आग्र्याला महाराज गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त तीनशे माणसे असल्याची नोंद आहे. ही सर्व मंडळी सुटून सुखरूप घरी आली. यातील एकही माणूस दगावला नाही. एकाही माणसानं दगा दिला नाही. अत्यंत विश्वासू , धाडसी , कष्टाळू आणि निष्ठावंत असेच हे तीनशे सौंगडी सांगाती होते. फितवा फितुरीची शंकासुद्धा येत नव्हती. घडलेही तसेच. असे सहकारी असतात तेव्हा पर्वतप्राय प्रचंड कायेर् गोवर्धनासारखी करंगळीवरही उचलली जातात.

आग्रा प्रकरणात घडलेल्या एका गोष्टीची नोंद गमतीदार आहे. नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना महाराजांनी मथुरा येथे ‘ मथुरे ‘ या आडनावाच्या कुटुंबात ठेवले. संभाजीराजांच्या सांगाती बाजी सजेर्राव जेध देशमुख यांनाही ठेवले. कुणाला संशय येऊ नये म्हणून या मथुरे कुटुंबियांनी ‘ हा मुलगा आमचा भाचा आहे ‘ असेच वेळप्रसंगी म्हणत राहिले. शंभूराजांना त्यांनी जानवे घातले आणि धोतरही नेसविले. हे मथुरे कुटुंब मोरोपंत पिंगळ्यांचे सासुरवाड होते. बखरीतून काही कथा ही नोंदलेल्या सापडतात. निदान महिना सव्वामहिना शंभूराजे मथुरे यांच्या घरी राहिले. या काळात कोणा मोगल अधिकाऱ्यांना संशय आला म्हणे की , हा लहान मुलगा यांचा कोण ? तेव्हा कृष्णाजीपंत मथुरे यांनी उत्तर दिले की , ‘ हा आमचा भाचा आहे ‘ तेव्हा या मोगल अधिकाऱ्यांनी म्हटले , की एका ताटात जेवाल ? तेव्हा मथुरे यांनी ‘ होय ‘ म्हणून एका ताटात दही पोहे शंभूराजांबरोबर खाल्ले म्हणे! ही कथा खरी असो वा खोटी असो , पण शिवाजी महाराजांची माणसे कोणत्या विचारांनी आणि आचारांनी भारावलेली होती , याची द्योतक नक्कीच आहे.

संभाजीराजे यांना घेऊन मथुरे बंधू नंतर सुखरूप राजगडला येऊन पोहोचले. दिवस होता २१ नोव्हेंबर १६६६ . महाराजांनी या मथुरे बंधूंना ‘ विश्वासराव ‘ असा किताब दिला. यातच सर्व काही आले. महाराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची अठरापगड संघटना एखाद्या चिरेबंदी किल्ल्यासारखी बळकट आणि अजिंक्य बनली. त्यातूनच हे सार्वभौम हिंदवी स्वराज्य छत्रचामरांनिशी उभे राहिले.

महाराजांच्या बरोबर अनेक प्रकारची मंडळी होती. त्यात परमानंद गोविंद नेवासकर या नावाचा एक विद्वान संस्कृत पंडित होता. तो संस्कृत कवीही होता. महाराज त्याला साधूसंतांसारखा मान देत. आग्ऱ्याहून सुटायच्या आधीच महाराजांनी या परमानंदाला महाराष्ट्राकडे पाठविले. त्याच्यापाशी परवानापत्र होते. पण नंतर आठवडाभरातच महाराज आग्ऱ्याहून निसटले. सर्वत्र एकच कल्लोळ झाला. त्यावेळी हा परमानंद आग्ऱ्याहून राजस्थानमागेर् दक्षिणेकडे येत होता. तो दौरा या गावी अचानक जयपूरच्या राजपूत (पण मोगली सेवेत असलेल्या) सैनिकांच्या हाती गवसला. त्यांनी त्याला अटक करून ठेवले. या अटकेचाही फारसा बोभाटा झालेला दिसत नाही किंवा होऊ दिला नाही. यावेळी दक्षिणेत धारूर जवळ असलेल्या मिर्झाराजांना परमानंदाच्या अटकेची बातमी समजली. तेव्हा मिर्झाराजांनी हुकुम पाठविला की , शिवाजीराजांच्या परिवारातील या परमानंद कवीस अगदी सुखरूप जाऊ द्यावे. (म्हणचेच पोहोचवावे) त्याप्रमाणे परमानंद कवी सुखरूप सुटला. तो बहुदा या प्रवासात वाराणसी येथे जाऊन आला असावा. त्याने लिहिलेल्या ‘ अनुपुराण ‘ उर्फ ‘ शिवभारत ‘ या शिवचरित्र ग्रंथात असे म्हटले आहे की , ‘ काशीतील पंडितांनी शिवाजीराजांचे चरित्र माझ्या तोंडून ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मी हे शिवचरित्र कथक केले. ‘ प्रणिपत्य प्रवक्षामि महाराजस्य धिमत: चरितं शिवराजस्य भरतत्स्येव भारतम् ‘ हे प्रथम शिवचरित्रकथन यावेळीच काशी येथे घडले असावे , असा साधार तर्क आहे. परमानंद नंतर स्वराज्यात सुखरूप पोहोचला. तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या गावी राहत असे. त्याचा जीवनक्रम अध्यात्ममागीर् होता. त्याचा पुढे मृत्यू कधी झाला ते माहीत नाही. परंतु त्याची समाधी पोलादपूर या गावी आहे. पोलादपुरात परमानंदाचा एक मठही होता. परमानंद गृहस्थाश्रमी होता. त्याच्या मुलाचे नाव देवदत्त. तोही कवी होता. त्यानेही लिहिलेले काव्य रिसायतकार सरदेसाई यांनी प्रसिद्ध केले.

आग्ऱ्याच्या कैदेत असताना महाराजांनी रामसिंहाकडून सुमारे ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते. ते महाराजांच्या सुटकेच्या आधीच. राजगडच्या खजिन्यातून एका रकमेने मिर्झाराजांच्या प्रतिनिधीमार्फत परत करण्यात आले. या साऱ्याच व्यवहारावरून आपलं खाजगी , सामाजिक आणि राजनैतिक आचरण शुद्ध ठेवण्याचा महाराजांचा निग्रह दिसून येतो.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel