शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला.

या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता की , त्याने म्हटले की , ‘ हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पण कोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.

‘ कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे , गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला.

खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली। खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे.

पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती. शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई रायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ‘ आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी.

‘ यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला की , ‘ मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी.

हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: हलकल्लोळ उडाला. मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना , तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ माजला. याचे नाव गनिमी कावा.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel