गोष्ट एकोणपन्नासावी

ज्याचा एकदा वाईट अनुभव येई, त्यावर पुन्हा विश्वास ठेवू नाही.

एका विहिरीतील बेडकांचा राजा 'गंगदत्त' हा तिथल्या भांडखोर बेडकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळला आणि विहिरीबाहेर पडला. मग तो स्वतःशीच म्हणाला, 'ज्यांनी आपल्याला अतिशय त्रास दिला, त्यांचा निःपात करण्यासाठी वेळप्रसंगी एखाद्या बलवान् शत्रूची तात्पुरती मदत घेण्यात काय वावगे आहे ? म्हटलंच आहे-

शत्रुमुन्मूलयेत्प्राज्ञस्तीक्ष्णं तीक्ष्णेन शत्रुणा ।

व्यथाकरं सूखार्थाय कण्टकेनैव कण्टकम् ॥

(ज्याप्रमाणे खुपत राहणारा एक काटा आपण दुसर्‍या काट्याने काढतो, त्याचप्रमाणे सुखाच्या प्राप्तीसाठी, एका प्रबळ शत्रूचा निःपात, दुसर्‍या प्रबळ शत्रूच्या सहाय्याने करावा.)

मनात असे ठरवून गंगदत्त हा माहितीतल्या प्रियदर्शन नावाच्या एका बलवान काळ्या सर्पाच्या बिळाच्या तोंडाशी जाऊन त्याला म्हणाला, 'हे प्रियदर्शना, मी बेडकांचा राजा गंगदत्त असून, तुझ्या मदतीने माझ्या प्रजेतील त्रासदायक बेडकांचा नाश करायचा आहे. त्यायोगे माझे शत्रूही नाश पावतील व तुलाही ते खायला मिळतील.'

प्रियदर्शनाने बिळातल्या बिळात राहूनच विचारले, 'हे गंगदत्ता, मी तुम्हा बेडकांचा जन्मजात वैरी असताना तू माझी मदत मागायला कसा काय आलास ?'

गंगदत्त बेडूक म्हणाला, 'अडलेल्या माझ्यासारख्याला असे करण्यावाचून दुसरा मार्गच कुठे आहे ? म्हटलेच आहे ना ?-

सर्वनाशे च संजाते प्राणानामपि संशये ।

अपि शत्रुं प्रणम्यापि रक्षेत् प्राणान्धनानि च ॥

(सर्वनाश होण्याचा प्रसंग आला असता, तसेच प्राणांवर बेतले असता, शत्रूलासुद्धा नमस्कार करून, प्राण व धन यांचे रक्षण करावे.)

गंगदत्ताने आपण दाखवू त्याच बेडकांचा तू फडशा पाड, असे त्या सर्पाला सांगितले व ते त्याने मान्य केले. पण प्रत्यक्षात त्या विहिरीत जाताच तो आडदांड सर्प सरसकट बेडकांना गिळंकृत करू लागला. मग त्या गंगदत्ताला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होऊन तो स्वतःशी म्हणाला -

योऽ मित्रं कुरुते मित्रं वीर्याभ्याधिकमात्मनः ।

स करोति न सन्देहः स्वयं हि विषभक्षणम् ।

(जो आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यसंपन्न अशा शत्रूशी मैत्री करतो, तो जणू स्वतःच वीषभक्षण करीत असतो, यात संशय नाही.)

त्या सर्पाने गंगदत्ताच्या शत्रूंप्रमाणेच त्याचे नातेवाईकही आणि शेवटी तर त्याचा मुलगा यमुनादत्त यालाही गिळंकृत केले. बाकी त्यात नवल ते काय ? कारण म्हटलंच आहे !-

यथा हि मलिनैर्वस्त्रैर्यत्रतत्रोपविश्यते ।

एवं चलितवृत्तस्तु वृत्तिशेषं न रक्षति ॥

(एखाद्याची वस्त्रे मलीन झाली की, ज्याप्रमाणे तो वाटेल तिथे बसतो, त्याचप्रमाणे एकदा का एखादी व्यक्ती सदाचाराच्या मार्गापासून ढळली की, ती उरलीसुरली नीतीही सांभाळीनाशी होते.)

याप्रमाणे गंगदत्ताखेरीज जेव्हा बाकीचे सर्व बेडूक खाऊन खलास केले गेले, तेव्हा त्या सर्पाने त्याला विचारले, 'बोल गंगदत्ता, आता मी माझी भूक कुणाला खाऊन भागवू ?' यावर स्वतःचे रक्षण करण्याच्या हेतूने गंगदत्त त्याला खोटेच म्हणाला, 'मित्रा, मी या विहिरीबाहेर जातो आणि दुसर्‍या एका विहिरीत मोठ्या प्रमाणात असलेल्या बेडकांना फसवून या विहिरीत आणतो. म्हणजे तुझ्या पोटाची काळजी दूर होईल.' असे म्हणून तो जो त्या विहिरीबाहेर पडला, तो पुन्हा तिकडे गेलाच नाही.

मग त्या महासर्पाने ता विहिरीतील एका घळीत राहणार्‍या एका घोरपडीला त्या गंगदत्ताला शोधून त्याला 'तुझ्या विरहाने मी व्याकूळ झालो असून, तू लवकरात लवकर इकडे ये,' असा निरोप कळवायला सांगितले. घोरपडीने गंगदत्ताला तो निरोप सांगताच, त्याने तिच्याचबरोबर त्या सर्पाला निरोप पाठविला, 'हे प्रियदर्शना, तू माझ्या विरहाने व्याकूळ झालेला नाहीस, तर भुकेने व्याकूळ झालेला आहेस आणि जो भुकेला आहे, तो आपली भूक शमविण्यासाठी कोणते पाप करायला तयार होत नाही ? म्हटलेच आहे ना ? -

बुभुक्षितः किं न करोति पापम् ।

क्षीणा नरा निष्करुणा भवन्ति ॥

( भुकेले लोक कोणते पाप करायचे बाकी ठेवतात ? भुकेने क्षीण झालेले लोक निर्दय बनतात.)

असे म्हणून 'आता त्या विहिरीत मी चुकूनही येणार नाही, ' हा निरोप त्या सर्पाला कळविण्यास गंगदत्ताने त्या घोरपडीस सांगितले.'

ही गोष्ट त्या मगराला सांगून तो ताम्रमुख वानर त्याला पुढे म्हणाला, 'अरे दगलबाजा, तुझ्यासंगे तुझ्या घरी येणे म्हणजे आपणहून मृत्यूच्या कराल जबड्यात प्रवेश करणे हे स्पष्ट दिसत असतानही तो धोका पत्करायला मी काय थोडाच तो लंबकर्ण गाढव आहे ?'

यावर 'ती लंबकर्णाची गोष्ट काय आहे ?' अशी विचारणा त्या मगराने केली असता तो ताम्रमुख वानर म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel