अन्य काही उपाये पोट भरावे. असं युवकांना सांगणारे समर्थ आयुष्यभर शौर्य , धैर्याचा आणि भक्ती , निष्ठेचा उपदेश आणि आग्रह जनांना करीत होते. धीर धरा , धीर धरा , हडबडू गडबडू नका. विवेकी जे गवसेना , ऐसे काहीच असेना. म्हणून विचारी बना , विवेकी बना. कृतीशील बना. प्रयत्नांची शिकस्त करा. यत्न तो देव जाणावा. प्रपंच नेटका करा. उगीच वणवण हिंडोनी काय होते ? म्हणोन योजनाबद्ध , शिस्तबद्ध , नेटाने हाती काम घ्या अन् ते पूर्ण करा. निरोगी असा. सदा मारुती हृदयी धरा. शक्तीची उपासना करा.

शक्ती युक्ती जये ठायी , तेथे श्रीमंत धावती. म्हणजेच ईश्वर युक्ती त्यांच्याच मदतीला धावतो. संसार आणि व्यवहार उत्तम करा. जयासी प्रपंच साधेना तो परमार्थी खोटा. सशक्त व्हा. कोण पुसे अशक्ताला , रोगीसा बराडी दिसे. सुंदर दिसा , सुंदर असा , सुंदर जगा असा साराच आणि अजूनही कितीतरी मानवी जीवनाला उपयुक्त अन् मार्गदर्शक असा जीवनवेद समर्थांनी आयुष्यभर सांगितला. स्वत: व्यक्तिगत तीन दगडांचा संसार न मांडता अवघ्या जनलोकांचा संसार सुखी आणि कर्तव्यतत्पर व्हावा यासाठी त्यांनी स्वत:च जीवन महाराष्ट्राच्या सहाणेवर चंदनासारखं झिजवलं. त्या समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला , त्या दिवशीही माघ वद्य नवमी होती.

तानाजी मालुसऱ्याने सिंहगडावर देह ठेवला त्याही दिवशी माघ वद्य नवमी होती. फक्त वर्ष वेगवेगळे. एकाने मराठी मुलुखाला जीवन दिले. दुसऱ्याने मराठी मुलुखासाठी जीव दिला. दोघांनीही वाट्याला आलेली तिथी साजरी केली. या भूमीसाठी या जनलोकांसाठी आपलेही जीवन वा जीव खचीर् घालणारे कितीतरी समर्थ आणि कितीतरी मालुसरे इतिहासात आपल्याला दिसतात ना! युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का ? बेचैन जगा अन् चैनीत मरा , भान ठेवून योजना करा अन् बेभान होऊन काम करा हाच याचा अर्थ.

तानाजीच्या मृत्युने महाराजांच्या आणि मराठ्यांच्या मनावर दु:खाचं सावट आलं. पंधरा दिवस उलटले. अन् विसाव्या दिवशी म्हणजेच दि. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर बाळंतीणीच्या दालनावरचा पडदा हलला. सोयराबाईसाहेब , राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. मनं उमलली. आवतीची भिंगरी फिरली. राजकुमार जन्मास आले. गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे अन् बारुदगोळा उडवीत बंदुका वाजल्या. महाराज यावेळी राजगडावरच होते. त्यांना जिजाऊसाहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली. सिऊबा , राजकुमार जन्मास आले.

आनंदच , मुलगा जन्माला आला अन् समजा मुलगी जन्माला आली असती तर ? तरीही आनंदच. महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की. फरक नाही.

पण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच. नवीन जन्माला आलेला हा राजकुमार ( राजाराम महाराज) पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला. मानवी मनाला हे असलं काही झालं की , खटकतंच. मन जरा चुकचुकतंच. मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक , फोडा नारळ. म्हणा मंत्र. करा शांत. अन् बाळाच्या बऱ्याकरता करा नवस. हे चालतंच. आजच्याही जगात आपण पाहतोच की. पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले , ‘ राजकुमार जन्मास आले , पण पालथे जन्मास आले. ‘

हे ऐकताच महाराज चट्कन उद्गारले , ‘ पालथे जन्मास आले ? बहुत उत्तम! आता दिल्ली पालथी घालतील! ‘

जीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता. हा तीर्थरुप होता.

एकूण वातावरण बदलले. नवी पालवी आली. इथं सहज जाताजाता सांगायचंय की , शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात , आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्रद्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते. नवसासायासांनी नव्हे.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel