गोष्ट एकेचाळिसावी

जेव्हा झगडा दोघांचा होई, तेव्हा लाभ तिसर्‍याचा कुणाकडे जाई !

एका गावी 'द्रोण' नावाचा एक ब्राह्मण राहात होता. त्याला कुणीतरी गाईची दोन वासरे दान म्हणून दिली. ती गुटगुटीत वासरे एका चोराच्या मनात भरली. एके रात्री तो चोर त्या ब्राह्मणाच्या घराकडे ती वासरे चोरण्याच्या उद्देशाने चालला असता, त्याला एक महाभयंकर राक्षस भेटला. चोराने भीतभीत त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, 'मी ब्रह्मराक्षस आहे. गेल्या तीन दिवसाच्या उपवासाचे पारणे फेडण्याकरिता मी द्रोण नावाच्या ब्राह्मणाला खायला जात आहे. तू कोण व कुठे चालला आहेस?' चोर म्हणाला, 'माझं नाव क्रूरकर्मा. चोरी करण्यात माझा हात धरणारा या पृथ्वीतलवर दुसरा कुणी नाही. मीही त्या द्रोणाकडेच त्याची वासरे चोरण्याकरिता चाललो असल्याने, आपण संगती सोबतीने जाऊ या.'

त्याप्रमाणे ते दोघे त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. पण झोपलेल्या त्या ब्राह्मणाला खायला तो राक्षस जाऊ लागताच चोर त्याला म्हणाला, 'हे राक्षसा, अरे तू त्या ब्राह्मणाला खाताना जर का तो किंचाळला, तर शेजारीपाजारी जमा होऊ लागतील आणि वासरे न घेताच पळून जाण्याचा प्रसंग माझ्यावर येईल. तेव्हा अगोदर मी वासरे पळवतो, मग तू त्या ब्राह्मणाला खा.'

ब्रह्मराक्षस म्हणाला, 'छे छे ! त्या दोन वासरांना तू पळवून नेत असताना, जर का ती हंबरली, तर त्या ब्राह्मणाला जाग येईल व माझ्याकडे नजर जाताच, मला असह्य होणार्‍या एका देवाचे नाव घेऊन तो मला पळवून लावील. तेव्हा ब्राह्मणाला खाण्याचे काम मी अगोदर करतो, वासरे पळविण्याचे काम तू माझ्यानंतर कर.' अशा तर्‍हेने त्या दोघांत कुणी आपले काम अगोदर करायचे याबद्दल कडाक्याचे भांडण सुरू झाल्याने तो ब्राह्मण जागा झाला आणि त्याने कुलदेवतेच्या नावाचा गजर सुरू करताच, तो राक्षस पळून गेला. मागे राहिलेल्या चोराला त्या ब्राह्मणाने काठीने चोप पिटाळून लावले. ही गोष्ट सांगून मंत्री वक्रनास राजा अरिमर्दनास म्हणाला, 'महाराज, माझ्या दृष्टीनं मेघवर्न व स्थिरजीवी हे दोघेही जरी शत्रू असले, तरी त्या दोघांमध्ये आता वैर निर्माण झाले असल्याने, त्या दोघांना एकमेकांविरुद्ध लढवावे व त्यायोगे आपले हित आपण साधून घ्यावे.'

यानंतर आपला पाचवा मंत्री प्राकारकर्ण याला त्या बाबतीत अरिमर्दनाने विचारता, तो म्हणाला, 'महाराज, स्थिरजीवी हा जरी आपला एकेकाळचा शत्रू असला, तरी तो आता आपला होऊ पाहात आहे. अशा वेळी त्याला आपण सांभाळून न घेतल्यास, वारुळातला नाग व पोटातला नाग या दोघांचा जसा नाश झाला, तसाच नाश होण्याचा प्रसंग त्या कावळ्यांवर व आम्हा घुबडांवर येईल.'

'तो कसा काय?' असे अरिमर्दनाने विचारताच प्राकारकर्ण म्हणाला, 'ऐका-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel