरंगाईने बेफिकिर वर्तता ? तुमच्यामुळे दौलतखान आणि दर्यासारंग आरमारानिशी खोळंबून पडले. असे बेजबाबदारीने वागण्यासाठी गनिमानेच ( जंजिरेकर सिद्दीने) तुम्हांस काही ( लाचलुचपत) देऊन आपलेसे केलेले दिसते. बेदरकारीने म्हणत असला की , दुसरीकडून कोठून तरी कांसा बेटावरील कामास मदतीचा मजरा (तरतूद) होईल. ही अशी बुद्धी तुम्हांस कोणी दिली ? ब्राह्माण म्हणून तुमचा मुलाहिजा कोण ठेऊ पाहतो! बरा नतीजा (परिणाम) पावावा. बहुत काय लिहिणे ? तरी तुम्ही सूज्ञ असा. ‘

एकूण या प्रकरणात जिवाजी विनायकाचा गुन्हा स्पष्ट दिसून येतो. त्याने जर काही घोटाळा झालाच असेल , तर स्वार पुढे पाठवून केळशीस दौलतखानास खबर देणे जरुर होते , हे तर अगदी उघड आहे. पण त्यानेही काहीच कळवले नाही. त्यामुळे महाराजांनी संतापून ‘ तुमचा मुलाहिजा कोण ठेवू पाहतो. ‘ असा जाब पुसला. यावरून महाराजांचा स्वभाव , कडक शिस्त आणि विलक्षण तत्परता दिसून येते. या प्रकरणात जिवाजी विनायकांचे काय झाले ते समजत नाही. पण बहुदा महाराजांनी सुभेदारीवरून त्यांना बडतर्फ केले असावे असा साधार अंदाज आहे.

हीच शिस्त महाराजांच्या जीवनांत कडकपणे पाळली गेेलेली दिसून येते. कारवार स्वारीच्या वेळी (इ. १६६५ फेब्रु.) एका मराठी हेराने पाठविलेल्या गुप्त बातमीत चुका झाल्या म्हणून महाराजांना कारवारी मोहिमेत थोडा फटका खावा लागला. नुकसान झाले. महाराजांनी त्या चूक करणाऱ्या हेराला शिक्षा केली. नेतोजी पालकराने सेनापती पदावरून , शामराजपंत रांजेकरांना पंतप्रधानपदावरून आणि नरहरी गंगाधरांसारख्या बुद्धिमान मंत्र्याला मंत्रीपदावरून काढून टाकणारे महाराज कोणाही लहान आणि मोठ्या सरकारी नोकरदाराला मुलाहिजा ठेवीत नसत.

शिदोजी प्रतापराव गुजर हा पुढे सिंहगडचा किल्लेदार होता. (इ. १६७६ ) त्याने बेचौकशी जेजुरीच्या देवस्थानच्या नारायण महाराज देव यांच्या केवळ निरोपावरून गडावर तुरुंगात डांबले. हे महाराजांस समजले , तेव्हा महाराजांनी शिदोजी गुजराला जाब विचारला की , ‘ तू चिंचवडकर देवमहाराजांच्या सांगण्यावरून एका गरिबाला गडावर तुरुंगात डांबतोस ? हा अधिकार तुला कोणी दिला ? तू चाकर कोणाचा ? छत्रपतींचा की चिंचवडकर देवांचा ?’ त्या गरिबांस महाराजांनी पूर्ण मुक्त केले. शिदोजीस काही शिक्षा केली का याची माहिती मिळत नाही. पण नक्कीच शिक्षा वा जुर्माना ठोठावला असावा असे वाटते. हा शिदोजी गुजर म्हणजे प्रसिद्ध प्रतापराव गुजरांचा प्रत्यक्ष पुत्र होता. चिंचवडकर देव महाराज हे थोर गणेशभक्त साधुपुरुष होते. त्यांनाही महाराजांनी एक पत्र लिहून म्हटले आहे की , एका गरिबावर आपण का अन्याय केलात ? ‘ आमची बिरदे तुम्ही घ्या. (बिरदे म्हणजे बिरुदे , अधिकारपद) आणि आपली बिरदे आम्हांस द्या. ‘ म्हणजे याचा अर्थ असा की , तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही चिंचवडास आरत्या धुपारत्या करीत बसतो! हे पत्र इतके बोलके आहे , की आमच्या आजच्या सर्व पक्षातील सर्व लहान आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी त्याचा महिनाभर अभ्यास करावा.

कांसा बेटावरील किल्ल्याचे बांधकाम अतिशय कठीण अडचणींना तोंड देतदेत पुरे होत होते. थबकत नव्हते. सिद्दीच्या विरोधाला टक्कर देऊन महाराजांनी किल्ला बांधून पूर्ण केला आणि या किल्ल्याला नाव दिले. ‘ पद्मदुर्ग. ‘

महाराजांचे अनुशासन युरोपीय टोपीकरांपेक्षाही शिस्तबद्ध , वक्तशीर , योजनाबद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचेच होते. म्हणूनच अस्ताव्यस्त खर्च , साहित्याची नासाडी आणि प्रजेचे हाल कधीही झालेले दिसत नाहीत. अचानक पाऊस आला आणि सरकारी धान्याची गोदामे भिजून सडून , रोगराईपण झाली आणि परिणाम प्रजेला भोगावे लागले , असे वृत्तांत सध्या आपण ऐकतो , तसे कधीही घडले नाही , घडत नसे.महाराजांचे आसूड हे असे भीडमुर्वत न ठेवता कडाडत होते.
-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel