गोष्ट त्रेपन्नावी

ज्याची बुद्धि दुसर्‍याकडे गहाण, त्याचे सर्वत्र नुकसानच नुकसान.

एका राज्याचा राजा नंद व त्याचा प्रधान वररुची हे जसे बुद्धिमान व प्रजाहितदक्ष होते, तसेच महापराक्रमीही होते. त्यामुळे त्यांचे प्रजाजन सुखी व निश्चिंत होते, तर त्यांचे शत्रु कष्टी व चिंताग्रस्त होते. दुःखाची गोष्ट एकच की, राजा व प्रधान या दोघांच्याही वाट्याला जहांबाज व मूर्ख बायका आल्या होत्या आणि शत्रूंना चळाचळा कापायला लावणार्‍या त्या दोघांपैकी कुणाचीही बायकोच्या मनाविरुद्ध जायची ताकद नव्हती.

एकदा प्रधानाची बायको रुसून बसली व त्याला म्हणाली, 'आताशा तुमचे माझ्यावर प्रेमच उरले नाही. तुम्ही जर तुमच्या मस्तकाचे सफाईदार मुंडण करून घेतलेत, तरच तुमचे माझ्यावर पूर्ववत् प्रेम आहे असे मी मानीन.' प्रधानाने त्याप्रमाणे न्हाव्याकडून स्वतःचे अगदी सफाचट मुंडण करून घेतले. प्रधानिणीच्या दासीला मुंडणाचे कारण कळताच तिने ते लगेच राजाकडे पोहोचते केले.

तिकडे राणीही आपल्या क्रोधागारात फुरंगुटून बसली होती. राजाने तिला तिच्या रागाचे कारण विचारता तीही म्हणाली, 'आताशा महाराजांचे माझ्यावर प्रेमच उरले नाही. महाराजांनी जर तोंडात लगाम पकडून, ओणवे होऊन मला पाठीवर घेऊन या महालात घोड्याप्रमाणे फिरविले, तरच मला आपल्या प्रेमाची खात्री पटेल.' तिच्या इच्छेनुसार राजानेही 'घोडा' होऊन तिला पाठीवरून फिरविण्याचा गाढवपणा केला. दुर्दैवाने त्या महालाच्या दरवाजाच्या फटीतून डोकावून तो प्रकार राणीच्या दासीने पाहिला व प्रधानाच्या कानी घातला.

दुसर्‍या दिवशी प्रधान राजसभेत गेला असता नंद राजाने त्याला खंवचटपणे विचारले, 'काय प्रधानजी, कोणत्या पर्वणीनिमित्त तुम्ही स्वतःचे मुंडण करून घेतलेत ?' यावर प्रधानाने उत्तर दिले, 'महाराज, ज्या पर्वणीच्या निमित्ताने एखादा थोर पतीही घोड्याप्रमाणे तोंडात लगाम घेऊन, खिंकाळून आपल्या पत्‍नीला पाठीवर घेऊन तिला बंदिस्त महालात फिरवितो, त्याच पर्वणीनिमित्त मी हे मुंडण केले आहे.' हे तडाखेबंद उत्तर ऐकून राजाही मनोमन शरमला.'

ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, 'राजा नंद व प्रधान वररुची यांच्याप्रमाणे तू आपली बुद्धी बायकोकडे गहाण तर टाकली आहेसच, पण त्याशिवाय तू सैल जिभेचा आहेस, म्हणून तर आपल्या मूर्ख बायकोच्या हट्टाखातर तू मला मारण्याचा कट रचलास, पण नको तेव्हा तोंड उघडून, तू स्वतःच्या कटाचा फज्जा उडवून दिलास. म्हटलंच आहे ना ?-

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः ।

बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् ॥

([सर्वांसमक्ष मधुर बोलण्याच्या] आपल्या मुखदोषामुळे पोपट व मैना बंधनात [पिंजर्‍यात] पडतात, पण तेच बगळे मात्र [तसे न केल्यामुळे] पकडले जात नाहीत. म्हणून न बोलणे हेच कुठलेही काम साधण्याचे मुख्य साधन आहे.)

ताम्रमुख वानर पुढे म्हणाला, 'हे मूर्ख मगरा, वाघाचे कातडे मोठ्या कौशल्याने अंगावर चढविल्याने ज्या गाढवाचा चांगला जम बसला होता, त्याने नको तेव्हा आवाज काढल्यामुळेच त्याचा नाश झाला ना ?' यावर ती काय गोष्ट आहे ?' असे त्या मगराने विचारले आणि त्या वानराने त्याला ती गोष्ट सांगणे सुरू केले-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel