गोष्ट बावन्नावी

सिंहासाठी हत्तीची शिकार, कोल्ह्याने करावा केवळ कोंबडीचाच विचार.

एका वनात सिंहसिंहिणीचे एक जोडपे राहात होते. सिंहिणीने नुकताच दोन छाव्यांना जन्म दिला असल्याने, सिंहच शिकारीला जाई आणि केलेल्या शिकारीतला अर्धा भाग स्वतः खाऊन, उरलेला अर्धा भाग आपल्या घरधनिणीला आणून देई. एकदा तो शिकारीसाठी गेला असता, त्याला एका कोल्ह्याच्या पिलाखेरीज दुसरे काहीच मिळाले नाही. मग त्या पिल्लालाच आपल्या जबड्यात धरून त्याने आपल्या गुहेत आणले व आपल्या पत्‍नीसमोर ठेवले.

'आज तुम्ही माझ्यासाठी काहीच आणले नाही?' अशी विचारणा त्या सिंहिणीने केली असता तो सिंह म्हणाला, 'प्रिये, आज मला या पिलाखेरीज दुसरे काहीच मिळाले नाही. वाटल्यास तू याला खा, पण मी मात्र खाणार नाही. कारण धर्मशास्त्र स्पष्टपणे सांगते-

स्त्रीविप्रलिङ्गिबालेषु प्रहर्तव्यं न कर्हिचित् ।

प्राणत्यागेऽपि संजाते विश्वस्तेषु विशेषतः ॥

(आपल्यावर प्राण गमाविण्याचा जरी प्रसंग आला तरी स्त्री, ब्राह्मण, संन्यासी, बालक व विशेषेकरून ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे, अशांना कधी मारू नये.)

सिंहीण म्हणाली, 'धर्मानं जी गोष्ट निषिद्ध म्हणून सांगितली, ती मी तरी कशी करीन ? मी या पिल्लाची माझा तिसरा मुलगा म्हणून सांभाळ करीन.' याप्रमाणे बोलून ती सिंहीण आपल्या छाव्यांप्रमाणेच त्या पिलालाही अंगावरचे दूध पाजू लागली. असे होता होता, त्या दोन छाव्यांबरोबरच ते कोल्ह्याचे पोरही थोडेसे मोठे झाले.

एकदा ते पिल्लू, त्या दोन छाव्यांसह वनात एकत्रपणे हिंडत असता, त्यांना एक रानहत्ती दिसला. ते दोन छावे त्या हत्तीवर झडप घेण्याच्या पवित्र्यात उभे राहू लागले असता, ते कोल्ह्याचे पोर त्यांना दटावून म्हणाले, 'अरे, काय हा अविचार करता ? तो एक बलाढ्य हत्ती आहे. त्याच्या वाटेस गेल्यास, तो तुम्हाला मारून नाही का टाकणार ?' एवढे बोलून ते कोल्ह्याचे पोर धपापत्या छातीने तिथून पळून घरी गेले. ते पोर असे बोलल्यामुळे ते दोन छावे मात्र नाउमेद झाले. म्हटलंच आहे ना ?-

एकेनापि सुधीरेण सोत्साहेन रणं प्रति ।

सोत्साहं जायते सैन्यं भग्ने भङ्गमवाप्नुयात् ॥

(रणभूमीवर एखादा धैर्यशाली वीर जरी उत्साहाने लढायला उभा राहिला, तरी सर्व सैन्यात स्फुरण उत्पन्न होते. पण त्याऐवजी एखादा जरी पळ काढू लागला, तरी सर्वांचीच पळापळ सुरू होते.)

त्यानुसार ते कोल्ह्याचे पोर पळून जाताच ते दोन छावेही गुहेकडे गेले व वनराज सिंहाला सांगू लागले, 'बाबा, आमचा दादा अगदीच भित्रा कसा हो ? एका रानहत्तीवर आम्ही दोघे झेप घेऊ पाहात असता, याने आम्हाला निरुत्साही केले व घरी पलायन केले.'

त्या छाव्यांनी आपली कुचेष्टा केल्याचे पाहून ते कोल्ह्याचे पोर, त्यांच्यावर भडकून त्यांना नको नको ते बोलू लागले असता, त्याला एका बाजूला घेऊन सिंहीण म्हणाली, 'बाळा, बोलून चालून तू एका कोल्ह्याचा मुलगा आहेस, तर ते दोघे सिंहाचे छावे आहेत. त्यांच्या कुवतीची कल्पना तुला कशी काय यावी ?'

कोल्ह्याच्या पिल्लाने विचारले, 'आई ! पण शौर्य, शिक्षण, रूप या दृष्टींनी माझ्यात काही कमतरता आहे का?' यावर ती सिंहीण म्हणाली -

शूरोऽसि कृतविद्योऽसि दर्शनीयोऽसि पुत्रक ।

यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते ॥

(बाळा, तू शूर आहेस, विद्याभ्यास पूर्ण केलेला आहेस आणि दिसायलाही चांगला आहेस, पण ज्या कुळात तू जन्मलास त्या कुळात कुणाकडूनही हत्तीचा वध केला जात नाही.)

'तेव्हा बाळा, तू एक यःकश्चित् कोल्हा आहेस, हे माझ्या मुलांना कळण्यापूर्वीच तू इथून निघून या वनातील तुझ्या जातभाईंकडे जा.' ही गोष्ट त्या राजाने कुंभाराला सांगताच तो कुंभार तिथून चूपचाप निघून गेला.'

अशा या गोष्टी त्या मगराला सांगून तो ताम्रमुख वानर त्याला पुढे म्हणाला, 'क्षुद्रांचे क्षुद्रपण केव्हातरी उघड्यावर येतेच येते. कुंभाराचा अडाणीपणा किंवा त्या कोल्ह्याचा क्षुद्रपणा जसा उघड्यावर आला, तसाच तूही तुझ्या बायकोच्या नादी लागून स्वतःचा मूर्खपणा उघड केलास. अरे, आपली बायको झाली, म्हणून तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिरसावंद्य मानणे योग्य आहे का ? मग देवाने आपल्याला जे स्वतंत्र डोके दिले आहे, त्याचा काय उपयोग ? असाच सारासार विचार सोडून बायकांच्या आज्ञांचे बंदे गुलाम झाल्यामुळे, त्या प्रधानावर स्वतःच्या डोक्याचे मंडन करून घेण्याचा व राजावर आपल्या राणीचा घोडा होण्याचा लज्जास्पद प्रसंग आला ना ?' यावर 'ती गोष्ट काय आहे?' असे त्या मगराने विचारल्यामुळे वानर म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel