गोष्ट एकोणतीसावी

धनिक कंजूष का असेना, लोक तुकविती त्याच्यापुढे माना.

एका गावात सोमिलक नावाचा एक कोष्टी राहात होता. वस्त्रे विणण्यात तो अत्यंत कुशल असूनही, गावात त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट भरेना. म्हणून त्याने नशीब काढण्यासाठी एखाद्या मोठ्या शहरात जाण्याचे ठरविले. त्याचा तो बेत कळताच त्याची बायको त्याला म्हणाली, 'धनी, आपल्या दैवातच जर धन नसेल, तर दुसर्‍या गावी जाऊन तरी ते कसे मिळणार ? म्हटलेच आहे ना -

यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।

तथा पुराकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥

(ज्याप्रमाणे हजारो गाई एकत्र असल्या, तरी वासरू हे नेमके त्यांतील आपल्या आईला ओळखते, त्याचप्रमाणे पूर्वजन्मीचे बरेवाईट कर्म हे त्याच्या कर्त्याच्या पाठोपाठ त्याला 'फळ द्यायला जाते.')

यावर तो कोष्ठी म्हणाला, 'कांते, तू चुकतेस. अगं -

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते ।

तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम् ॥

(ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही, त्याचप्रमाणे उद्योग केल्याशिवाय कर्माचे फळ हाती लागत नाही.)

बायकोला याप्रमाणे उत्तर देऊन सोमिलक कोष्टी वर्धमान नावाच्या नगरीत गेला. तिथे अपार श्रम घेऊन व आपल्या वस्त्रे विणण्याच्या व्यवसायात अवघ्या दोन वर्षात तीनशे सुवर्णमोहरांची माया जमवून, तो त्या मोहरांसह आपल्या गावी जायला निघाला.

अर्धी वाट चालून होताच संध्याकाळ झाल्यामुळे, तो त्या मोहोरांच्या गाठोड्यासह एका वडाच्या झाडावर चढला व त्याच्या एका रुंदसर फांदीच्या बेचक्यावर झोपला. रात्री झोपेत असताना, त्याच्या स्वप्नात प्रयत्‍नराव व नशीबराव या दोन पुरुषांचा संवाद त्याला ऐकू येऊ लागला. नशीबराव प्रयत्‍नरावाला विचारू लागला, 'काय रे, या कोष्ट्याच्या नशिबात जेमतेम स्वतःचे कुटुंब पोसण्यापुरतेच द्रव्य असताना, तू याच्याजवळ तीनशे सुवर्णमोहरा कशा काय साठू दिल्यास ?'

प्रयत्‍नराव म्हणाला, 'जे नशिबावर हवाला न ठेवता प्रयत्‍न करतात, त्यांच्या प्रयत्‍नाचे फळ मी त्यांच्या पदरात टाकतो. तुला वाटल्यास तू याच्या मोहरा घेऊन जा.' हे स्वप्न पडताच सोमिलक खडबडून जागा झाला. बघतो, तर जवळच्या सर्व मोहोरा नाहीशा झालेल्या. तरीही खचून न जाता, तो पुन्हा वर्धमान शहरी गेला व अथक परिश्रम घेऊन, त्याने अवघ्या एका वर्षात पाचशे सुर्वणमोहरा साठविल्या आणि पुन्हा तो त्या मोहोरांच्या गाठोड्यासह गावी जाऊ लागला. पण काय आश्चर्य ! पुन्हा तसेच स्वप्न व पुन्हा त्या मोहोरांचे गाठोडे नाहीसे झालेले.

त्या प्रकाराने अतिशय निराश झालेला तो, गळ्याला फास लावून स्वतःचा देहान्त करायला सज्ज झाला असता एक अदृश्य पुरुष त्याला म्हणाला, 'हे सोमिलका, तू कष्ट करून जगणारा आहेस ! त्यामुळे तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटते. तेव्हा तू अशी आत्महत्या करू नकोस. एक संपत्ती सोडून तू मजकडे दुसरा, कुठलाही शक्यतेतला वर माग. तो मी तुला देईन. तुझ्या नशिबात जर मुबलक संपत्तीचा भोग घेणे नाही, तर ती तुला कशाला हवी ?'

सोमिलक म्हणाला, 'प्रभू, तरीही तू मला भरपूर धनच दे. अरे, स्वतः उपभोग न घेता, किंवा दान न करता नुसताच धनाचा साठा करून ठेवणार्‍यालासुद्धा हे मूर्ख जग मान देते. तेव्हा तू मला भरपूर धन दिल्यावर, जरी मला याचा उपभोग घेता आला नाही, तरी लोकांकडून मान तर मिळेल ना ? कुणीकडून तरी काही पदरात पडल्याशी कारण. आयुष्यभर अथक परिश्रम घ्यायचे आणि पदरात मात्र काहीच नाही पडायचे, म्हणजे सतत पंधरा वर्षे फुकट भ्रमंती करीत राहणार्‍या त्या मूर्ख कोल्हाकोल्हीसारखी गत झाली की !'

'ती गोष्ट काय आहे ?' असा प्रश्न त्या अदृश्य पुरुषाने केला असता सोमिलक म्हणाला - 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel