गोष्ट अडतिसावी

दिलेला शब्द जो मोडतो, तो पुढे स्वतःचे नुकसान करून घेतो.

राजा चित्ररथाने आपल्या राजवाड्यालगतच्या 'पद्मसर' नावाच्या सरोवरात जे सोनेरी हंस ठेवले होते, त्यांना कुणी मारू नये वा पळवू नये, म्हणून त्याने त्या सरोवराभोवती - राखणीसाठी - काही सैनिक ठेवले होते.

एकदा बाहेरून आलेला एक मोठा सोनेरी पक्षी त्या सरोवरात शिरू लागला असता, ते हंस त्याला म्हणाले, 'तू या सरोवरात येऊ नकोस. दर सहा महिन्यांनी चित्ररथमहाराजांना आमच्यापैकी प्रत्येक हंसाने एक सुवर्णपीस देण्याच्या करारावर आम्ही हे सरोवर घेतले असल्याने, तुला आम्ही या सरोवरात येऊ देणार नाही.'

त्या हंसाचे हे बोलणे ऐकून तो पक्षी राजा चित्ररथाकडे गेला व त्याला खोटेच सांगू लागला, 'महाराज, वास्तविक 'पद्मसर' हे सरोवर तुमच्या मालकीचे, पण त्यात तुमच्या कृपेने राहणारे उद्धट हंस मला म्हणाले, 'या सरोवरावर आमचा हक्क असल्याने प्रत्यक्ष राजे चित्ररथ यांनासुद्धा तुला यात राहायला सांगण्याचा अधिकार नाही.' हे ऐकताच मागचा पुढचा विचार न करता राजा चित्ररथाने आपल्या सेवकांना त्या हंसांना ठार मारून आपल्याकडे घेऊन येण्याची आज्ञा फर्माविली.

राजाच्या आज्ञेनुसार ते सेवक हाती काठ्या घेऊन त्या सरोवराकडे धावू लागताच, आपल्यावर आलेल्या संकटाची कल्पना येऊन एक वृद्ध सुवर्णहंस आपल्या इतर सर्व ज्ञातिबांधवांना म्हणाला, 'राजा चित्ररथाने पाहुण्या पक्ष्याच्या नादी लागून आपले जीव घ्यायचे ठरविलेले दिसते. तेव्हा आपण इथून ताबडतोब निघून जाऊ या.' आपल्या म्होरक्याच्या सांगण्याप्रमाणे ते सर्व हंस लगोलग उडून गेले, पण त्यामुळे त्यांचे सुवर्णपंख मिळणे बंद होऊन, त्या राजाचेच मोठे नुकसान झाले. अविचार हा असा नुकसान करणारा दुर्गुण आहे.'

ही गोष्ट आपल्या नातेवाईकांना सांगून झाल्यावर व ते तिथून निघून गेल्यावर हरिदत्त नावाचा तो ब्राह्मण दुधाची वाटी घेऊन शेतावर गेला. त्याने ती दुधाची वाटी वारुळाच्या तोंडाशी ठेवताच तो नाग त्याला म्हणाला, 'हे लोभी माणसा, मी दंश करून तुझ्या मुलाचा प्राण घेतला असूनसुद्धा, तू जी दुधाची वाटी घेऊन मजकडे आला आहेस, तो माझ्यावरील प्रेमापोटी नसून, पदरात सुवर्णदिनार पाडून घेण्यासाठी आला आहेस. वास्तविक तुझ्या मनात माझ्याविषयी रागच आहे. आता तू माझ्याकडे आलाच आहेस, तर मी तुला एक मौल्यवान रत्‍न देतो, पण इतःपर मात्र तू माझ्याकडे येऊ नकोस. कारण जोवर तुझ्या मुलाने माझ्या फणेवर काठीचा प्रहार केल्याची आठवण मला, आणि तुझ्या मुलाला दंश करून मारल्याची आठवण तुला राहणार आहे, तोवर तुझ्यामाझ्यात स्नेहसंबंध निर्माण होणे अशक्य आहे.'

ही गोष्ट राजा अरिमर्दनाला सांगून त्याचा मंत्री रक्ताक्ष हा त्याला पुढे म्हणाला, 'महाराज, स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी स्थिरजीवी हा जरी आपल्याशी चांगला वागत असला तरी ते प्रेम काही खरे नाही. आपण आजवर मारलेल्या कावळ्यांमध्ये या स्थिरजीवीचेही आप्तसंबंधी असणारच असणार. तेव्हा ती कटु आठवण जोवर त्याला राहणार आहे, आणि त्याचा राजा मेघवर्ण हा आपल्या मनात राहणार आहे, तोवर आम्हा घुबडांत आणि त्या कावळ्यांपैकी कुणाताही मैत्रीसंबंध निर्माण होणे ही अशक्य गोष्ट आहे. अशा स्थितीत या स्थिरजीवीला आश्रय न देता, त्याला मारणे हेच श्रेयस्कर आहे.'

रक्ताक्षाचे म्हणणे ऐकून झाल्यावर राजा अरिमर्दनाने आपला दुसरा मंत्री क्रूराक्ष याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो अरिमर्दनाला म्हणाला, 'महाराज, रक्ताक्षाचे म्हणणे साफ चूक आहे. धर्मशास्त्रसुद्धा 'शरणागताला मारू नये' असे सांगते. म्हणून तर एका कबुतराने त्याच्याकडे याचना करणार्‍या एक पारध्याला संतुष्ट करण्यासाठी आपले स्वतःचे मांस दिले.'

'ते कसे ?'

असे राजा अरिमर्दनाने विचारता क्रूराक्ष म्हणाला, 'ऐका महाराज-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel