शिवाजीराजांनी प्रारंभापासूनच हे ओळखले होते , की स्वराज्य उभे राहील आणि वाढेल ते कोणत्यातरी जबरदस्त अभिमानामुळेच. मग तो अभिमान आपल्या इतिहासाचा , भाषेचा , भूमीचा किंवा परंपरेचा असो. देवदैवतांची भक्ती आणि परंपरेने चालत आलेल्या पौराणिक कथा यांचाही तो अभिमान असू शकतो. महाराजांच्या मनात या सर्वच गोष्टींचा अभिमान आणि आदर उदंड साठवलेला होता. पण या अभिमानापोटी महाराजांनी कोणत्याही परधर्माचा , रीतरिवाजांचा वा भाषेचा द्वेष कधीही केला नाही. कधीही कोणाचा अपमान किंवा छळणूक केली नाही. आपली भाषा ही श्रीमंत आणि सर्व विषयांतील ज्ञानांनी समृद्ध असावी हाच विचार महाराजांच्या मनांत आणि आचरणात कायम दिसून येतो.
संस्कृत भाषेवर तर त्यांच्या मनांत नितांत प्रेम आणि भक्ती होती. महाराजांचा शिक्का आणि मोर्तब ही अगदी प्रारंभापासून संस्कृतमध्येच होती. त्यांचे अधिकृत शिक्क्याचे पहिले पत्र किंवा सर्वात जुने पत्र सापडले आहे ते इ. १६३९ चे. म्हणजेच त्यांच्या वयाच्या नवव्या वषीर् त्यांचा संस्कृत शिक्का वापरला जाऊ लागला. कदाचित त्याही पूवीर् हा शिक्का वापरला जात असेल. पण इ. १६३९ पूवीर्चे असे संस्कृत शिक्क्याचे विश्वसनीय पत्र अद्याप उपलब्ध झालेले नाही. म्हणजेच इ. १६३९ चे महाराजांचे पत्र हे पहिलेच पत्र शिक्का मोर्तबीचे असले तरी वयाच्या नवव्या वर्षी महाराजांनी स्वत: युद्ध , अर्थपूर्ण आणि आपला ध्येयवाद व्यक्त करणारे कविताबद्ध संस्कृत भाषेतील शिक्का मोर्तब स्वत: तयार केले असेल असे वाटत नाही. ‘ प्रतिपच्चंदलेखेव वधिर्ष्णुविंश्व वंदिता शाहस्नो: शिवस्वैषा मुदा भदाय राजते ‘ आणि पत्रलेखन पूतीर्ची मुदा होती ‘ मर्यादेयंविराजते ‘ ही शिक्कामोर्तब अत्यंत उदात्त राजकुलीन आहे.
ही मुदा बहुदा जिजाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे व मनोभावनेप्रमाणे कोणा जाणकार संस्कृत कवीकडून तयार करवून घेतली असावी. ‘ प्रतिपदेच्या चंदाप्रमाणे विकसित होत जाणारी ही शहाजीपुत्र शिवाजीराजे यांची मुदा विश्ववंद्य व कल्याणकारी आहे. ‘ हा या शिवराजमुदेचा आशय आहे. यातच शिवाजी महाराजांचा उदात्त , महत्त्वाकांक्षी आणि विश्वकल्याणकारी ध्येयवाद आणि आयुष्याचा संकल्प व्यक्त होतो. प्रत्यक्ष स्वराज्याच्या राजकारभारास प्रारंभ झाल्यापासून महाराज अधिकाधिक लक्ष आपल्या मराठी भाषेवर व मूळ मातृभाषा असलेल्या संस्कृतवर देताना दिसतात. त्यांच्या राजपत्रातून फासीर् भाषेतील शब्द कमी होऊन मराठी भाषा अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रीया विराजित सकळ गुणालंकरण अशी श्रीमंत होत गेलेली दिसते. पुढे तर बाळाजी आवजी चित्रे उर्फ चिटणीस यांच्याकडून महाराजांनी ‘ लेखनप्रशस्ती ‘ या नावाचा एक निबंधच लिहवून घेतला. महाराजांचे सापडलेले शिलालेख संस्कृतमध्येच कोरलेले आहेत. रायगडावर जगदीश्वर मंदिरावर असलेला शिलालेख म्हणजे रायगडचे वर्णन करणाारे सुंदर संस्कृत भाषेतील एक गोड काव्यच आहे.
महाराजांचे पदरी अनेक संस्कृतज्ञ पंडित होते. परमानंद गोविंद नेवासकर , संकर्षण सकळकळे , धुंडिराज व्यास , रघुनाथ पंडित अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , उमाजी पंडित , गागाभट्ट इत्यादी. याशिवाय पाहुणे भाषा पंडितही अनेक होते. जयराम पिंड्ये , गोरेलाल तिवारी , कवीराज भूषण , निळकंठ कवी कलश इत्यादी. अन् प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हेही संस्कृतचे उत्तम पंडित होते. युवराज शंभूराजे संस्कृतभाषेत इतर पंडितांबरोबर संवाद चर्चा करीत असत. अशी ही रायगडची राजसभा विद्वत्जंग होती.
स्वराज्यात कोणालाही कोणत्याही भाषेत लेखन , वाचन आणि अभ्यास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. एका पुसटश्या उल्लेखावरून असा तर्क धावतो , की प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांना फासीर् भाषेचा परिचय असावा आणि संस्कृत भाषाही त्यांना येत असावी. रामायण महाभारतादि गंथांची ओळख , किंबहुना चिरपरीचय त्यांना नक्कीच होता. त्यांच्या काही पत्रांत या पौराणिक काव्यातले संदर्भ स्पष्ट दिसतात. स्वत: शिवाजीमहाराजांनी ओवी अभंगासारख्या चार सहा ओळी केलेली एक भक्ती युक्त रचना तंजावरच्या दप्तरखान्यात उपलब्ध आहे. अर्थात ते कितपत विश्वसनीय आहे हे आत्ताच सांगता येत नाही. अधिक पुराव्यांची गरज आहे.
याशिवाय शिवकाळात आणि शिवराज्यात अनेक संस्कृत मराठी , फासीर् , दख्खनची उर्दू आणि हिंदुस्थानी भाषेत लहानमोठ्या काव्यरचना वा ग्रंथरचना करणाऱ्यांची यादी तशी बरीच मोठी आहे. त्यातूनही आपणांस शिवचरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास करता येतो.
कलेच्या बाबतीत स्वराज्यात काय काय घडले , हे फार विस्ताराने सांगण्याइतके उपलब्ध नाही , तरी पण शिल्पकला , चित्रकला , संगीत , कापड-विणकाम , दागदागिने , होकायंत्रे , दुबिर्णी , चष्मे , रोगराईवरील औषधे , तोफा बंदुका , हुके (हातबॉम्ब) तमंचे (ठासणीची पिस्तुले) , कडाबिनी ( अनेक गोळ्या एकाचवेळी उडवण्याचे बंदुकीसारखे हत्यार) आणि तलवारी , कट्यारी , पट्टे , भाले , विटे , वाघनखे , बचीर् , तिरकामठे , बिचवे , गुर्ज इत्यादी पोलादी हत्यारे स्वराज्यात तयार होत असत.
तेवढीच परदेशातूनही आयात केली जात असत. रोग्यावर औषधोपचार करण्याकरिता पोर्तुगीज , फ्रेंच आणि इंग्रज डॉक्टरांनाही क्वचित प्रसंगी बोलावीत असत. कापडचोपड , पैठण , येवले या ठिकाणी भारी किंमतीचे तयार होत असे. पण किनखाप , गझनी , भरजरी तिवटे हे बहुदा उत्तरेकडून आणि बऱ्हाणपूर , औरंगाबाद , दिल्ली अशा बाजारपेठांतूनच येत असे. मराठ्यांना तलवारींची आवड मोठीच होती. युरोपीय देशातील आणि मस्कत , तेहरान , काबूल इत्यादी ठिकाणी तयार होणाऱ्या तलवारी फार मोठ्या प्रमाणात आजही जुन्या मराठी घराण्यांत अडगळीत पडलेल्या सापडतात.
महाराष्ट्रात कोणत्याही जाती समाजात शूर पुरुष होऊन गेलेले दिसतात. तसेच शाहीर कवी झालेलेही सापडतात. ईश्वराची सेवा आपापल्या इच्छेप्रमाणे आणि धर्ममताप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य येथे होते.
-बाबासाहेब पुरंदरे